You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राहुल यांच्या 'शिकवणी'वरून काँग्रेस-भाजपात जुंपली
तीन राज्यात विजय मिळवल्यानंतर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करुन काँग्रेस आपल्या आश्वासनांची पूर्ती वेगानं करताना दिसतेय.
मंगळवारी राहुल गांधी हिवाळी अधिवेशनासाठी लोकसभेत आले होते. जिथं माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी त्यांना गराडा घातला. यावेळी राहुल यांनी रफाल, शेतकऱ्यांचे प्रश्न, नोटाबंदी सारख्या मुद्द्यांवरुन मोदी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली.
या व्हीडिओचा सुरुवातीचा भाग सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात मीडियासमोर येण्याआधी राहुल गांधी आपल्या पक्षाच्या नेत्यांशी काहीतरी बोलताना दिसत आहेत.
या व्हीडिओत आपण पाहू शकतो, की राहुल गांधी आपले सहकारी ज्योतिरादित्य शिंदे, अहमद पटेल, गुलाम नबी आझाद यांच्या गराड्यात आहेत. पण पत्रकार परिषद सुरु करण्याआधी राहुल यांना अहमद पटेल आणि ज्योतिरादित्य यांनी काहीतरी सांगितल्याचं दिसतंय.
या व्हीडिओत अहमद पटेल 'आय अग्री' म्हणताना स्पष्ट ऐकू येतंय, तर दुसरीकडे ज्योतिरादित्य राहुलना सांगतायत की 'जे मोदी करु शकले नाहीत, ते मी करुन दाखवलंय' असं म्हणतायत. ज्यावर राहुल गांधी सहमती दर्शवत आपली मान डोलावताना दिसत आहेत.
हा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड शेअर केला जातोय. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी हा व्हीडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअरही केलाय.
ज्यात त्यांनी म्हटलंय "आजकाल स्वप्नं दाखवण्यासाठीही शिकवणी घ्यावी लागते का?"
त्याला काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदींनी "स्वप्नं दाखवल्यानंतर त्यांना परत जुमला म्हणणं आणि खोटारडेपणा करण्याची शिकवणी तर फक्त भाजप कार्यालयातच मिळते" असं प्रत्त्युतर दिलं आहे.
त्यापुढे जाऊन त्यांनी " चला मॅडम, शिकवणी घेऊन तरी किमान पंतप्रधान मोदींनी एखादी पत्रकार परिषद घ्यावी. लोकांना खूप उत्तरं हवी आहेत. देश वाट बघतोय. आहे का मंजूर?"
आपल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साडेचार वर्षाच्या कारभारावर निशाना साधलाय.
आणि यानंतर मंगळवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी "माझ्या पंतप्रधानपदाच्या काळात मीडियाशी बोलताना मला अजिबात भीती वाटली नाही" असं म्हणत मोदींना टोला हाणलाय.
मनमोहन यांनी आपलं पुस्तक 'चेंजिंग इंडिया'चं प्रकाशन करताना म्हटलं "मी कही असा पतंप्रधान नव्हतो, ज्याला मीडियाशी बोलताना भीती वाटायची. मी नियमितपणे माध्यमांच्या प्रतिनिधींना भेटायचो. आणि ज्यावेळी मी परदेश दौऱ्यावर जायचो, तेव्हा परतल्यानंतर एक पत्रकार परिषद हमखास घ्यायचो"
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)