You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इकोफ्रेंडली फटाके म्हणजे काय, ते कुठे आणि कधीपासून मिळतील
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेनं (NEERI) हरित स्वरुपाच्या फटाक्यांचा शोध लावला आहे. हे फटके पारंपारिक फटाक्यांप्रमाणेच असतात. पण त्यामुळे कमी प्रदूषण होतं.
दिल्लीतली NEERI ही संस्था वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (CSIR) अखत्यारीत येते.
जानेवारीमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी इकोफ्रेंडली फटाक्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर NEERIने याबाबत संशोधन सुरू केलं.
इकोफ्रेंडली फटाक्यांचा आकार, आवाज आणि प्रकाश हा सामान्य फटाक्यांसारखाच असतो. फक्त त्यामुळे प्रदूषण कमी होतं.
सामान्य फटाक्यांपेक्षा इकोफ्रेंडली फटाक्यांतून तुलनेनं 40 ते 50 टक्के कमी हानिकारक गॅस निर्माण होतात.
NEERIच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. साधना रायलू सांगतात, "इकोफ्रेंडली फटाक्यांपासून कमी प्रमाणात हानिकारक गॅस निर्माण होतो म्हणजे सामान्य फटाक्यांपेक्षा 40 ते 50 टक्के कमी. याचा अर्थ असा नाही की, या प्रदूषणावर पूर्णपणे ताबा मिळवता येईल. पण हो, हे कमी हानिकारक फटाके असणार आहेत."
सामान्य फटाके फोडल्याने मोठ्या प्रमाणात नायट्रोजन आणि सल्फर गॅस तयार होतो. अशा गॅसचं प्रमाण कमी करणं हा या संशोधनाचा उद्देश होता, असं त्या पुढं सांगतात.
इको फ्रेंडली फटाक्यातले घटक हे सामान्य फटाक्यांतील घटकांपेक्षा वेगळे असतात. NEERIने त्यांची वेगळी रासायनिक सूत्र बनवली आहेत.
इकोफ्रेंडली फटाक्यांचे 4 प्रकार
1. पाण्याचे कण तयार कराणारे फटाके- या प्रकारचे फटाके फोडल्यावर त्यातून पाण्याचे कण तयार होतील. त्यामध्ये नायट्रोजन आणि सल्फर गॅस मिसळले जातील. NEERIने याला Safe Water Releaser असं नाव दिलं आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी हे फटाके अधिक प्रभावी ठरणार आहेत.
2. सल्फर आणि नायट्रोजन कमी करणारे फटाके - NEERIने या फटाक्यांना STAR फटाके असं नाव दिलं आहे. यामध्ये ऑक्सिडायझिंग एजंटचा उपयोग केला जातो. ते जाळल्यानंतर कमी प्रमाणात नायट्रोजन आणि सल्फर तयार होतो.
3. कमी अॅल्युमिनियमचा वापर - या फटाक्यांमध्ये 50 ते 60 टक्के अॅल्युमिनियम कमी वापरलं जातं. याला Safe Minimal Aluminium म्हणजे SAFAL असं नाव दिलं आहे.
4. सुंगधी फटाके - या फटाक्यांतून केवळ हानिकारक गॅस कमी होणार नाहीत. हे फटाके फोडल्यानंतर एक सुवासिक सुगंध येईल.
हे फटाके कुठे मिळतील?
इकोफ्रेंडली फटाके भारतीय बाजारात अजून आलेले नाहीत. NEERIने याचा शोध लावला असला तरी ते बाजारात येईपर्यंत वेळ लागणार आहेत.
ते बाजारात आणण्याआधी सरकारला त्यांची प्रात्यक्षिकं द्यावी लागतील. त्यानंतरच ते बाजारात येऊ शकतात.
सध्यातरी बाजारात सामान्य फटाके मिळत आहेत. काही रासायनिक घटकांवर बंदी घातल्यानंतर त्यापैकी काही फटाके आता मिळत नाहीत.
NEERIने शोध लावला असला तरी या फटाक्यांच्या उत्पादनाची जबाबदारी ही भारतीय बाजारावर अवलंबून आहे. यांच्या उत्पादनासाठी प्रशिक्षणाची सुद्धा गरज भासणार आहे.
जगभरात कुठे आहेत इकोफ्रेंडली फटाके?
सध्यातरी या फटाक्यांचा जगभरात कुठेही वापर होत नाही. डॉ. साधना सांगतात की, इकोफ्रेंडली फटाक्यांची कल्पना भारताची आहे. जर हे उत्पादन आपण बाजारात आणलं तर जगाला आपण नवी दिशा देऊ शकू.
याबाबत सर्व संशोधन झालं आहे. आता हे मंजूर करणं ही सरकारी संस्थांची जबाबदारी आहे. "यांच्या मान्यतेसाठी पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा संस्थेला (PESO) आम्ही पत्र लिहिलं आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)