सोशल - 'राज्य गहाण ठेवून स्मारकं उभारण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी विकास करावा'

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच हे राज्य पुरोगामी विचारांवर पुढे चालले आहे. त्यामुळे त्यांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवावं लागलं तर त्यासाठी माझी तयारी असेल,"असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यातून आता एका नव्या तोंड फुटलं आहे.

रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेला 61 वर्षं झाल्याच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं.

इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकावरून सध्या सरकारवर टीका सुरू आहे. "विरोधकांना जे जमलं नाही, ते आम्ही करून दाखवलं, म्हणूनच आता त्यांच्याकडून टीका केली जात आहे," असंही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या विधानाबाबत बीबीसी मराठीच्या वाचकांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही 'होऊ द्या चर्चा'च्या माध्यमातून केला. त्यातील या काही निवडक आणि संपादित प्रतिक्रिया.

"मुख्यमंत्र्यांनी असं बोलणं म्हणजे महापुरुषांचा अपमान आहे. कोणत्याही महापुरुषाला राज्य गहाण ठेवून पुतळा व्हावा, हे मान्य होणार नाही," असं मत संदीप बोऱ्हाडे यांनी व्यक्त केलं आहे.

मंगेश मदनकर म्हणतात, कुणाच्याच पुतळ्यासाठी असं विधान करणं योग्य नाही. हे दोन्ही महापुरुष आता असते तर त्यांनीही या गोष्टीला विरोध केला असता.

"आम्हाला कुठलंही, कुणाचंही स्मारक नको, तर त्यासाठी लागणारा निधी वापरून विकास करा. आजकाल रस्त्यावर चालताना फुटपाथ नाही तर फक्त स्मारकं आणि वेगवेगळ्या नावाचे चौकच दिसतात," अशी प्रतिक्रिया रणजीत पाटील यांनी दिली आहे.

तर गोविंद नाथानी यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण करत, "मुख्यमंत्र्यांच्या सांगण्याचा अर्थ हा की, स्मारकासाठी कितीही अवघड काम करावं लागलं तर ते करण्याची तयारी आहे," असं म्हटलं आहे.

"बाबासाहेबांचे चरित्र अभ्यासल्यास त्यांनी पुतळे, स्मारक, मूर्तीपूजा यांना विरोध केला. त्यांच्या नावानं जागतिक दर्जाचे विद्यापीठ बनवावे," असा सल्ला मनीष अग्रवाल यांनी सरकारला दिला आहे.

"कोणी काय गहाण ठेवावं, हा ज्याच्या-त्याच्या अकलेचा प्रश्न आहे. पण राज्याची तिजोरी जनतेच्या मालकीची आहे, ती तुमची खासगी मालमत्ता नाही," अशा शब्दात राकेश थूल यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)