विधानसभा निवडणूक निकाल: एवढ्या मतदारांनी केला 'नोटा'चा वापर #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. किती मतदारांनी केला 'नोटा'चा वापर?

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकालांबरोबरच किती लोकांनी None of the Above किंवा वरील उमेदवारांपैकी कुणीही नाही (NOTA) या पर्यायाचा वापर केला, ही आकडेवारीसुद्धा समोर येत आहे.

एबीपी माझानं ही बातमी दिली आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील बुधवारी सकाळच्या माहितीनुसार छत्तीसगडमध्ये सर्वाधिक दोन टक्के मतदारांनी, म्हणजेच सर्वाधिक 2,82,744 जणांनी नोटाचं बटण दाबलं.

मध्यप्रदेशात 1.4 टक्के म्हणजेच 5,42, 295 जणांनी नोटाचा वापर केला आहे तर राजस्थानात 1.3 टक्के म्हणजेच 4,67,781 जणांनी नोटाचा वापर केला.

तेलंगणात 1.1 टक्के म्हणजेच 2,24,709 जणांनी नोटाला पसंती दिलीय तर मिझोराममध्ये केवळ 0.5 टक्के म्हणजेच 2917 जणांनी नोटा वापरलाय.

2. नांदेड - परभणीतील 7 जणांचा प्रयागराज इथं बुडून मृत्यू

नांदेड आणि परभणीच्या दोन कुटुंबातील एकूण सात जणांचा प्रयागराज (आधीचं अलाहाबाद) इथे बुडून मृत्यू झाल्याची बातमी लोकसत्तानं दिली आहे.

या दोन कुटुंबातील एकूण 14 सदस्य प्रयागराजला गेले होता. त्यापैकी या कुटुंबातील 6 जण सुखरूप आहेत तर एक जण अजूनही बेपत्ता आहे.

नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यातील कोलंबी येथील रमेश बस यांच्या आईचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या अस्थिविसर्जनासाठी बस कुटुंबीय आणि परभणी जिल्ह्यातील दैठणा येथील कच्छवे कुटुंबीय प्रयागराज इथे आले होते.

इथल्या सरस्वती घाटावर सोमवारी त्यांची होडी उलटल्यामुळे सर्वजण नदीपात्रात पडले, अशी माहिती राजेश पवार यांनी दिली आहे.

3. दुष्काळी भागात चारा छावण्या - चंद्रकांत पाटील

"राज्यातील दुष्काळी भागात गरज आणि मागणी असेल तेथे चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महसूल आणि मदत-पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिली आहे," सकाळनं ही बातमी दिली आहे.

दुष्काळी उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची एक बैठक बोलावण्यात आली आहे. बैठकीला नऊ मंत्र्यांना बोलवण्यात आलं होतं. मात्र महादेव जानकर हे एकमेव मंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

चारा छावणी उभारण्यासंदर्भात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार कोण-कोणत्या भागात चारा छावण्यांची गरज आहे, याची पडताळणी करण्यास सांगण्यात आलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

4. पदवीधरांना सरकारी कंत्राटी नोकरी

राज्यातील पदवीधर उमेदवारांना विशेष बाब म्हणून कंत्राटी तत्त्वावर नोकरीची संधी देण्याचा धोरणात्मक निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

राज्य सरकार, सरकारच्या अखत्यारीतील संस्था आणि कंपन्यांतील रिक्त पदांवर उमेदवारांची कंत्राटी पद्धतीनं नेमणूक करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक कमी असल्यास बी.एड्., डी.एड्., उमेदवारांना अंशकालीन नियुक्तीस प्राधान्य देण्यात येणार आहे.

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीनं पदवीधर अंशकालीन उमेदवारांबाबतचा अहवाल सरकारला सादर केला होता. त्यानुसार राज्य मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला आहे, असं बातमीत म्हटलं आहे.

5. लग्नातील जेवणाच्या दर्जाबद्दल सर्वोच्च न्यायालयाची चिंता

लग्नातील जेवणाचा अपव्यय, त्याची सुरक्षितता आणि गुणवत्ता आणि पाण्याचा गैरवापर याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्ती केली आहे. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

या प्रकरणी चिंता व्यक्त करणाऱ्या एका 6 डिसेंबरच्या आदेशाकडे न्यायाधीश मदन लोकूर यांच्या खंडपीठाने दिल्ली सरकारचं लक्ष वेधलं.

"लग्नातील पाहुण्यांची संख्या मर्यादित राहावी आणि जेवणाचा दर्जा चांगला ठेवता यावा, तसंच पाण्याचा अपव्यय टाळता यावा, यासाठी पर्यायी व्यवस्था शोधण्याची गरज आहे," असं या खंडपीठाच्या न्यायाधीश दिपक गुप्ता आणि हेमंत गुप्ता यांनी या आदेशात म्हटलं होतं.

दिल्ली सरकार यावर काम करत आहे, असं दिल्लीचे मुख्य सचिव विजय कुमार देव यांनी न्यायालयापुढे स्पष्ट केलं आहे.

"लग्नात केटरर शिळं अन्न वापरत आहेत, अशा तक्रारी येत आहेत. यामुळे लोकांच्या आरोग्याशी संबंधित तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचं आम्ही पालन करू," असं देव यांनी स्पष्ट केलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)