You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा, 1984 शीखविरोधी दंगल प्रकरणी दोषी
काँग्रेस नेते आणि माजी खासदार सज्जनकुमार यांना 1984 मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलीच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं असून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सत्र न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवत दिल्ली उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. सज्जन कुमार यांना 31 डिसेंबरपर्यंत शरण येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
34 वर्षांनंतर आलेल्या या निकालात कोर्टाने सज्जन कुमार यांना पाच लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
एप्रिल 2013मध्ये दिल्लीतल्या सत्र न्यायालयाने 1984 साली पाच शिखांची हत्या केल्याच्या प्रकरणात सज्जन कुमार आणि इतर सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली होती.
त्याविरोधात CBIने दिल्ली हायकोर्टात अपील केलं होतं.
दिल्ली कँटॉन्मेंट भागातील राजनगर परिसरात केहेर सिंग, गुरप्रित सिंग, रघुविंदर सिंग, नरेंद्र पाल सिंग आणि कुलदीप सिंग यांची हत्या झाली होती.
पोलीस आणि काँग्रेसची भूमिका संशयास्पद
दिल्ली हायकोर्टाने निकाल देताना म्हटलं, "1947 साली फाळणी झाली तेव्हा नरसंहार झाला होता. 37 वर्षांनंतर अशीच एक घटना पुन्हा घडली. आरोपींना राजकीय संरक्षणाचा फायदा मिळाला आणि ते कोर्ट केसेस टाळत राहिले."
पंजाबचे माजी उपमुख्यंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की 'शिखांचं शिरकाण करण्याचं काँग्रेसचं षड्यंत्र आता उघड झालं आहे.'
न्या. GT नानावटी आयोगाच्या शिफारशींनुसार 2005मध्ये सज्जन कुमार आणि आणखी दोन आरोपींविरोधात खटला दाखल करण्यात आला होता.
CBIने आरोपींच्या विरोधात जानेवारी 2010मध्ये आरोपपत्र दाखल केलं होतं.
याआधी या प्रकरणाची चौकशी दिल्ली पोलिसांतर्फे करण्यात आली होती. 2005 मध्ये खटल्याची चौकशी CBIच्या हातात गेली. त्यांनी कोर्टात सांगितलं की दंगलीत सज्जन आणि पोलिसांचं संगनमत होतं.
चारही बाजूला होत असलेल्या हिंसाचाराकडे दिल्ली पोलिसांनाी कानाडोळा केला होता, असं CBIने म्हटलं.
तक्रारीदरम्यान सज्जन कुमारांचं नाव तक्रारीतून वेळोवेळी वगळण्यात आल्याचा आरोप CBIने लावला होता. सज्जन कुमार काँग्रेसचे तीन वेळा खासदार होते. त्यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी शिखांनी वेळोवेळी निदर्शनं केली. काँग्रेस पक्षावर त्यांना पाठीशी घातल्याचा आरोप करण्यात आला.
'माझ्या वडिलांना जिवंत जाळलं'
या प्रकरणातल्या प्रत्यक्षदर्शी निरप्रीत कौर यांनी निकालावर समाधान व्यक्त केलं पण लढाई सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. "माझ्या वडिलांना जिवंत जाळलं. सज्जन कुमार जमावाचं नेतृत्व करत होते. एकही सरदार वाचायला नको, असं ते म्हणाले होते. आता ते सुप्रीम कोर्टात जातील. मी तिथेही माझी बाजू मांडेन. माझी लढाई सुरू राहील. अखेरच्या श्वासापर्यंत मी लढत राहीन."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)