You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तेलंगणा राष्ट्र समितीच्या दणदणीत विजयाची ही आहेत 4 कारणं
देशभरातील निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन पक्षांदरम्यानची लढाई असताना तेलंगणात के.चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील तेलंगणा राष्ट्रसमितीने दणदणीत विजय मिळवला. काय आहेत TRSच्या विजयाची कारणं?
बीबीसी तेलुगूचे संपादक GS राममोहन यांनी तेलंगणाचा विजयाचा अर्थ उलगडून सांगितला.
1. कल्याणकारी योजना
मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी नव्या राज्यातल्या जनतेसाठी भरमसाठ कल्याणकारी योजना जाहीर केल्या. या योजनांची काही प्रमाणात यशस्वी अंमलबजावणी हे राव आणि पर्यायाने TRSच्या निवडणुकीतील विजयाचा मंत्र आहे.
चंद्रशेखर राव यांनी शेतकऱ्यांसाठी राबवलेली योजना लक्षणीय ठरली. 'रायुतू बंधू' म्हणजेच 'शेतकऱ्यांचा मित्र' योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन पिकांसाठी मिळन प्रति एकर 8,000 रुपये देण्याचा निर्णय त्यांच्या सरकारने घेतला. अन्य राज्यांमध्ये शेतीशी निगडीत प्रश्नांनी सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणलं. मात्र राव यांच्या पक्षाला शेतकऱ्यांसाठी योजनेनं तारलं आहे.
तब्बल 43, 791 कोटी रुपये खर्चून मिशन भगीरथ योजना कार्यान्वित करण्यात आली. यानुसार प्रत्येक गावात पिण्याचं शुद्ध पाणी देण्यात येत आहे. कल्याणलक्ष्मी योजनेअंतर्गत लग्नासाठी आर्थिक साहाय्य देण्यात येतं. मायलेकांच्या आरोग्यासाठी अम्मा ओडी आणि केसीआर किट योजना राबवण्यात आली.
आरोग्यलक्ष्मी योजनेअंतर्गत गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक तसंच आजारी व्यक्तींना निधी पुरवण्यात येतो. डबल बेडरुम हाऊसिंग योजनेअंतर्गत गरीब जनतेला घरं देण्यात आली.
2. जातींसाठी योजना
राव प्रशासनाने जातीनिहाय योजना हाती घेतल्या. भिक्षुकी करणाऱ्यांना ब्राह्मणांना राव प्रशासनाने आर्थिक साहाय्य केलं. तेलंगणा मेंढीवाटप योजनेअंतर्गत 1 कोटी 28 लाख लोकांना मेंढ्यांचं वाटप करण्यात आलं.
प्रत्येक जातीसाठी काही ना काही योजना राव यांनी जाहीर केली आणि तो निधी त्या समाजापर्यंत पोहोचेल, याची काळजीही घेतली. त्यामुळे चंद्रशेखर राव यांचीही लोकप्रियता वाढली. लोकशाही व्यवस्थेतलं सरकार असलं तरी चंद्रशेखर राव यांचा कारभार एखाद्या सरंजामासारखा आहे. एखाद्या राजाप्रमाणे त्यांची प्रशासनावर हुकूमत आहे.
3. 'लार्जर दॅन लाईफ' प्रतिमा
तेलंगण राज्याच्या निर्मितीत चंद्रशेखर राव यांची भूमिका मोलाची आहे. त्यांनी केलेल्या आमरण उपोषणामुळे आणि नंतरच्या तीव्र आंदोलनामुळे या राज्याची निर्मिती शक्य झाली. त्यामुळे 'लार्जर दॅन लाईफ' अशी त्यांची प्रतिमा आहे.
मात्र त्याचवेळी त्यांचा मुलगा के.टी. रामा राव हा पक्षाचा आधुनिक चेहरा आहे. राज्यातील शहरांचं व्यवस्थापन याकडे त्यांनी लक्ष वेधलं. युवा मतदारांना आकृष्ट करण्यात के.टी. रामा राव यांचा मोठा वाटा आहे.
खेडोपाड्यात पोहोचलेले आणि त्यांच्यासारखं बोलणारे चंद्रशेखर राव आणि त्यांचा हायटेक मुलगा ही जोडी मतदारांना आश्वासक वाटली.
4. युतीचा काँग्रेसला फटका
तेलुगू देसम पार्टी आणि काँग्रेस यांच्यात झालेली युती तेलंगणा राष्ट्र समितीसाठी त्रासदायक ठरू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात TDPशी युती करणं काँग्रेसवर बुमरँग झालं. काँग्रेसचा स्वतंत्र तेलंगणाला विरोध होता. TDPनेही स्वतंत्र तेलंगणविरोधात भूमिका घेतली होती. या दोन पक्षांचं एकत्र येणं म्हणजे स्वतंत्र तेलंगण राज्याचे शत्रू एकत्र येण्यासारखं आहे, असा आरोप तेलंगणा राष्ट्र समितीने केला. तो मतदारांना पटला, असंच आकड्यांवरून दिसत आहे. टीडीपीशी युती करणं काँग्रेसच्या अंगलट आल्याचं चित्र निकालानंतर दिसतं आहे.
तेलंगणामध्ये TRSनं 88 जागा मिळवत सत्ता राखली आहे. तर काँग्रेसला फक्त 19 जागा जिंकता आल्या आहेत. भाजपला इथं 1 जागेवर समाधान मानावं लागलं. तर TDPनं 2 जागा जिंकल्या आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)