You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'मुख्यमंत्र्यांना समजायला हवं की कोणाला मंत्री करायचं' - मनेका गांधी मुनगंटीवारांवर कडाडल्या
"मुख्यमंत्र्यांना समजायला हवं की कोणाला मंत्री करायचं? अशा लोकांची पक्षात आवश्यकता आहे का?"....हे उद्गार आहेत केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांचे. News18शी बोलताना त्यांनी अवनीबद्द्लचा संताप व्यक्त केला.
तत्पूर्वी, अवनी वाघिणीला वनविभागाने शुक्रवारी ठार केल्यानंतर राज्य सरकारवर टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. रविवारी दुपारी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी त्यांच्याच पक्षाच्या वनमंत्र्यांवर टीका केली आहे. ही हत्या गुन्हाच असून हे प्रकरण आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेणार आहोत असं त्या म्हणाल्या आहेत. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी केलेले आरोप मुनगंटीवार यांनी फेटाळले आहेत.
बीबीसी मराठीचे प्रतिनिधी संकेत सबनीस यांच्याशी बोलताना मनेका गांधी म्हणाल्या की, "अवनी वाघिणीला वन विभागाने नाही तर एका खासगी शूटरने मारलं आहे. याचाच अर्थ तो हे काम करण्यासाठी अनधिकृत व्यक्ती होता. एका राष्ट्रीय प्राण्याला मारण्यासाठी खासगी माणसाला बोलवणं हा मूर्खपणा आहे. या माणसाविरोधात गंभीर आरोप आहेत. त्याच्यावर वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप आहे, हैदराबादमध्ये एकाचा खून केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तसंच, त्याचा बंदुक तस्करीत सहभाग असल्याचा आरोप आहे. हा माणूस जेलमध्येही जाऊन आला आहे. मग, हाच माणूस महाराष्ट्र शासनाला मिळाला का?"
"पण, केवळ वाघिणीला मारण्यासाठी भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गोंधळ घालून या शूटरला बोलवलं. मुनगंटीवारांनी या शफाकतला पहिल्यांदाच नव्हे तर अशी कामं करण्यासाठी बऱ्याचदा बोलवलं आहे. गेल्या ३ वर्षांत शफाकत यांनी १० बिबटे, २ वाघ, ३ हत्ती, ३०० रानडुक्कर मारली आहेत. हा मूर्खपणा आहे. मी या प्रकरणी थेट आदेश देऊ शकत नसले तरी, हे प्रकरण मी स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे लावून धरणार आहे," असंही गांधी यांनी स्पष्ट केलं.
यवतमाळ परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून फिरत असलेल्या 'नरभक्षक' वाघिणीला शुक्रवारी रात्री उशिरा राळेगांव तालुक्यातील बोराटी गावात ठार करण्यात आलं. T1 किंवा अवनी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या सहा वर्षांच्या वाघिणीने 14 जणांचा जीव घेतल्याचा आरोप होता.
या वाघिणीच्या शिकारीनंतर महिला आणि बालकल्याण केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. "या वाघिणीला ठार करण्यासाठी हैदराबाद येथे राहणारे शिकारी शाफत अली खान यांना बोलवण्यात आलं होतं. त्यांनी आतापर्यंत तीन वाघ, 10 बिबटे, काही हत्ती आणि 300 रानडुकरं ठार केली आहेत. अशा माणसाला हे काम देण्याची गरजच काय," असा प्रश्न त्यांनी ट्विटरवर विचारला आहे.
"वाघिणीच्या मृत्यूनंतर तिच्या बछड्यांचं काय होईल हा देखील प्रश्न आहे. प्राण्यांबाबत जराही संवेदनशीलता नसल्याचं यातून दिसत आहे. मी हे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे घेऊन जाणार आहे," त्या सांगतात.
"वनअधिकाऱ्यांची ही जबाबदारी होती आधी तिला बेशुद्ध करायचं आणि मग तिला जेरबंद करायचं पण तिला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशावरून मारण्यात आल्याचं त्या म्हणाल्या. अनेक जणांनी विनंती केली होती की त्या वाघिणीला पकडा पण मुनगंटीवारांनी कोणाचं ऐकलं नाही," असं त्यांनी म्हटलं आहे.
सुधीर मुनगंटीवार काय म्हणतात?
बीबीसी मराठीचे प्रतिनिधी तुषार कुलकर्णी यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी केलेले आरोप मुनगंटीवार यांनी फेटाळले.
"मनेका गांधी यांच्यापर्यंत पूर्ण माहिती पोहोचलेली नसू शकते त्यातून त्यांनी हे विधान केलं असावं," मुनगंटीवार सांगतात.
"वाघिण नरभक्षक झाली होती. तिने 13 जणांची हत्या केली होती. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण होतं. त्यामुळेच सुप्रीम कोर्टानं आदेश दिला की वाघिणीला जेरबंद करा आणि ते शक्य नसल्यास ठार करा. त्यानुसार वनविभागाची टीम 2 महिने वाघिणीच्या मागावर होती. जेव्हा ती सापडली तेव्हा तिला डार्ट मारण्यात आलं. पण तरीदेखील ती बेशुद्ध झाली नाही. वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर ती हल्ला करणार होती. त्यात आणखी एक जीव जाऊ शकला असता. बचाव म्हणून कर्मचाऱ्यांनी तिला ठार केलं," मुनगंटीवार सांगतात.
वाघिणीला ठार करण्यासाठी शाफत अली खान यांची नियुक्ती करण्यात आली होती का? असं विचारलं असता मुनगंटीवार म्हणाले, "शाफत अली खान हे त्या घटनेच्या वेळी तिथं नव्हते. बिहार सरकारच्या वनविभागाने त्यांची नियुक्ती मार्गदर्शक म्हणून केली आहे. या वाघिणीच्या शिकारीची त्यांचा संबंध नाही. मनेका गांधी या दिल्लीत आहेत तिथं त्यांना पूर्ण माहिती मिळणं शक्य नाही. त्यामुळे गैरसमजातून त्यांनी त्यांचं नाव घेतलं असावं."
दोन बछड्यांचं काय होईल असं विचारलं असता मुनगंटीवार म्हणाले, "वनविभाग त्यांचा शोध घेत आहे. शास्त्रीय पद्धतीने त्यांचा शोध घेण्यात येईल आणि ते सापडल्यावर त्यांची योग्य ती काळजी घेण्यात येईल."
"ही कामगिरी करताना सर्व नियमांचं पालन झालं आहे. परिसरात 13 जणांचा बळी गेल्यामुळे भीतीचं वातावरण होतं आता ते नाहीसं झालं आहे," मुनगंटीवार सांगतात.
शिकार मंत्रालय
युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी वनविभागाचं नाव बदलून शिकार मंत्रालय ठेवा अशी टीका केली होती. "वाघिणीला बेशुद्ध करून दुसऱ्या ठिकाणी हलवणं सोपं होतं. पण तसं इथं झालं नाही. या मुद्द्यावरून आम्हाला राजकारण करायचं नाही. पण ही गोष्ट निसर्गाशी निगडित आहे," असं त्यांनी ट्विट केलं.
"ज्या प्रमाणे एखादा विजेता त्याला मिळालेली ट्रॉफी सगळीकडे मिरवतो अगदी तसंच अवनीला ठार केल्यानंतर वनविभागानं केलं आहे," असं ठाकरे म्हणाले.
अवनीला कसं ठार मारलं?
शुक्रवारी रात्री या परिसरात ग्रामस्थांना तसेच बोराटी वारूड मार्गावरील वाहनचालकांना ही वाघीण दिसली होती. ग्रामस्थांनी वनकर्मचाऱ्यांनी तशी कल्पना दिली आणि लगेच पॅट्रोलिंग टीमने आधी गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आणि मग मोहीम सुरू केली, असं या पत्रकात म्हटलं आहे.
वाघिणीची ओळख पटल्यानंतर टीममधील एक सदस्य शेख यांनी वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारला. तो डार्ट वाघिणीला लागला, पण वाघिणीने मागे जात पुन्हा हल्ला केला. यावेळी हे कर्मचारी जिप्सीमध्ये होते.
स्वरक्षणासाठी असगर यांनी 8 ते 10 मीटर अंतरावरून गोळी झाडली. त्यात ही वाघीण जागेवरच मेली.
या परिसरात वाघिणीने मारलेल्या तीन व्यक्तींचे आणि काही जनावरांच्या शरीरांचे अवशेष सापडले आहेत, असं वनविभागाने म्हटलं आहे.
वन विभागाचं काय आहे म्हणणं?
25 ऑक्टोबरला एका शेतातील मचाणाखाली शलीक आसोले या गावकऱ्याला ही वाघीण दिसली होती. वाघिणीच्या आक्रमकतेमुळे त्यांनी ती रात्र मचानीवरच घालवली होती. त्यानंतर या परिसरात गस्त वाढवली होती. शेतात कापणीला आलेलं पीक उभं असल्याने बहुतांश शेतकरी रात्री शेतातच गस्त घालतात. म्हणून त्यांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने जास्त सुरक्षेच्या उपाययोजना केल्या होत्या.
बीबीसी मराठीशी बोलताना मुख्य वनाधिकारी A. K. मिश्रा म्हणाले, "गेल्या दोन महिन्यांपासून आमची ही मोहीम सुरू होती. कोर्टाच्या ऑर्डरनंतर आमच्या मोहिमेला वेग आला. यात दोन मुख्य टप्पे होते - एक तर त्या वाघिणीला जेरबंद करणे आणि दुसरं म्हणजे गावकऱ्यांचे मृत्यू रोखणे. या दोन ध्येयांसाठी वेगवेगळे गट कामाला लागले होते."
"जंगलात लागलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यांद्वारे मग आम्ही नजर ठेवायचो की कुठे काही हालचाल होतेय का. जर काही निदर्शनास आलं तर मग आमच्या ट्रेकिंग टीम जंगलाच्या त्या भागात जायच्या. साधारण 6-7 जणांच्या 10 टीम अशा रोज निघायच्या. जर कुठे काही संभाव्य धोका लक्षात आला तर आमच्या बेस कँपवर असलेल्या बाकीच्या टीमला सक्रिय केलं जायचं," असं त्यांनी पुढे सांगितलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)