You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे: देवादिकांच्या नावाने जुमले देऊ नका, नाहीतर तुम्हाला ठोकून काढू
''देवादिकांच्या नावाने जुमले देऊ नका, नाहीतर तुम्हाला ठोकून काढू'', असे उद्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपूर येथील सभेत काढले.
आपल्या 40 मिनिटांच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर, रफाल घोटाळा, कर्जमाफी, पीकविमा घोटाळा, कांदा प्रश्न, लष्करी जवानांची पगारवाढ अशा अनेक मुद्द्यांवर आक्रमक भाष्य केलं.
"पाच राज्यांच्या निवडणुकीत लोकांनी जो कौल दिला, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यांचं कौतुक करतो. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी काँग्रेस नेत्यांची अख्खी फळी गोळ्या घालून संपवली होती. तरीही आदिवासी बांधवांनी पर्याय कोण, याचा विचार न करता शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या भाजप सरकारला हाकलून लावलं. जी हिंमत छत्तीसगडमधील जनतेनं दाखवली, ती हिंमत शिवरायांच्या महाराष्ट्रातील जनता दाखवणार की नाही?" असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपुरात भाजपवर निशाणा साधला.
उद्धव यांच्या भाषणातील दहा महत्वाचे मुद्दे
1. निवडणुकीच्या तोंडावर मी राम मंदिराचा मुद्दा घेतला आहे, हे खरं आहे. गेली 28-30 वर्ष "मंदिर वहीं बनाएंगे"चा नारा घुमतोय. पण प्रत्यक्षात निवडणुका आल्या की यांच्या अंगात देव घुमू लागतो. म्हणूनच कुंभकर्णाला जागं करण्यासाठी मी अयोध्येला गेलो होतो. देवादिकांच्या नावाने जुमले देऊ नका. नाहीतर तुम्हाला ठोकून काढू.
2. नीतिशकुमार आणि रामविलास पासवान यांच्यासमोर भाजपनं नमतं घेतलं. चांगली गोष्ट आहे. जे नीतिश संघमुक्त भारत करायला निघाले होते, त्यांच्या मांडीला मांडी लावून भाजप बसतंय. पण मला त्यांना विचारायचं आहे, राम मंदिराबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे ते सांगावं. मग भारतीय जनता पक्षाने सांगावं की त्यांचं राम मंदिरावर सकारात्मक मत असल्याने जास्त जागा दिल्या. मग मी त्यांचं अभिनंदन करेन. आज जशी शिवसेना उघडपणे राम मंदिर आणि हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन मैदानात उतरलीय. तसं नीतिश आणि पासवान यांनी उतरुन दाखवावं
3. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सांगतायत. मंदिर आम्हीच बांधणार. बांधा ना मग. तुम्हाला कुणी थांबवलं आहे? ते म्हणतात.. 'मंदिर था, है और यही रहेगा.' मग माझा फक्त एवढाच प्रश्न आहे, की 'दिखेगा कब?'
4. युती करायची की नाही, हे जनता ठरवेल. मला त्याची चिंता नाही. दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्याकडे सरकारचं दुर्लक्ष होतं आहे. उलट पंतप्रधानांशी खोटं बोलण्यासाठी शेतकऱ्यांना भाग पाडलं जात आहे. त्यामुळे जानेवारीत दुष्काळग्रस्त महाराष्ट्र पिंजून काढणार आहे.
5. 32 हजार कोटीची कर्जमाफी केली, असा डंका पिटला जातोय. पण त्याचा लाभ मिळालेला शेतकरी आम्हाला का सापडत नाही? तुम्हाला पीकविम्याची भरपाई नाही. पाणीही नाही. जय जवान, जय किसान असं म्हणतात. पण दोन्ही ठिकाणी घोटाळा होतो आहे. तरीही असं पाप करणाऱ्यांसमोर आम्ही हिंदुत्वाचा टाळ वाजवत उभं राहायचं का?
6. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं होतं. ते खरं झालं नाही. संसदेत त्याबद्दल प्रश्न विचारला. तर सरकार म्हणालं की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याची कुठलीही योजना नाही. दुसरीकडे पीकविमा योजनेत रफालसारखा घोटाळा असल्याचा आरोप ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ यांनी केला आहे. कांद्याला भाव मिळाला नाही. आता तो कांदा राखून ठेवा. यांना बेशुद्ध केल्यानंतर त्याचा उपयोग होईल.
7. सरकारनं गोवंश हत्या बंदी केली. गोवंशावरुन देशभरात अनेक ठिकाणी हिंसा झाली. लोकांचा जीव गेलवा. पण इकडे दुष्काळामुळे महाराष्ट्रात चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. गाई आणि गोवंश धोक्यात आहे. त्यांच्यासाठी सरकार काही करत नाही. शिवसेना आपल्या कुवतीप्रमाणे दुष्काळी भागात गोमाता आणि गोवंश वाचवण्यासाठी मदत करेल. ग्रामीण भागातील शिवसेना शाखा शेतकऱ्याचं आधार केंद्र बनतील.
8 .रफाल घोटाळ्यामुळे सरकारचं बिंग फुटलं. ज्यांना अनुभव नाही, अशा कंपनीला विमान बनवण्याचं कंत्राट दिलं. देशाचा पहारेकरी आहे, असं सांगणारे चोऱ्या करायला लागले. दुसरीकडे देशासाठी रोज सैनिक शहीद होतायत. त्यांच्या पगारवाढीचा प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारला. लष्करी जवानाचा पगार वाढवत नाही. पण शस्त्रखरेदीत घोटाळा करता. किती पाप करता? असा घणाघात त्यांनी केला.
9. एकतर डिजिटल इंडिया. सगळ्यांना मोबाईलचं वेड लावलं. सगळ्यांना कॉम्प्युटरचं वेड लावलं. आता तुमच्याआमच्या कॉम्प्युटर, मोबाईलमध्ये घुसणार. आता घुसताय कशाला? मी इथे बोलतोय.. काय करणार आहात? हे सरकार पुन्हा आणीबाणी आणतंय. जनतेच्या खासगी आयुष्यात घुसखोरी करतंय. तेव्हा यांनी उत्तर दिलंय, की हे काँग्रेसनंच सुरु केलं. काँग्रेसनं तसं केलं, मग तुम्ही का तसं करतंय? काँग्रेस जे करतंय तेच तुम्ही करणार असाल तर तुम्हीही उद्या आणीबाणी आणाल. पंतप्रधान जेलभरो योजना. इतक्या निर्लज्जपणाने कारभार करु नका.
10. दरवेळी निवडणुका आल्या की तुम्ही आम्हाला मूर्ख बनवता. 30 वर्ष होत आली, आज तुम्ही सांगता की हा मुद्दा न्यायालयात आहे. मग तुम्हाला आधी अक्कल नव्हती की हा मुद्दा कोर्टात जाईल म्हणून. संपूर्ण देशातले हिंदू तुम्ही अयोध्येत बोलावले. तुम्ही त्यांच्याकडून बाबरी पाडून घेतली. तिथं खूनखराबा झाला, बॉम्बस्फोट झाले. आजही कोर्टाच्या केसेस चालू आहेत. सोहराबुद्दीनचे आरोपी निर्दोष सुटले. पण बाबरी पाडणाऱ्यांना आजही समन्स येतायत. राम मंदिराच्या मुद्द्यावर तुम्ही गादी बळकावलीत. तर मग एक जाहिरात करा.. बाबरी पाडली.. होय मी लाभार्थी
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)