You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमृतसर रेल्वे अपघात : 'रुळावर पडलेले माझ्या मित्रांचे मृतदेह मी हातांनी उचलले'
अमृतसरमधल्या जोडा फाटक या ठिकाणी रावण दहनाच्यावेळी रेल्वेखाली सापडून 62 ठार तर 100वर जखमी झाले आहेत. रावण दहनावेळी झालेल्या गोंधळात लोक मागे सरकत रेल्वेच्या रुळावर गेले, त्याच वेळी या रुळावरून येणारी रेल्वे अंगावरून गेल्याने ही दुर्घटना घडली. सायंकाळी 6.30 वाजता हा अपघात झाला. अमृसर आणि मनवालामधील गेट नंबर 27 जवळ हा प्रकार घडला.
अमृतसरचे पोलीस उपायुक्त कमलजीत सांघा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला तर पोलीस आयुक्त सुधांशू शेखर यांनी मृतांची संख्या 50च्यावर तर जखमींची संख्या 100वर असल्याचं सांगितलं. पंजाबचे आरोग्यमंत्री ब्रह्म मोहिंद्र यांनी दोन सरकारी रुग्णालयांत 40 मृतदेह आणल्याची माहिती दिली. रेल्वेचे राज्यमंत्री मनोज सिन्हा घटनास्थळी रवाना झाले आहेत.
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहानी यांनी या घटनास्थळाची शनिवारी पहाटे पाहणी केली.
शनिवार सकाळची स्थिती
अमृतसरचे पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांचा आकडा 62 होता. मात्र अतिरिक्त जिल्हाधिकारी हिमांशू यांच्या मते, हा आकडा 59 असून तीन जण अत्यवस्थ असून त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं आहे.
स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, 20 मृतदेहांची ओळख पटलेली नाही.
दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग हे सकाळी 10.320 वा. घटनास्थळाची पाहणी करणार आहेत.
घटनेवेळी तिथं उपस्थित असणारे अमरनाथ म्हणाले, "रावणाच्या प्रतिकृतील आग लावण्यात आली आणि आतषबाजी सुरू झाली. त्याच वेळी बाजूला असलेल्या रुळावरून रेल्वे गेली. फटाक्याच्या आवाजात रेल्वेच्या येण्याचा आवाजच आला नाही. मी दोघांना बाजूला ओढून त्यांना वाचवलं. पण जेव्हा रेल्वे निघून गेली, तेव्हा रुळावर 25 ते 30 मृतदेह पडल्याचे दिसलं. मी मृतदेहांना तिथून हालवलं. माझे हात रक्ताने भरले होते. मृतांतील बरेच माझे मित्र होते."
घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांतील अमित कुमार सांगतात, "घटना माझ्या घरापासून जवळच घडली. मी घरी टेरेसवर होतो. रेल्वे भरधाव वेगाने आली. आयोजकांनी रेल्वेच्या रुळापासून दूर राहण्याची सूचना केली होती. या रावण दहनाचं आयोजन दरवर्षी केलं जातं."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांना श्रद्धांजली अपर्ण केली असून जखमींनी तातडीने सर्व प्रकारची मदत उपल्ब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या मदतीची तर जखमींवर मोफत उपचार करण्याची घोषणा केली आहे.
रेल्वे रुळापासून काही अंतरावर रावण दहनाचे आयोजन करण्यात आले होते. रावण दहन करताना आयोजकांनी लोकांना दूर होण्याची सूचना केली. त्या वेळी हा गोंधळ उडाला. मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक पत्रकार रवींद्र सिंग रॉबीन यांनी काही लोक रेल्वे रुळावर बसले होते अशी माहिती दिली. या कार्यक्रमात पंजाबचे उपमुख्यमंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धूही व्यासपीठावर उपस्थित होत्या, अशी माहिती रॉबिन यांनी दिली. एएनआयशी बोलताना त्या म्हणाल्या, "रावणाच्या प्रतिकृतीचं दहन झाल्यानंतर मी तेथून बाहेर पडले. ही घटना घडण्याच्या काही वेळापूर्वी मी तेथून बाहेर पडले होते. जखमींना उपचार मिळावेत, हे प्राधान्य आहे. या घटनेवर कुणी राजकारण करत असले तर ते लाजीरवाणं आहे."
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. दसऱ्यावेळी घडलेल्या घटनेमुळं मला फार दुःख झालं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने हॉस्पिटलमधील छायाचित्रं ट्वीट केली आहेत.
घटनास्थळावरील छायाचित्रं
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)