You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
#MeToo : एम. जे. अकबर यांच्या खटल्यात फक्त सत्यच माझा बचाव करेल - प्रिया रमाणी
परराष्ट्र राज्यमंत्री आणि माजी पत्रकार एम. जे. अकबर यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांप्रकरणी कोर्टात धाव घेतली आहे.
पत्रकार प्रिया रमाणी यांच्याविरोधात त्यांनी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
त्यांच्या वतीनं त्यांच्या वकिलीचं काम पाहाणाऱ्या करंजवाल आणि कंपनीनं हा दावा दाखल केला आहे. एएनआय या वृत्त संस्थेनं हे वृत्त दिलं आहे.
एम. जे. अकबर यांनी कोर्टात धाव घेतल्याच्या काही क्षणातच पत्रकार प्रिया रमाणी यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली आहे.
"मी माझ्यावर दाखल झालेल्या खटल्याविरोधात लढण्यासाठी तयार आहे. सत्य आणि सत्यच फक्त यात माझा बचाव असेल," असं त्यांनी म्हटलं आहे.
"मला दुःख तर या गोष्टीचं वाटतं की केंद्रीय मंत्र्यांनी महिलांच्या आरोपांना राजकीय षडयंत्र ठरवून फेटाळून लावले," असं त्या पुढे म्हणाल्या आहेत.
काय म्हणाले एम. जे. अकबर?
माझ्यावरील गैरवर्तणुकीचे आरोप खोटे आणि विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून केलेले आहेत, असा खुलासा परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी एका निवेदनाद्वारे केला आहे.
अधिकृत दौऱ्यावर असल्यामुळे मी या आरोपांना उत्तर देऊ शकलो नव्हतो. ज्या व्यक्तींनी लैंगिक छळवणुकीचे आरोप केले आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही अकबर यांनी स्पष्ट केलं. ANI या वृत्तसंस्थेनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
"कोणत्याही पुराव्याशिवाय करण्यात आलेले आरोप काही ठिकाणी व्हायरल झाले आहेत. ठीक आहे, आता मी परत आलोय. माझे वकील आता या प्रकरणात लक्ष घालतील आणि पुढील कायदेशीर कारवाईसाठीची पावलं उचलतील,"असं अकबर यांनी म्हटलं आहे.
निवडणुकीच्या आधीच हे वादळ कसं आलंय? त्यामागे काही उद्देश आहे का? हे तुम्हीच ठरवा. या खोट्या तथ्यहीन आरोपांमुळे माझी प्रतिमा मलीन झाली आहे, असंही त्यांनी सांगितलं.
"असत्याचा टिकाव फार काळ लागत नाही. त्यात काहीतरी विषारी असतंच. हे विष घोळूनच वादळ निर्माण केलं जातं. हे अत्यंत निराशाजनक आहे. मी योग्य ती कायदेशीर कारवाई करणार."
"प्रिया रमाणी यांनी ही मोहीम मागच्या वर्षी एका मासिकात लेख लिहून सुरू केली होती. त्या लेखात त्यांनी माझं नाव घेतलं नाही कारण तो सगळा प्रसंग चुकीचा होता.
माझं नाव का घेतलं नाही असं जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी एका ट्वीटद्वारे रिप्लाय दिला. त्या म्हणाल्या, "मी त्यांचं नाव घेतलं नाही कारण त्यांनी काहीही केलं नाही." असंही अकबर यांनी या निवेदनात म्हटलं आहे.
#MeToo काय आहे?
#MeToo ही लैंगिक छळवणुकीच्या विरोधातली एक मोहीम आहे. या हॅशटॅगचा आधार घेत लैंगिक छळवणुकीला बळी पडलेले (विशेषत: कामाच्या ठिकाणी) लोक आपली व्यथा मांडत आहेत.
या अभियानामुळे त्यांच्याबरोबर झालेल्या लैंगिक छळवणुकीविरोधात आवाज उठवण्यासाठी बरीच मदत झाली आहे.
मागच्या वर्षी हॉलिवुड दिग्दर्शक हार्वी वाईनस्टीन यांच्यावर अनेक अभिनेत्रींनी लैंगिक छळवणुकीचा आरोप केल्यावर या अभियानाने जोर पकडला.
त्यात सामान्य लोकांसकट अनेक प्रसिद्ध लोकांची नावं समोर आली आहेत. वाईनस्टीन यांची कंपनी दिवाळखोरीत निघाली आणि त्यांना चौकशीला सामोरं जावं लागलं.
सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीचं वर्णन करत आहेत. इतकंच नाही तर या दुर्व्यवहारात सामील असलेल्या पुरुषांचे नावही जाहीर करत आहेत.
प्रसारमाध्यमांशी निगडित अनेक महिलांनी या प्रकरणी ट्वीट केलं आहे. ज्या पुरुषांनी हे कृत्य केलं त्यांच्याबरोबर झालेल्या चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.
याच साखळीमध्ये पुर्वाश्रमीचे पत्रकार आणि सध्या केंद्र सरकारमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री असलेले एम. जे. अकबर यांचंही नाव आलं होतं.
अकबर यांनी 'द टेलिग्राफ' आणि 'द एशियन एज' या वृत्तपत्रांचे संपादक म्हणून काम केलं आहे. त्याच काळात त्यांच्यासोबत काम केलेल्या अनेक महिलांनी त्यांच्यावर लैंगिक छळवणुकीचे आरोप केले आहेत. यात अनेक तरूण मुलींचा सहभाग आहे.
ज्येष्ठ पत्रकार प्रिया रामाणी यांनी सोमवारी पहिल्यांदा त्यांच्या नावाचा उल्लेख केला. वर्षभरापूर्वी व्होग या मासिकात लिहिलेला लेख रिट्वीट करत त्यांनी त्यात अकबर यांचा उल्लेख केला. त्या लेखात त्यांनी कामाच्या ठिकाणी झालेल्या लैंगिक छळाच्या पहिल्या अनुभवाबद्दल लिहिले होते.
आजवर ज्या पुरूषांवर लैंगिक छळवणुकीचे आरोप झाले आहेत. त्यांच्यात कॉमेडिअन, पत्रकार, अभिनेते, लेखक, चित्रपटकर्ते यांचा समावेश आहे. या सगळ्यांमध्ये अकबर सर्वांत मोठया पदावर आहेत.
एम.जे. अकबर कोण आहेत?
ज्येष्ठ पत्रकार एम. जे. अकबर 2014 लोकसभा निवडणुकांपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
2015 मध्ये एम. जे. अकबर झारखंडमधून राज्यसभेचे प्रतिनिधी म्हणून निवडून आले.
एकेकाळी राजीव गांधींचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे एम. जे. अकबर 1989 मध्ये बिहारच्या किशनगंजमधून लोकसभेवर निवडून आले होते.
राजीव गांधी पंतप्रधान असताना एम. जे. अकबर त्यांचे प्रवक्ते होते.
ते 1991 मध्ये ते पुन्हा निवडणुकीत उतरले. मात्र त्यावेळी ते जिंकून येऊ शकले नाहीत. त्यानंतर ते पुन्हा पत्रकारितेत परतले होते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)