नाशिकमध्ये कांद्याचे पडलेले भाव शेतकऱ्यांच्या जीवावर, 3 दिवसांत 2 आत्महत्या

    • Author, प्रवीण ठाकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी नाशिकहून

कांद्याला भाव न मिळाल्यानं नाशिकमधल्या शेतकऱ्यानं त्याचे आलेले तुटपुंजे पैसे पंतप्रधानांना मनिऑर्डर केले होते. तर आणखी एका शेतकऱ्यानं मिळालेल्या अल्प भावाच्या पैशांची मुख्यमंत्र्यांना मनिऑर्डर केली होती. आता मात्र तीन दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यात 2 कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

कांद्याला भाव न मिळाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या बागलान तालुक्यातील भडाणे या गावातील शेतकरी तात्याभाऊ खैरनार यांनी आत्महत्या केली.

खैरनार यांनी गुरुवारी दिनांक 6 डिसेंबर रोजी आपल्या कांद्याच्या शेतात जिथं कांदा साठवतात त्या चाळीत गळफास घेऊन आत्महत्या केली.

तात्याभाऊ यांची 2.25 एकर शेती होती, त्यांच्यावर एकूण 12 लाखाच्या आसपास कर्ज होतं, अशी माहिती भडाणेचे गावकरी वसंत पवार यांनी दिली. या कर्जामध्ये काही हात उसने घेतलेले पैसे तर एक परिचिताच्या नावावर घेतलेलं पीककर्ज होतं.

मागील वर्षी त्यांनी HDFC बँकेचं सहा लाखाचं कर्ज फेडलं होतं, त्यानंतर त्यांना सहज कर्ज मिळाले नाही म्हणून त्यांनी दुसऱ्याच्या नावावर कर्ज घेतलं होतं.

"मागील वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे कांद्याचं चांगलं उत्पादन झालं होतं. त्यानुसार त्यांनी यावर्षी उन्हाळी कांद्याची लागवड केली होती. त्यांना अपेक्षा होती की कांद्याच्या उत्पादनातून आपण कर्ज फेडून टाकू, पण या वर्षी पाऊस 50% झाला. त्यामुळे पीक योग्य प्रमाणात आलं नाही," असं पवार यांनी सांगितलं.

"गेल्या काही महिन्यात शिल्लक उन्हाळी कांद्याला हवा तसा भाव मिळालाच नाही, ते सटाणा आणि नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सतत चकरा मारत होते परंतु कांद्याच्या ढासळत्या भावाने चिंताग्रस्त होते. त्यांच्याकडे 400 ते 500 क्विंटल कांदा अजूनही शिल्लक होता," असं पवार पुढं म्हणाले.

अशातच कर्ज फेडीच्या निराशेने त्यांनी ज्या कांद्याच्या भरवशावर स्वप्न बघितली त्याच कांदाच्या चाळीत त्यांनी गळफास घेत आयुष्य संपवले, त्यांच्या मागे आई, पत्नी आणि दोन मुली आहेत. घरचा कर्ता पुरुष गेल्याने कुटुंब मात्र हवालदिल झालं आहे.

बागलानचे तहसीलदार प्रमोद इसे यांनी या आत्महत्येची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाला कळविली आहे.

"सदर आत्महत्या शेतकरी आत्महत्या असून शेतकरी कर्जफेडीच्या विवंचनेत होता ही माहिती मिळली आहे, तालुकास्तरीय चौकशी समिती योग्य माहिती घेऊन त्याचा अहवाल शासनास सादर करेल, त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळेल," अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी निवासी जिल्हाधिकारी शशिकांत मंगळूरे यांनी दिली आहे.

पिककर्जाचे अयोग्य वाटप?

गेल्या दोन वर्षांमध्ये सहकारी बँका आणि जिल्हा बँकेची गावागावात वेगवेगळ्या कार्यकारी सोसायट्यांमार्फत होणारा पत पुरवठा थांबला आहे, त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याचा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे स्थानिक नेते नाना बच्छाव यांनी केला आहे.

"ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर आधीच कर्जबोजा आहे, त्यात नवीन कर्ज मिळत नाहीये. राष्ट्रीय बँकेच्या किचकट प्रक्रियेत होणारा जाच यामुळे बागलाण सारख्या तालुक्यात जिथं 60 ते 70 हजार शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा व्हायच्या तिथं केवळ हजारभर शेतकऱ्यांना कर्ज मिळालं आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय," असं नाना बच्छाव यांनी म्हटलं आहे.

काही शेतकऱ्यांनी खासगी बँकांकडून कर्ज घेतलं आहे, असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे.

तालुक्यातील दुसरी आत्महत्या

याच तालुक्यातील सारदे गावातील मनोज धोंगडे या 33 वर्षीय शेतकऱ्यानं विष पिऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आलीये, प्रशासनाने या वृत्ताला दुजोरा दिलाय.

यावर्षी सुरुवातीपासूनच कांद्याला कमी दर मिळालंय, तर टोमॅटोनंही शेतकऱ्यांना नुकसानीत टाकलं. चालू वर्षात नाशिक जिल्ह्यात 104 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याच आठवड्यात नाशिक तालुक्यातल्या बबन सांगळे या शेतकरी मुलाने तर त्रंबकेश्वरमधल्या सावरपाडा गावातील रामचंद्र चौधरी यांनी 3 डिसेंबरला आपलं जीवन संपवलं.

बागलान तालुक्यात 4 डिसेंबरला नामपूरमध्ये सागर पवार यानं घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

वर्षभरात नाशिक जिल्ह्यात झालेल्या शेतकरी आत्महत्या

बागलान - 19

नाशिक - 5

चांदवड - 3

सिन्नर - 8

देवळा - 3

दिंडोरी - 16

इगतपुरी - 1

कळवण - 1

मालेगाव - 16

नांदगाव - 10

निफाड - 14

त्रंबकेश्वर - 4

येवला - 3

(स्रोत - टंचाई शाखा, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)