You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इंदू मिलआधी तयार होणार बाबासाहेबांचं दिल्लीतलं स्मारक
- Author, रवींद्र मांजरेकर/गणेश पोळ
- Role, बीबीसी मराठी
केंद्रीय कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल्लीतील 1, हार्डिंग अॅव्हेन्यू हे सरकारी निवासस्थान सोडलं आणि 26, अलीपूर रोड इथल्या निवासस्थानी राहायला आले.
1951 ते 1956 या काळात बाबासाहेबांचं वास्तव्य या घरात होतं. तिथंच त्याचं 6 डिसेंबर, 1956 रोजी निधन झालं.
ही वास्तू 'परिनिर्वाण स्थळ' म्हणून ओळखली जाते.
या जागेवर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक उभारण्याचं काम सुरू झालं आहे.
हे काम वेगात सुरू आहे. सहा डिसेंबरला या स्थळाला बीबीसीच्या टीमनं भेट दिली.
या स्मारक स्थळी कार्यरत असलेले डॉ. आंबेडकर राष्ट्रीय सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक विजय बौद्ध यांनी सांगितलं की, "गेली 12 वर्षं आमचा या स्मारकासाठी संघर्ष सुरू होता. अखेर हे स्वप्नं आता साकार होताना दिसत आहे."
प्रकल्पाच्या कामावर देखरेख ठेवणाऱ्या एका इंजिनिअरनं दिलेल्या माहितीनुसार, या स्मारकाच्या मुख्य इमारतीचं काम झालं आहे. आतली कामं आता सुरू आहेत.
पुढील वर्षी एप्रिलपर्यंत त्याचं काम नक्कीच पूर्ण होईल.
या घराचं स्मारकात रुपांतर करावं या मागणीसाठी बराच काळ आंदोलन झालं.
अखेर, अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार केंद्रात आल्यावर ही वास्तू मूळ मालकाकडून ताब्यात घेण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी सोहळा समितीनं या घराचं राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला.
2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्याकोऱ्या राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीसाठी भूमिपूजन केलं.
तसंच, हे काम दोन वर्षांत पूर्ण करून 14 एप्रिल, 2018 ला त्याचं उद्घाटन करण्याचा मनोदयही पंतप्रधान मोदी यांनी बोलून दाखवला होता.
पंचतीर्थ
डॉ़. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधीत पाच स्थळांचा विकास करण्याचं केंद्र आणि स्थानिक राज्य सरकारनं ठरवलं आहे.
त्यात, मुंबईतलं दादरमधलं इंदू मिल-चैत्यभूमी परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक, महू इथल्या जन्मस्थळाचा विकास,
लंडनमधील वास्तव्य असलेली वास्तू, नागपूरची दीक्षाभूमी आणि अलीपूर रोड इथलं महापरिनिर्वाण स्थळ या पाच स्थळांचा समावेश आहे.
स्मारकाची वैशिष्ट्यं
एकूण जागा 7374 चौरस मीटर, 4561.62 चौरस मीटरचं बांधकाम.
स्मारकाच्या प्रवेशद्वारावर अशोक स्तंभ उभारण्यात आला आहे.
इमारतीची रचना उघडलेल्या पुस्तकासारखी आहे.
बाबासाहेबांच्या कार्याची माहिती देणं, प्रदर्शनाचं आयोजन इत्यादी कार्यक्रम होणार.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)