रामदास आठवलेंवर दलित समाज नाराज आहे का?

"केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर दलितांचा असलेला राग मी समजू शकतो, या रागाचं कारण त्यांनी डेल्टा मेघवाल, रोहीत वेमुल्ला, उना, भीमा-कोरेगाव प्रकरण आणि 2 एप्रिलच्या भारत बंदमध्ये जे मौन बाळगलं होतं, त्यात आहे."

रिपबल्किन पार्टी ऑफ इंडियाचे नेते असलेले रामदास आठवले यांना शनिवारी अंबरनाथमध्ये धक्काबुक्की झाली होती. त्यासंदर्भात आलेली ही प्रतिक्रिया आहे गुजरातमधील दलित नेते, आमदार जिग्नेश मेवानी यांची. मेवानी यांनी ही प्रतिक्रिया देताना आठवले यांच्याबद्दल दलितांच्या मनात राग आहे, पण अशा प्रकारे झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.

शनिवारी एका कार्यक्रमासाठी आठवले अंबरनाथ इथं होते, त्यावेळी हा प्रकार घडला. "माझी लोकप्रियता वाढत असल्यामुळेच माझ्यावर हल्ला झाला असावा पण माझ्या मनात कुणाबद्दल शत्रुत्त्वाची भावना नाही," असेही ते म्हणाले होते.

मेवानी यांनी यावर 8 डिसेंबरला हे ट्वीट केलं आहे.

मेवानी यांचे हे ट्वीट चारशेपेक्षा जास्तवेळा रीट्वीट झालं असून त्याला 2 हजारावर लाईक्स आणि 67 प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

एका प्रतिक्रियेत सौरभ दाबी म्हणतात ,"रामदास आठवले हे SC समजातील आहेत. समाजाचा फायदा त्यांनी फक्त स्वतःसाठी केला आहे. त्यांच्याविरोधात समाजात मोठा राग आहे."

तर उमाकांत माने यांनी जो व्यक्ती बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करेल त्याच्यासोबत असेच होईल, असं मत व्यक्त केलं आहे.

कोल्हापुरातील अभ्यासक आणि साहित्यिक प्रा. विनोद कांबळे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "रामदास आठवले जनाधार असलेले नेते आहेत आणि घडलेला प्रकार निषेधार्ह आहे. पण दलित तरुणांत आठवले यांच्याबद्दल नाराजी आहे ही वस्तुस्थिती आहे."

"सत्तेच्या बाजूने भूमिका घेण्याची त्यांची कृती अनेकांना आवडलेली नाही. झालेल्या प्रकारातून दलित समाजातील अंर्तविरोध पुढं आला असून ही बाब समाज म्हणून चांगली नाही," असं ते म्हणतात.

"भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर अॅड. प्रकाश आंबेडकर यांनाही पाठबळ वाढत आहे. रामदास आठवले महत्त्वाचे नेते आहेत त्यामुळे त्यांनी हा प्रकार का घडला याचा विचार केला पाहिजे," असं ते म्हणतात.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे म्हणाले, "मेवानी यांनी त्यांचं वक्तव्य पुन्हा एकदा तपासून घेणं आवश्यक आहे. रामदास आठवले यांना दलित आणि बहुजन समाजात मानणारा मोठा वर्ग आहे. मेवानी स्वतः डाव्या चळवळीशी जोडलेले आहेत, त्यांमुळे त्यांनी त्यांचं वक्तव्य एकदा तपासून पाहाण्याची गरज आहे."

"विद्यार्थी आणि तरुण हे प्रस्थापित सत्तेच्या विरोधात नाराज असतात. त्यांच्यात संघ आणि भाजपबद्दल नाराजी असू शकते. आठवले किंवा आमचा पक्ष संघाच्या भूमिकेबरोबर नाही," असं ते म्हणाले. आंबेडकरी चळवळीत रामदास आठवले यांनी मोठे त्याग केले आहेत, त्यांनी त्यांची चोख भूमिका निभावली आहे आणि ते समाजाचे महत्त्वाचे नेते आहेत, त्यांच्यावरील हल्ला हा चळवळीमधील बुजुर्ग नेत्यांवरील हल्ला आहे, असं ते म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)