'अवनी'चे दोन बछडे राळेगावच्या जंगलात सुखरूप

    • Author, नितेश राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी, अमरावती

यवतमाळ जिल्ह्यातील नरभक्षक वाघीण T-1 अर्थात अवनी वाघिणीला मारल्यानंतर तिच्या दोन बछड्यांचं काय झालं, असा प्रश्न वनविभाग, पर्यावरणप्रेमी यांना सतावत होता. पण गुरुवारी वनविभागाला या दोन्ही बछड्यांचे फोटो मिळाले आहेत.

राळेगाव जंगलातील विहीरगाव परिसरात कॅमेरा ट्रॅपने पहाटे हे फोटो टिपले आहेत.

अवनीला 2 नोव्हेंबरच्या रात्री मारण्यात आले. त्यानंतर तिच्या बछड्यांचा भूकेने बळी जाईल की काय अशी भीती व्यक्त होत होती. पण आता या बछड्यांचे फोटो मिळून आल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे.

टी२ वाघ म्हणजेच या बछड्यांचे वडील वाघाची आंजी, सरवारखेड, विहिरगाव अशी भटकंती सुरू असल्याचं वनविभागाने सांगितलं आहे.

या बछड्यांना पडण्यासाठी वनविभाग प्रयत्न करत आहे.

हे फोटो अवनीच्या बछड्याचे असल्याचं प्रधान वनसंरक्षक (वन्यजीव) ए के मिश्रा यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

राळेगाव लोणी मार्गावर वनविभागाचा बेस कॅम्प आहे. बेस कॅम्पमधूनच वाईल्ड कन्झर्व्हेटर ट्रस्ट (WCT), स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स आणि वनकर्मचारी या बछड्यांना पडकण्याचा प्रयत्न करत आहेत.

बोराटी गावाच्या जंगलात बछड्यांना खाद्य मिळावं म्हणून बकऱ्या बांधण्यात आल्या आहे. त्यांच्यावर ट्रॅप कॅमेऱ्याची नजर आहे. परंतु बछड्यानी बकऱ्यांना खाल्ले नाही, ही बाब वनविभागाची चिंता वाढवणारी होती.

चंद्रपूरमधील वाघीण सुखरूप

चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना जंगलातून जाणाऱ्या रेल्वे रुळावर वाघाच्या 3 बछड्यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली होती. या बछड्यांच्या आईचा फोटो वनविभागाला मिळाला आहे.

बछड्यांचा मृत्यू झाल्याच्या 200 मीटर परिसरात या वाघिणीचा फोटो कॅमेरा ट्रॅपने घेता आला आहे. ही वाघीण बछड्यांचा शोध घेत असल्याने ती हिंस्र होऊ शकते, त्यामुळे गावातील लोकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)