राज 'भैय्या' ठाकरे मुंबईतील उत्तर भारतीय पंचायतीत का जात आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, राहुल रणसुभे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"माझा पक्ष मराठी संस्कृती आणि मराठी माणसांसाठी संघर्ष करत राहील. उत्तर प्रदेश आणि बिहारी लोकांच्या गुंडगिरीला आम्ही जोरदार उत्तर देऊ," राज ठाकरे यांनी 2008मध्ये घेतलेली ही भूमिका सर्वश्रुत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वेळोवेळी परप्रांतीय लोकांविरुद्ध केलेली आक्रमक आंदोलनं देशाने पाहिली आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांनी परप्रांतीय फेरीवाले, व्यावसायिक यांना मारहाण केल्याच्या बातम्याही महाराष्ट्राला नवीन आहेत.
अशी स्थिती असताना उत्तर भारतीयांनी एखाद्या कार्यक्रमाला राज ठाकरेंना निमंत्रित केलं आणि राज ठाकरे यांनी हे निमंत्रण स्वीकारलं तर त्यातून राजकीय अर्थ शोधले जाणे सहाजिकच आहे. 2006ला स्थापना झालेल्या मनसेच्या एका तपाच्या राजकारणातील आतापर्यंतच्या भूमिकेच्या पलीकडे जाणारी ही भूमिका असल्याने त्याला राजकीय महत्त्व आहे.
आज 2 डिसेंबरला कांदिवली इथं उत्तर भारतीय महापंचायत संघाच्या कार्यक्रमात राज ठाकरे उत्तर भारतीय लोकांशी संवाद साधणार आहेत. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्वीटरवर ही माहिती दिल्यानंतर यावर जोरदार चर्चा सुरू झाली.
बीबीसी मराठीशी बोलताना देशपांडे म्हणाले, "उत्तर भारतीय महापंचायतने राज ठाकरे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. तेथील उत्तर भारतीयांची ही तिसरी-चौथी पिढी आहे. त्यांचे म्हणणे होते की, त्यांना राज यांचे विचार पटतात, मात्र काही माध्यमं आणि उत्तर भारतीय नेते राज ठाकरेंचे विचार मोडून तोडून सांगतात. त्यामुळे थेट राज यांच्याशी त्यांना संवाद साधायचा आहे. त्यांनी पाठवलेलं निमंत्रण राज यांनी स्वीकारलं आहे."
'सकारात्मक राजकारणाचे स्वागत'
महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राचे वरिष्ठ सहायक संपादक विजय चोरमारे म्हणाले, "राज ठाकरेंच्या या भूमिकेचे स्वागत करायला हवं. कारण आतापर्यंत ते जी भूमिका मांडत होते त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न पहिल्यांदाच त्यांनी केला आहे. कोणताही पक्ष सुरुवातीला वाढीसाठी काहीशी आक्रमक आणि संकुचित भूमिका घेताना दिसतो. मात्र जसजसे पक्षाचे वय वाढते तसा विकास व्हायला लागतो. राज ठाकरेंचा हा निर्णय म्हणजे मनसेच्या विकासाच्या प्रक्रियेतील हा महत्त्वाचा टप्पा आहे. द्वेषातून काहीही साध्य होत नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधातील आक्रमक भूमिकेपेक्षा त्यांच्याशी जाऊन संवाद साधणे हा योग्य मार्ग आहे."

फोटो स्रोत, Getty Images
"हे राजकीय असू शकतं. मात्र राजकारण जर सकारात्मक असेल तर हरकत काय. चांगल्या गोष्टी घडत असतील, अशा राजकारणाचं स्वागत झालं पहिजे," असं ते म्हणाले.
'उत्तर भारतीयांविरोधातील भूमिका स्पष्ट करावी'
राज ठाकरेंच्या या भूमिकेबद्दल बीबीसी मराठीने काँग्रेसची बाजू जाणून घेतली.
काँग्रेसचे आमदार नसीम खान म्हणाले की, "राज ठाकरेंना एखाद्या समाजाच्या किंवा संस्थेच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाल्यानंतर ते तिथे जात असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे. मात्र मनसेची स्थापना झाल्यापासून त्यांनी वेळोवेळी उत्तर भारतीयांच्या विरोधातच भूमिका घेतली आहे. उत्तर भारतीय टॅक्सीवाले, रिक्षावाले यांच्या विरोधात आंदोलन असो किंवा रेल्वे भरती परीक्षेविरोधातील आंदोलन, मनसेची भूमिका नेहमीच 'उत्तर भारतीय विरुद्ध' राहिली आहे. त्यामुळे आता जर ते उत्तर भारतीय नागरिकांनी आयोजित कार्यक्रमाला जाणार असतील तर त्यांच्या आतापर्यंतच्या भूमिकेबद्दल त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. राजकारण व्हावं मात्र ते स्वच्छ राजकारण व्हायला हवं."
'उत्तर भारतीयांची माफी मागावी'
मुंबई काँग्रसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांच्या या निर्णयाचे स्वागतच आहे, पण या कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी उत्तर भारतीय समाजाची माफी मागावी, त्यानंतरच उत्तर भारतीय समाज त्यांना स्वीकारेल, असे वक्तव्य निरुपम यांनी केले आहे. निरुपम यांची भूमिका जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने त्यांच्याशी संपर्क साधला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
थेट संवादासाठी आमंत्रण
या संदर्भात उत्तर भारतीय महापंचायतचे अध्यक्ष विनय दुबे यांच्याशी आम्ही संवाद साधला.
ते म्हणाले, "उत्तर भारतीय समाज आणि मनसे यांच्यात जो काही विसंवाद आहे आणि संवादासाठी कोणताही प्लॅटफॉर्म नव्हता तो केवळ उपलब्ध करून देण्यासाठीच आम्ही राज ठाकरे यांना बोलावलं आहे."
"मराठी माणूस आणि मराठी भूमिका यावर मनसे ठाम आहे. यात कसलाच बदल झालेला नाही. या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तर भारतीयांच्या मनात जे काही मनसे अथवा राज ठाकरे यांच्या बाबतचे प्रश्न आहेत ते विचारण्यात येतील. कारण आतापर्यंत काही नेते अथवा माध्यमं राज ठाकरे यांचे विचार मोडूनतोडून दाखवायचे त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट राज ठाकरे यांचे विचार उत्तर भारतीयांना ऐकायला मिळतील आणि त्यांच्या मनातील जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं मिळतील.

फोटो स्रोत, BBC/RahulRansubhe
"राज ठाकरेंचे काही मुद्दे जरी बरोबर असले तरी त्यांचं उत्तर मारहाण, तोडफोड हे नाही. आम्ही लोकांसमोर, मीडियासमोर राज ठाकरेंना या प्रश्नांची उत्तरं मागणार आहोत आणि तेही उत्तरं देतील अशी अपेक्षा आहे.
'संजय निरुपम आग लावणारे'
संजय निरूपम यांच्याबाबत विचारल्यावर विनय दुबे म्हणाले, "त्यांच्यासारखे लोक नेहमी आग लावायचा प्रयत्न करतात. निरुपमच म्हणतात की, मुंबईत मराठी माणूस आणि उत्तर भारतीय हे भावा-भावाप्रमाणे राहिले पाहिजेत. मात्र आता त्यादिशेनं प्रयत्न होत आहेत तर ते त्यांना पचत नाहीये. जर या कार्यक्रमाबद्दल निरुपम यांनी काहीही स्टेटमेंट दिलं तर मनसेनं उत्तर देण्याआगोदर उत्तर भारतीय समाजच त्यांचा विरोध करेल. कारण निरूपम हे त्यांच्या फायद्यासाठी राज ठाकरे यांच्याबद्दल काहीही बोलतात आणि त्याचे परिणाम निष्पाप उत्तर भारतीय टॅक्सीवाले आणि रिक्षावाल्यांना भोगावे लागतात.
कार्यक्रमाचे स्वरूप
२ डिसेंबरला कांदिवली पश्चिमच्या भूराभाई हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. यात राज ठाकरे एकटे स्टेजवर असतील. या कार्यक्रमात कोणताही व्हीआयपी गेस्ट नसेल. या कार्यक्रमाला येणारे लोक हे रिक्षावाले, टॅक्सीवाले, भाजीवाले आणि कष्टकरी गरीब लोक असणार आहेत. या कार्यक्रमात मराठी भाषा किंवा उत्तर भारतीय नकोत, अशा प्रकरच्या सामान्यांच्या मनातल्या प्रश्नांना उत्तरं मिळणार आहेत, अशी माहिती दुबे यांनी दिली आहे.
मनसे आणि उत्तर भारतीय वाद
मनसेने वेळोवेळी उत्तर भारतीयांना विरोध केला आहे. त्यातील काही नोंदी अशा :
- 2008 - रेल्वे भरतीच्या परिक्षेसाठी महाराष्ट्रात आलेल्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना रेल्वे स्टेशनवर मारहाण. एका मुलाचा मृत्यू.
- 2011 - उत्तर भारतीय रिक्षावाल्यांना मारहाण. काहींच्या रिक्षा फोडल्या.
- 2017 - एल्फीन्स्टन दुर्घटनेनंतर मुंबईतील फेरीवाल्यांविरोधात आंदोलन, अनेक फेरिवाल्यांना मारहाण.
सोशल मीडियावर जोरदार चर्चा
राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवरही प्रतिक्रिया आल्या आहेत. 'बिनधास्त बानू'च्या आजच्या टिपणीवर प्रतिक्रिया देताना विलास तोरकड म्हणतात, "हमार राज भैय्या आवत है." तर शशांक ढवळीकर यांनी राज ठाकरे यांना 'राजा बाबू' म्हटलं आहे.

राज ठाकरे मतांसाठी काहीही करतील, अशी टीका महादेव केसरकर यांनी दिली आहे.

तर अविनाश माळवणकर यांनी राज ठाकरे यांचं समर्थन केलं आहे. "राज ठाकरे मराठी माणसांना कधीच विसरणार नाहीत," असं ते म्हणाले.

हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








