You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोशल - 'सोयीस्करपणे पगड्या बदलून जनतेला टोप्या घालण्याचं राजकारण'
महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात प्रतीकात्मक राजकारण होत असतं. सध्या पुणेरी आणि फुले पगडी यावरून सोशल मीडियावर पगडीच्या राजकारणाची चर्चा सुरू आहे. बीबीसी मराठीनं याविषयी वाचकांना त्यांचं मत विचारलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात यापुढे पुणेरी पगडीऐवजी फुले पगडीच द्या, अशी सूचना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी एका जाहीर कार्यक्रमात केली. राष्ट्रवादीच्या 19व्या स्थापनादिनानिमित्त ते पुण्यामध्ये बोलत होते.
राष्ट्रवादीच्या या 'पगडी राजकारणा'चा बीबीसी मराठीच्या वाचकांनी वेगवेगळा अर्थ लावला आहे.
अनिल पवार यांना पुणेरी पगडी ही अठरापगड जातींचं प्रतीक असल्याचं वाटतं. "पुणेरी पगडी विशिष्ट जातीशी निगडित नाही तर धर्मनिरपेक्ष व जातीनिरपेक्ष पगडी आहे. ही पगडी नाकारणे म्हणजे धर्मनिरपेक्षता आणि जातीनिरपेक्षता या दोन्ही संकल्पनाच नाकारणे ठरेल," असं त्यांनी लिहिलं आहे.
पण त्यांच म्हणणं खोडत, कौस्तुभ जंगम लिहितात, "पुणेरी पगडी हे पेशवाईचं प्रतीक आहे तर फुले पगडी बहुजन समाजाचं. म्हणून ती कधीही चांगली."
'हे तर जातीय राजकारण'
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना काही काळ तुरुंगवास भोगावा लागल्यानं माळी समाजात रोष होता, असं संदीप महाडिक यांचा कयास आहे. "फुल्यांच्या पगडीमुळे (राष्ट्रवादीला) राजकीय फायदा होईल," असं महाडिक यांना वाटतं.
शरद पवार यांच्या विधानावर टीका करत सुचेता देवधर लिहितात, "जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचं काम शरद पवार एवढी वर्षं करत आले आहेत."
पगडी घातल्यानं भ्रष्टाचार कमी होईल का?
फुलेंची पगडी घातल्यानं भ्रष्टाचार कमी होईल का? असा उघड सवाल अनेक वाचकांनी विचारला आहे.
धनंजय भालेराव यांनाही असाच प्रश्न पडलेला दिसतो. पुणेरी किंवा फुले पगडी घातल्यानं भ्रष्टाचार थांबेल का? असं त्यांना वाटतं. ते लिहितात, "पुणेरी/फुले पगडी घातल्याने काही बदलत नाही. सर्वांचं भलं होईल असं राजकारण करा! काही जमत नसेल तर भ्रष्टाचार तरी करू नका!"
पवार साहेबांचं राजकारण
शरद पवारांच्या विधानावर टीका करत सुयोग कुडतरकर लिहितात, "सोयिस्करपणे पगड्या बदलून जनतेला टोप्या घालणारी ही माणसं!"
शरद पवार यांच्या राजकारणाची खेळी वेगळीच असते असं गोपाळ वाघे यांचं म्हणणं आहे. "पवारसाहेब यांच्या राजकारणाला तोड नाही. कोणाला कोणत्या वेळेस कोणती टोपी घालून तोंडावर पाडतील याचा नेम नाही. माळी समाज राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रचंड नाराज असून त्याना ही टोपी घालून सध्या तरी शांत केलं आहे," असा त्यांनी अंदाज लावलेला दिसतो.
पगडी आणि टोपीचा वापर करून सर्व जाती धर्माच्या लोकांना आपलसं करण्याचा शरद पवार प्रयत्न करत आहेत, असं जितेश विसपुते यांना वाटतं. "शरद पवार साहेब तुमचं काही कळत नाही राव....!! तुम्ही कधी पुणेरी पगडी, कधी फुले पगडी, तर कधी जाळीदार पगडी घालून सर्व जाती धर्माला आपलसं करण्याचा प्रयत्न करता..." असं त्यांनी लिहिलं आहे.
टिळक - फुले विचारांचं काय झालं?
पगडी बदलून विचारांचा पगडा बदलेल यावर सदाशिव जोशी यांना वाटत नाही. ''पगड्या' बदलून 'विचारांचा पगडा' बदलत असता तर कशाला हवं होतं... तुम्ही आपले "टोप्याच" घाला पगड्यांच्या भानगडीत नका पडू," असं ते लिहितात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)