सरदार पटेल : पुतळ्याला विरोध करणाऱ्या आदिवासींची धरपकड

गुजरातमधल्या नर्मदा जिल्ह्यात साकारण्यात आलेल्या जगातील सर्वांत उंच 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' या सरदार पटेल यांच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्या स्थानिक आदिवासींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

भारताचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल यांच्या 182 मीटर उंच पुतळ्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे.

या पुतळ्याला विरोध करणाऱ्या जवळपास 90 आदिवासी लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा आदिवासी नेत्यांनी केला आहे.

तर अशी कोणतीही कारवाई झाली नसल्याचं नर्मदा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आर. एस. निगामा यांनी बीबीसीला सांगितलं.

स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळा परिसरातून जवळपास 90 लोकांना ताब्यात घेतलं असल्याचं स्थानिक आदिवासी नेते आनंद मझगावकर यांचं म्हणणं आहे.

"ताब्यात घेतलेल्यांना कुठं ठेवण्यात आलं आहे, याबाबत काहीही माहिती दिली नाही," असं ते म्हणाले.

जवळच्या आमलेठा पोलीस स्टेशनचे निरीश्रक एम. ए. पारमार यांनी 5 लोकांना आमलेठा पोलीस हद्दीतून ताब्यात घेतल्याचं सांगितलं.

स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळ्याला विरोध करणाऱ्या भिलिस्तान टायगर सेना (BTS) आणि इतर संघटनेच्या 16 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यता घेतल्याचं डेडियापाडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी नरान वसवा यांनी बीबीसीला सांगितलं.

स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या विरोधात बंद

स्टॅच्यू ऑफ युनिटी या पुतळ्याला विरोध म्हणून आदिवासी लोकांनी आज बंदची हाक दिली आहे. स्थानिक लोक अनेक दिवसांपासून स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळ्याचा विरोध करत आहेत.

या 'बंद'मध्ये अंबाजीपासून उमरगाम जिल्ह्यातील गावांनी सहभाग घेतला असल्याचं सांगितलं जात आहे.

मध्य गुजरातमधल्या छोटा उदयपुर, पंचमहल, वडोदरा आणि नर्मदा इथल्या आदिवासींनी जलसमाधी घेण्याचा इशाराही दिला आहे.

स्टॅच्यू ऑफ युनिटीला विरोध का होत आहे?

पुतळ्यावर सरकारी पैसा खर्च करण्यापेक्षा तो पैसा इथल्या आदिवासी लोकांच्या विकासासाठी खर्च करता आला असता, असं आदिवासी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

या भागातील 22 गावांतील आदिवासींनी पंतप्रधानांना पत्र लिहून पुतळ्याच्या अनावरणासाठी येणाऱ्या पंतप्रधान मोदींचं स्वागत करणार नाही, असं म्हटलं आहे. स्थानिक आदिवासी नेत्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)