सरदार पटेल यांचा जगातला सर्वांत उंच पुतळा कसा बनला माहितीये?

    • Author, डॉ. देवांशू पंडित
    • Role, बीबीसी गुजरातीसाठी

नर्मदा नदीवर बनलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा हा चर्चेचा विषय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 31 ऑक्टोबर 2018 रोजी या पुतळ्याचं अनावरण होणार आहे.

गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यात नर्मदा नदीतल्या साधू बेटावर सरदार सरोवर प्रकल्पाजवळ हा पुतळा आहे.

या पुतळ्याची उंची 182 मीटर आहे. या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी असं म्हटलं जाणार असून हा जगातला सर्वांत उंच पुतळा आहे. ज्या संस्थेअंतर्गत या पुतळ्याचं व्यवस्थापन होणार आहे त्या ट्रस्टचं नाव सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल इंटिग्रेशन ट्रस्ट असं आहे.

सर्वांत उंच पुतळा

हा पुतळा ज्या पायावर आहे तो पाया 25 मीटर उंच आहे आणि पुतळ्याची उंची 167 मीटर आहे. या दोन्हीची एकत्र उंची 182 मीटर होते. स्टॅच्यू ऑफ यूनिटीची उंची न्यूयॉर्कच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या जवळपास दुप्पट आहे.

सध्या जगातला सर्वांत उंच पुतळा चीनमध्ये आहे. गौतम बुद्धाच्या 'स्प्रिंग टेंपल बुद्ध' नावाच्या या पुतळ्याची उंची 128 मीटर आहे. पण अरबी समुद्रात 2021पर्यंत बनून तयार होणाऱ्या शिवस्मारकाची उंची स्टॅच्यू ऑफ युनिटीपेक्षाही आठ मीटर जास्त असेल.

किंमत

या प्रकल्पाची नियोजित किंमत 2,232 कोटी रुपये आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 42 महिने लागले. तोपर्यंत सर्व खर्च 3,000 कोटी रुपये झाला असं सांगण्यात आलं आहे.

प्रकल्पाचं डिजाईन

दुबईच्या बुर्ज खलिफाचं व्यवस्थापन ज्या कंपनीने केलं त्या टर्नर कन्सल्टंट कंपनीची नियुक्ती प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून करण्यात आली. या कंत्राटदाराची निवड, रोजचं व्यवपस्थापन, गुणवत्ता नियंत्रण हे अधिकार त्यांचेकडे देण्यात आले.

2014 साली लार्सन अॅंट टुब्रो कंपनीची निवड प्रत्यक्ष बांधकाम करणारी कंपनी म्हणून करण्यात आली. पुतळ्याचं स्थापत्य कसं असेल, त्याचं डिजाइन ठरवण्यासाठी त्या-त्या विषयातल्या तज्ज्ञ कंपन्यांची निवड करण्यात आली. तसंच हा प्रकल्प नदीच्या बेटावर होईल म्हणून पूर आणि भूगर्भजलतज्ज्ञांची मदतही घेण्यात आली.

बांधकाम

पूर्ण अभ्यास झाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली. पाया बांधणं आणि त्यावर नंतर पुतळा उभं करणं असं दोन स्तरात हे काम करावं लागलं.

सुरुवातीला पाया बांधण्यात आला. त्यानंतर मेझानाइन फ्लोअर बांधण्यात आलं. नंतर पुतळा ज्यावर उभं करण्यात आला आहे तो चौथरा बनवण्यात आला. या ठिकाणी एक गॅलरी उभी करण्यात आली आहे. जिची क्षमता 200 लोकांची आहे.

जवळपास 2,500 कर्मचाऱ्यांनी या स्मारकाच्या निर्मितीचं काम केलं आहेत. त्यात काही चीनी कामगारांचासुद्धा समावेश आहे.

धातूचा वापर

स्टॅच्यू ऑफ युनिटीचं वजन 67,000 मेट्रिक टन आहे. भूकंप, पूर किंवा सोसाट्याचा वारा यापासून संरक्षण व्हावं अशी रचना करण्यात आली आहे.

स्टॅच्यू ऑफ युनिटीचा पाया 45 मीटर खोल खोदण्यात आला आहे. हे खोदकाम करताना नर्मदेला धोका होणार नाही याची काळजी घेण्यात आल्याचं अधिकारी सांगतात.

सुरक्षा

या पुतळ्याची उंची पाहता सोसाट्याचा वारा आल्यावर हा पुतळा तग धरेल की नाही अशी शंका होती. त्यासाठी या क्षेत्रातल्या नामवंत कंपनी RWID यांची मदत घेण्यात आली. 60 मीटर प्रतीसेकंद या वेगानं जरी वारा आला तरी या पुतळ्याला काही होणार नाही.

हा उभा पुतळा आहे त्यामुळे त्याचं डिजाइन बनवणं हे आव्हानात्मक होतं. रुंदी आणि उंची प्रमाणबद्ध बनवण्यासाठी इंजिनिअर लोकांना डिजाइनवर खूप काम करावं लागलं.

प्रकल्पासाठी 22,500 मेट्रिक टन सिमेंट वापरण्यात येईल असा अंदाज होता. सिमेंटबरोबरच 18,500 मेट्रिक टनाच्या लोखंडी सळ्या वापरण्यात येतील असाही अंदाज होता. जर सामान्य प्रकारचं सिमेंट वापरलं तर त्यामुळे लोखंड गंजण्याची शक्यता होती म्हणून M65 या ग्रेडचं सिमेंट वापरण्यात आलं. त्यामुळे लोखंड गंजत नाही.

लोहपुरुषाचा पुतळा कांस्याचा

हा पुतळा बनवण्यासाठी 12,000 कांस्य पॅनेलचा वापर करण्यात आला आहे. या पुतळ्यासाठी 1850 टन कांस्य लागलं. हे पॅनल्स चीनकडून बनवून घेण्यात आल्यामुळे वाद निर्माण झाला होता. हा पुतळा राम सुतार यांनी बनवला आहे.

इतक्या उंचीचा पुतळा आधी कुणीच बनवला नसल्यामुळे त्यांनी आधी प्रयोग करुन पाहिले. सुरुवातीला त्यांनी तीन फुटाचा पुतळा बनवला, नंतर 6 फुट असं करत करत योग्य मोजमापाचा अंदाज घेऊन हा पुतळा त्यांनी बनवला.

( डॉ. देवांशू पंडित यांनी या प्रकल्पाशी निगडित कागदपत्रं, वेबसाइटचा अभ्यास तसंच तज्ज्ञांशी बोलून ही माहिती संकलित केली आहे. )

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)