दिवाळीच्या रात्री फक्त 8-10मध्येच फटाके फोडण्यास परवानगी - सुप्रीम कोर्ट

फटाके विक्री तसंच ते वाजवण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने मंगळवारी महत्त्वपूर्ण निर्णय दिला. फटाक्यांच्या विक्रीवर सरसकट बंदीची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायमूर्ती अर्जन कुमार सिक्री यांनी हा निर्णय दिला.

पर्यावरणाची हानी करणार नाहीत अशा हरित स्वरूपाच्या फटाक्यांचीच विक्री करता येईल असं न्यायालयाने स्पष्ट केलं.

सुप्रीम कोर्टाने फटाक्यांच्या ऑनलाइन विक्रीवर बंदी घातली. अमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ईकॉमर्स वेबसाईट्सना फटाके विक्री रोखण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

फटाक्यांच्या माळेची विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. ठराविक ठिकाणीच फटाके वाजवण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. फटाके वाजवण्यासाठी न्यायालयाने विशिष्ट वेळ निश्चित केली आहे.

काही दिवसांवर आलेल्या दिवाळीच्या काळात रात्री 8 ते 10 या दोन तासातच फटाके वाजवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

या निकालातील महत्त्वाचे मुद्दे असे :

1. अर्जुन गोपाल (3), अर्नव भंडारी (3), झोया राव भसीन (5) या मुलांच्या वतीने त्यांच्या पालकांनी ही याचिका दाखल केली होती.

2. ज्या फटाक्यांची विक्री करायची आहे, त्या फटाक्यांना आवाजसंदर्भातील नियम लागू असतील. दिवाळीत रात्री 8 ते 10 या वेळेत फटाके फोडता येतील. पण या फटाक्यांतून निघणारा धूर आणि आवाज कमी असला पाहिजे.

3. दिवसा कोणत्याही प्रकारचे फटाके फोडू नयेत.

4. ख्रिस्मस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी रात्री 11.55 ते 12.30 या काळात फटाके फोडता येतील.

5. फटाके बनवणाऱ्यांचा जीविताचा अधिकार तसेच नागरिकांच्या आरोग्याचा अधिकार, असे मुद्दे सुप्रीम कोर्टाने विचारात घेतले.

6. फटाक्यांचा नागरिकावर होणारा परिणाम आणि प्रदूषण कमी करण्यासाठीचे उपाय केंद्राने सुचवावेत, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

7. जर फटाके नियमात बसत असतील तरच Petroleum and Explosives Safety Organisationने फटाक्यांना परवानगी द्यावी, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

ही माहिती हिंदुस्तान टाइम्सने दिली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)