You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मनुस्मृती जाळतच राहणार, जीवे मारण्याच्या धमक्यांना घाबरत नाही - छगन भुजबळ
- Author, प्रविण ठाकरे आणि गणेश पोळ
- Role, बीबीसी मराठीसाठी
धमकीचं पत्र आल्याच्या वृत्ताला छगन भुजबळ यांनी दुजोरा देत आपण कुणाला घाबरत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
"अशा पत्रांना मी काही फारशी किंमत देत नाही. कुणी अशी धमकीची पत्रं दिल्यानं मी माझं काम थांबवणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी तो मनुस्मृती ग्रंथ जाळला आणि देशाला संविधान देऊन सगळ्यांना समतेचा अधिकार दिला. मग 5 हजार वर्षं आमच्यावर अन्याय करणारा मनुस्मृती त्या विचारांना परत आणत असेल तर तो आम्ही परत परत जाळणार. त्यांच्या विरुद्ध बोलणार, मी कुणालाही घाबरत नाही," असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना ठार मारणाच्या धमकीचं तीन पानी पत्र आलं आहे. "शिवप्रतिष्ठानचे भिडे गुरुजी यांच्या विषयी कोणतीही टिपण्णी करू नका अन्यथा तुमचा दाभोळकर, पानसरे होईल," असा पत्रातील मजकुराचा आशय आहे. यासंदर्भात नाशिकमध्ये पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. रविवारी सकाळी भुजबळ यांच्या नाशिकमधल्या भुजबळ फार्मच्या पत्त्यावर हे पत्र आलं. या तीन पानी टाईप केलेल्या पत्रात शिवराळ भाषेचा वापर करण्यात आला आहे
'भिडे गुरुजींबद्दल वाक्यही तोंडातून काढू नये अन्यथा तुमचा दाभोळकर-पानसरे झालाच म्हणून समजा,' अशा आशयाची धमकी त्यात देण्यात आली आहे.
या पत्रात मनुस्मृतीविरोधात न बोलण्याचा इशारा सुद्धा भुजबळ यांनी देण्यात आला आहे.
पोलीसांनी घेतली पत्राची दखल
यासंदर्भात रविवारी दुपारी माजी आमदार जयंत जाधव यांनी नाशिक पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली.
या धमकीची गंभीर दखल घ्यावी. संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.
पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी या प्रकरणी तपास सुरू केल्याची माहिती दिली आहे.
शिवप्रतिष्ठानने फेटाळले आरोप
दरम्यान, भिडे यांच्या शिव प्रतिष्ठान हिंदुस्थाननं निनावी पत्राकडे लक्ष देऊ नये असं म्हटलं आहे.
"अशा निनावी पत्राची कुणीही दखल घेऊ नये. अशी प्रेमपत्रं आम्ही किंवा आमचे कार्यकर्ते कुणाला पाठवत नाहीत. आमच्या कार्यकर्त्यांना देव, देश, धर्म या कामात रस आहे, अशा पत्रात नाही. भुजबळांनी निवांत राहावं," अशी प्रतिक्रिया शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रवक्ते नितीन चौगुले यांनी प्रतिक्रिया दिली.
भुजबळांनी व्यासपीठावरून केलेल्या टीकेला आम्ही व्यासपीठावरूनच उत्तर देऊ, असं बीबीसी मराठीशी बोलताना चौगुले म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)