You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
#5मोठ्याबातम्या : अमृता फडणवीस म्हणतात, 'सेल्फी घेण्यासाठी नव्हे तर शुद्ध हवेसाठी गेले होते'
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. सेल्फी घेतला ती जागा सुरक्षितच- अमृता फडणवीस
''मी क्रुझवर होते. ज्या जागी बसून सेल्फी घेतला ती जागा सुरक्षित होती. मी सेल्फी काढण्यासाठी गेले नव्हते. मी खूप दिवसांनंतर शुद्ध हवेचा अनुभव घेत होते. त्याकरता गेले होते'', असं मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सांगितलं.
एबीपी माझानं दिलेल्या बातमीनुसार, मुंबई ते गोवा या जलमार्गावरील आंग्रिया या क्रूझच्या डेकवर टोकाला जाऊन सेल्फी काढल्याने अमृता वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. शनिवारी मुंबईत आंग्रिया क्रूझचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. आंतरदेशीय क्रूझ पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबई ते गोवा या जलमार्गावर ही क्रुझसेवा सुरू करण्यात आली. मात्र क्रूझसेवेपेक्षा अमृता यांनी काढलेला सेल्फीच चर्चेत राहिला.
डेकवर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी लावलेल्या रेलिंगपुढे जाऊन त्यांनी सेल्फी घेतल्याने चर्चेला उधाण आलं होतं. ''मी जागी बसले होते तिथे खाली आणखी एक बाल्कनी होती. त्यामुळे ती जागा धोकादायक नव्हती. उपस्थित अधिकारी क्रूझवरच्या अन्य एका उद्घाटन सोहळ्याला येण्यासाठी मला विनंती करत होते. मात्र शुद्ध हवेचा अनुभव घेण्यासाठी तिथेच थांबले'', असं त्यांनी सांगितलं.
त्या पुढे म्हणाल्या, '' एका व्यक्तीचं भलं होणार असेल तर माझ्यावर कारवाई व्हावी. त्यासाठी मी कोणासमोरही माफी मागण्यास तयार आहे. सेल्फी घेऊन स्वत:चा जीव धोक्यात घालू नका''
2. लग्नाचा हट्ट धरला म्हणून वर्ध्यात बलात्कार करून हत्या
ती नववीत, तो दहावीत. ती त्याला लग्न करू म्हणाली. त्याने नकार दिला. आता लग्न शक्य नाही म्हणाला. पण शरीरसंबंध ठेवले. तिने काही दिवसांपूर्वी लग्नासाठी आत्महत्येची धमकी दिली. तो घाबरला. अल्पवयीन मित्राला सोबत घेतलं आणि तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण तिने लग्नाचा हट्ट सोडला नाही. ती ऐकेना म्हटल्यावर त्याने आणि त्याच्या मित्राने तिच्यावर बलात्कार केला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी शांत डोक्याने तिच्या गळ्यात स्क्रूड्रायव्हर खुपसला आणि हे क्रौर्य पचवण्यासाठी तिचा चेहरा ठेचून विद्रूप केला. प्रेम म्हणजे काय हे न कळण्याच्या वयातील मुलांच्या या रक्तबंबाळ गोष्टीने वर्धा शहर सुन्न झाले आहे. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
3. एका कुटुंबासाठी नेताजींचं योगदान नाकारण्याचा प्रयत्न-मोदी
केवळ एका कुटुंबासाठी सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं योगदान नाकारण्याचा प्रयत्न करण्यात आला असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. 'महाराष्ट्र टाइम्स'ने याबाबत बातमी दिली आहे.
आझाद हिंद सेनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने लाल किल्ला येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. स्वातंत्र्यानंतर सरदार पटेल किंवा सुभाषचंद्र बोस यांच्याकडे देशाचं नेतृत्त्व गेलं असतं तर आजची परिस्थिती नक्कीच वेगळी असती अशी टीकाही मोदी यांनी केली.
आझाद हिंद सरकार केवळ नावाचं सरकार नव्हतं. सुभाषबाबूंच्या नेतृत्त्वात या सरकारने अनेक योजना राबवल्या होत्या. त्यांची स्वत:ची बँक होती. त्यांचं स्वत:चं चलन होतं. टपाल तिकीट आणि गुप्तचर यंत्रणा होती. अत्यंत अपुरी साधनं असतानाही त्यांनी इंग्रजांविरोधात लढा दिला, असं मोदी म्हणाले.
4. काश्मीरात एका दिवसात 16 जणांचा मृत्यू
जम्मू काश्मीरमध्ये हिंसक घटनांमध्ये रविवारी 16 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये चार जवानांसह सात सामान्य नागरिकांचा समावेश आहे. या हिंसक घटनांमध्ये 40 जण जखमी झाले आहेत. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
कुलगाम जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मदच्या तीन कट्टरवाद्यांना जवानांनी ठार केलं. मात्र या चकमकीनंतर झालेल्या स्फोटात सामान्य नागरिक बळी पडले. अन्य घटनेत लष्कराचे जवान आणि घुसखोर यांच्यात झालेल्या चकमकीत पाचजणांचा मृत्यू झाला आहे.
5. सीबीआयचा स्वत:च्याच विशेष संचालकांवर गुन्हा
केंद्रीय गुप्तचर विभाग अर्थात सीबीआयने स्वत:चे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. देशाच्या अग्रगण्य तपास यंत्रणेतील सुंदोपसुंदी शिगेला पोहोचली आहे. सीबीआयच्या सहा दशकांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं काही घडतं आहे. 'लोकमत'ने याबाबत बातमी दिली आहे.
सीबीआयमध्ये संचालक आलोक वर्मा यांच्यानंतर विशेष संचालक अस्थाना हे दुसऱ्या क्रमांकाच्या पदावर आहेत. अस्थाना हे भारती पोलीस सेवेच्या 1984च्या तुकडीतील गुजरात कॅडरचे अधिकारी आहेत. मनी लाँड्रिग आणि लाचखोरीसह अनेक खटले सुरू असलेला कर्नाटकमधील मांस निर्यातदार मोईन कुरेशी याच्याकडून दोन कोटी रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून अस्थाना यांच्यावर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सीबीआयने हे अधिकृतपणे जाहीर केले नसले तरी या संस्थेतील व सरकारमधील सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. काही दिवसांपूर्वी सीबीआयने मनोज कुमार या मध्यस्थाला अटक केली. मनोज कुमारने कुरेशीच्या वतीने अस्थाना यांना दोन कोटी रुपयांची लाच दिल्याचा कबुलीजबाब दंडाधिकाऱ्यांसमक्ष नोंदवल्यानंतर अस्थाना यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.
लाचखोरीच्या प्रकरणात नाव येण्याची अस्थाना यांची ही पहिलीच वेळ नाही. बडोदा येथील संदेसरा या व्यापारी बंधूंना मदत केल्याच्या संदर्भात अस्थानांवर संशयाची सुई वळली होती. बँकाँची 5,200 कोटी रुपयांची कर्जे बुडवून हे संदोसरा बंधू परदेशात फरार झाले असून त्यांच्यावर सीबीआय आणि ईडी या दोन्ही तपास यंत्रणांनी गुन्हे नोंदवले आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)