You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बँक ऑफ बडोदाच्या निर्मितीची कथा
- Author, जय मिश्रा
- Role, बीबीसी गुजराती प्रतिनिधी
बँक ऑफ बडोदा, विजया बँक, आणि देना बँक या बँकांच्या विलिनीकरणाला कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे. या विलिनीकरणाबरोबर बँक ऑफ बडोदा ही देशातील तिसरी सर्वांत मोठी बँक होणार आहे.
बँक ऑफ बडोदाची स्थापना महाराजा सयाजीराव (तृतीय) यांनी केली होती.
सुरुवातीचं भांडवल 10 लाख
महाराजा सयाजीराव गायकवाड (तृतीय) यांनी 20 जुलै 1908 ला या बँकेची स्थापना केली. त्यांनीच दिलेल्या निधीवर ही बँक उभी राहिली. त्यांच्यासह इतरही काही लोकांनी बँकेची स्थापना करण्यासाठी मदत केली.
बडोद्यातील राजेंद्र शहा सांगतात, "बडोदा बँकिंग फर्मची स्थापना 1884ला झाली. सयाजीराव यांनी या संस्थेचं विलिनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये केलं."
"संपतराव गायकवाड, विठ्ठलदास ठाकेरजी, तुलसीदास कलाचंद आणि एन. एम. चोकसी या मान्यवरांनी या बँकेच्या स्थापनेसाठी महत्त्वाची भूमिका बजावली."
"बँकेची स्थापना 10 लाख भांडवलावर झाली आणि 1913 मध्ये या बँकेच्या चार शाखा होत्या."
"व्यापाऱ्यांना सहज कर्ज मिळावित म्हणून आणि राज्याच्या एकूणच विकासासाठी त्यांनी या बँकेची स्थापना केली."
या बँकेच्या स्थापनेआधी तिथल्या खेड्यापाड्यांत अनेक पारंपरिक बँका होत्या.
पारंपरिक बँकिंग व्यवस्थेच्या यशानंतरच मग बँक ऑफ बडोदाची स्थापना झाली होती, असं इतिहासकार जितेंद्र गायकवाड यांनी सांगितलं.
ते म्हणाले, "जेव्हा सयाजीराव यांनी राज्याची सुत्रं हातात घेतली तेव्हा राज्याची आर्थिक व्यवस्था बिकट होती. या अवस्थेतून बाहेर निघण्यासाठी त्यांनी एक बचत कायदा सुद्धा लागू केला होता. त्यांनी बँकेसाठी 50,000 रुपये दान दिले."
"राज्यातून पैसा बाहेर जाऊ नये हा बँक स्थापन करण्याचा मुख्य उद्देश होता. त्याचप्रमाणे राज्यात स्वतंत्रपणे विकासाची कामं व्हावी त्याचप्रमाणे बडोदा राज्यात नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध व्हाव्यात हा यामागे उद्देश होता."
व्यापार वाढवण्याचे उद्दिष्ट
जेव्हा बँक स्थापन झाली तेव्हा सयाजीरावांना राज्यातच कला, उद्योग आणि व्यापार यांचा विकास करायचा होता.
'सयाजी राव ना भाषणो' या पुस्तकात त्यांनी सांगितलं की राज्यासाठी बँक उपयोगी ठरेल.
ते म्हणाले होते, "यावेळी बँकेला गरज होती म्हणूनच सरकारने बँकेला मदत केली. या बँकेवर संचालकांचं नियंत्रण राहील. शासनाच्या प्रतिनिधींचा त्यात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप राहणार नाही. या बँकेमुळे सहकार्याचं एक उत्तम उदाहरण प्रस्थापित होण्यास मदत होईल."
राष्ट्रीयीकरण
बँक ऑफ बडोदाबद्दल फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेरसुद्धा अनेक वाद उद्भवले आहेत.
या वर्षी एप्रिलमध्ये इकॉनॉमिक टाइम्समध्ये आलेल्या एका बातमीनुसार आर्थिक गुप्तचर विभागाने बँकेला 9 कोटी रुपयांचा दंड ठोठावला.
दिल्लीतील अशोक विहार शाखेत 6000 कोटींच्या परकीय चलनाच्या बाबतीत योग्य यंत्रणा नसल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला होता.
हिंदू बिझनेस लाईन या वृत्तपत्रातील बातमीनुसार बँकेने दक्षिण अफ्रिकेत आपले व्यवहार बंद केले आहेत.
वृत्तांनुसार दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांचे निकटवर्तीय असलेल्या गुप्ता बंधूंना तेथील स्थानिक बँकांबरोबर व्यवहार करण्यास बंदी आणली होती. असं असूनसुद्धा त्यांनी बँक ऑफ बडोदाबरोबरचे त्यांचे व्यवहार चालू ठेवले त्यामुळे त्यांच्यावर बंदी आणण्यात आली.
विलीनीकरणामुळे फायदा होईल?
अरुण तिवारी हे युनायटेड बँक ऑफ इंडियातून निवृत्त झाले आहेत. ते सांगतात, "या विलिनीकरणाची प्रक्रिया गेल्या चार वर्षांपासून सुरू होती. तीन वर्षांआधी शासनाने असा निर्णय घेतला की विलिनीकरण हे बँकांच्या दर्जावर अवलंबून असेल."
बँकांच्या विलिनिकणाचे अनेक फायदे असतात. पश्चिम आणि उत्तर भारताशिवाय बँक ऑफ बडोदाच्या शाखा जगभर पसरलेल्या आहेत.
"विजया बँकेचा प्रभाव दक्षिण भारतात जास्त आहे. देना बँकेत मात्र सगळं काही आलबेल नाही. त्यामुळे आता या बँकांचा त्यांना फायदा होईल," असं तिवारी सांगतात.
शेअर बाजाराची प्रतिक्रिया
बँकांच्या विलिनीकरणाची घोषणा झाल्यानंतर बँक ऑफ बडोदाचे शेअर्स 18 सप्टेंबरला 17 टक्क्यांनी घसरले. मात्र विजया बँक आणि देना बँकेच्या शेअरमध्ये मात्र वाढ झाली.
तज्ज्ञांच्या मते हे अत्यंत नैसर्गिक आहे. कारण बँक ऑफ बडोदा स्थिर आणि मजबूत आहे. आता त्यांच्यावर इतर बँकांचं वजन असेल.
बँकेच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 85,000 आहे. तसंच संपूर्ण देशात या बँकेच्या 9485 शाखा आहेत.
बँक ऑफ बडोदाचे माजी जनरल मॅनेजर एन. रामानी म्हणाले, "त्यांना अनेक बँकांना पैसे द्यावे लागत आहेत याला काही अर्थ नाही. दोन उत्तम स्थितीत असलेल्या बँका आणि वाईट स्थितीत असलेल्या बँकेचं विलिनीकरण ही चांगली गोष्ट नाही. विजया बँक आणि देना बँकेला सरकारकडून भांडवल मिळेल. हे मात्र विलिनीकरणानेच शक्य होईल. या विलिनीकरणामुळे इतर विलिनीकरणांचा मार्ग मोकळा होईल."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)