रामदेव बाबा 2019ला मोदींचा प्रचार करणार नाही, असं का म्हणाले?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रदीप कुमार
- Role, बीबीसी प्रतिनिधी
हजारो कोटींचा पतंजली उद्योग आणि योग यामुळे रामदेव बाबा हे नाव नेहमीच चर्चेत असतं. बाबा रामदेव आता पुन्हा चर्चेत आले आहे कारण 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. 2014ला भाजपचा प्रचार करणारे रामदेव बाबा यांनी अशी भूमिका का घेतली असेल? रामदेव बाबा यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा बदलल्या आहेत का?
रामदेव बाबा यांनी एनडीटीव्हीच्या युवा कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात स्पष्टपणे सांगितलं की ते सर्वपक्षीय आणि पक्ष निरपेक्ष आहेत. पुढे त्यांना विचारलं की ते 2019च्या निवडणुकांत भाजपचा प्रचार करतील का तेव्हा "का करू, नाही करणार?" असं उत्तर त्यांनी दिलं.
काळा पैसा, भ्रष्टाचार आणि व्यवस्थेत बदल या मुद्द्यावर मोदींवर त्यांचा विश्वास होता असंही त्यांनी या कार्यक्रमात सांगितलं. हा विश्वास अजून आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर देताना मात्र त्यांनी या विषयावर सध्या मौन बाळगल्याचं सांगितलं.
2019च्या निवडणुकीत मोदींपासून ठराविक अंतर ठेवणं ही त्यांची नवीन भूमिका आहे की राजकीय खेळी?
खरंतर, मोदींपासून अंतर ठेवण्याचा इशारा त्यांनी यापूर्वी दिला नाही असंही नाही. डिसेंबर 2016मध्ये 'द क्विंटशी' चर्चा करताना त्यांना एनडीए सरकारचे राजगुरू असं संबोधलं गेलं होतं. ही बाब आत भूतकाळात गेल्याचं ते म्हणाले.
मात्र रामदेव बाबा इतके राजकीय आहेत की त्यांच्या राजकीय भूमिकेचा अंदाज एक दुसऱ्या वक्तव्यात येत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
यावर्षी 4 जूनला भाजप अध्यक्ष अमित शाह यांना ते 'संपर्क फॉर समर्थन' अभियानात भेटले होते. या मुलाखतीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "बाबा रामदेव यांच्याशी भेटीचा अर्थ लाखो लोकांशी भेट असा होतो. त्यांनी येत्या निवडणुकीत संपूर्ण पाठबळ देण्याचं आश्वासन दिलं आहे."
बाबा रामदेव यांचं हे वक्तव्य त्यांच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीचं द्योतक आहे की रामदेव बाबा दबावाचं वातावरण तयार करत आहेत? यासाठी 2014च्या निवडणुकीत रामदेव बाबांच्या भूमिकेचं विश्लेषण करणं आवश्यक आहे.
नरेंद्र मोदींचा जोरदार प्रचार
2014च्या निवडणुकीच्या रणधुमाळीत ते नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमनं उधळताना आणि यूपीएवर जोरदार टीका करताना दिसले होते.
4 जून 2013ला एबीपी या वृत्तवाहिनीच्या प्रश्नांची उत्तरं देताना बाबा रामदेव म्हणाले होते, "मोदी देशाला स्थिर सरकार देऊ शकतात. ते एक असे व्यक्ती आहेत जे काळा पैसा, भ्रष्टाचार आणि व्यवस्थेत बदल या मुद्द्यांवर सहमत आहेत. याशिवाय सर्व सर्वेक्षणात त्यांचं नाव आघाडीवर आहे. मी लाखो किलोमीटरची यात्रा केली आहे. त्यांना लोकांचा पाठिंबा मिळत आहे."
इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जेव्हा रामदेव मोदींना भारताचे आगामी पंतप्रधान म्हणून संबोधत होते तेव्हा त्यांच्या पक्षाने त्यांना निवडणूक समितीचा अध्यक्षसुद्धा बनवलं नव्हतं.
इथून सुरुवात झाल्यावर पंतप्रधान होईपर्यंत स्वामी रामदेव यांनी प्रत्येक व्यासपीठावर मोदींना प्रामाणिक, राष्ट्रवादी आणि काळ्या पैशाविरुद्ध ठोस भूमिका घेणार नेता असा उल्लेख केला. पुढे 29 डिसेंबर 2013ला बंगळुरू प्रेस क्लबमध्ये स्वामी रामदेव यांनी वोट फॉर मोदी या नावाने दारोदार प्रचार करणार आहे, असं सांगितलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र हे मोदीप्रेम अचानक फुललं नव्हतं. 2011 मध्ये जेव्हा अण्णा हजारेंनी आंदोलन केलं तेव्हा रामदेव बाबा कोणत्यातरी राजकीय भूमिकेच्या शोधात आहेत हे दिसत होतं. 4 जून 2011 ला दिल्लीच्या रामलीला मैदानात बाईच्या वेशात ज्या पद्धतीने पळाले त्याची मीडियात मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली गेली. पण रामदेव बाबा त्यातून लवकरच बाहेर पडले.
त्याआधी रामदेव बाबांनी 2010 मध्ये भारत स्वाभिमान नावाचा एक राजकीय पक्ष स्थापन केला होता. या पक्षाच्या स्थापनेची घोषणा करताना पुढच्या निवडणुकीत उमेदवार उभा करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र एका वर्षांच्या आतच त्यांनी भारतीय जनता पक्षाला समर्थन देण्याच निर्णय घेतला.
भाजपला किती फायदा झाला?
त्यांचा हा निर्णय भारतीय जनता पक्षासाठी अनुकूल ठरला. भाजपचा कोअर मतदार कथितपणे सवर्ण आहे. गुजरात दंगलीतील मोदींच्या संशयास्पद भूमिकेमुळे मुस्लीम समजाचा भाजपबद्दलचा अविश्वास अधिकच बळकट झाला होता. अशा परिस्थितीत यूपीए सरकार मुळापासून उखडण्यासाठी राजकीय पातळीवर मागास आणि दलित समाजाचा विश्वास जिंकता येणं आवश्यक होतं.

फोटो स्रोत, Getty Images
हा विश्वास जिंकण्यासाठी रामदेव बाबा यांनी एका पुलासारखी भूमिका निभावली. योगच्या माध्यमातून बाबा रामदेव त्यावेळी सेलेब्रिटी झाले होते. त्यांच्या योग शिबिरासाठी मध्यमवर्गीय हजारोंच्या संख्येने जमत आणि टीव्हीच्या माध्यमातून त्यांचे कार्यक्रम करोडो लोकांपर्यंत पोहोचत होते. अध्यात्म आणि राष्ट्रवादाच्या नावावर बाबा रामदेव एक प्रकारे हिंदुत्वाचा चेहरा बनले होते.
काळा पैसा आणि भ्रष्टाचार या विषयांवर यूपीएच्या विरोधात वातावरण तापलं होतं. त्याला बाबा रामदेव यांनी दिशा दिली. त्यांच्या या भूमिकेमुळे भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या समोरचा मार्ग सोपा झाला होता.
2014ला लोकसभा निवडणुकीच्या 2 आठवडे आधी नवी दिल्लीतील एका मेगा कँपमध्ये त्यांनी नरेंद्र मोदींना व्यासपीठावर बोलवलं होतं. त्यावेळी त्यांनी सांगितलं होते, तुम्ही फक्त मतदान करू नका तर दुसऱ्या लोकांनी समजवून ही सांगा.
रामलीला मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात नरेंद्र मोदी म्हणाले होते की त्यांचं आणि बाबा रामदेव यांचं लक्ष्य एकच आहे.
आता प्रश्न असा पडतो की बाबा रामदेव यांनी नरेंद्र मोदी यांच्यापासून अंतर राखण्याची गरज का निर्माण झाली?
अर्थात हेही खरं आहे की एनडीटीव्हीच्या कार्यक्रमात त्यांनी मोदींवर टीका करण्याचं टाळलं होतं. त्यांच्या मते इतरांना मोदींवर टीका करण्याचा मूलभूत अधिकार आहे.
हजारो कोटींचा उद्योग
बाबा रामदेव जर त्यांची भूमिका बदलत असतील तर त्या मागील व्यवहारिकता ही पाहायला हवी. बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद कारभार हजारो कोटींचा झाला आहे.
न्यूयार्क टाइम्सने 'द बिलियनेर योगी बिहाइंड मोदी'ज राइज' हे वृत्त प्रसिद्ध केलं होतं. त्यात बाबा रामदेव यांनी 2015पर्यंत त्यांच्या उद्योग समूहातून होणारी विक्री 15 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा उद्देश आहे, असं म्हटलं आहे. सध्या ही विक्री 1.6 अब्ज डॉलर इतकी आहे.
मोदी सरकारच्या काळात बाबा रामदेव यांचं साम्राज्य किती वाढलं याची झलक रॉयटर्सच्या एका शोधपत्रकारितेतही दिसतं. यात असा दावा करण्यात आला आहे की मोदी सत्तेत आल्यानंतर पतंजली समूहाने देशात 2000 एकर जमीन अधिग्रहित केली असून तिची किंमत बाजारभावापेक्षा फारच कमी आहे. यामध्ये भाजप सत्तेत असलेल्या महाराष्ट्र राज्याचाही समावेश होता.

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या वर्षी हरिद्वारमध्ये पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूटच्या उद्घाटनला त्यांनी मोदींनाच बोलवलं होतं. तसंच ज्या पद्धतीने मोदी सरकारने योग आणि आयुर्वेदचा प्रसार केला त्याचा फायदा रामदेव बाबा यांनाही झाला आहे.
अशा परिस्थितीत ज्या प्रकारे रामदेव बाबा 2014ला मोदींची स्तुती करत होते तशी आता का करत नाहीत, हे समजणं कठीण आहे. कोणत्याही एका राजकीय पक्षाशी जवळीक भविष्यात त्यांच्यासाठी संकटांचा मोठं जंजाळ निर्माण करू शकते.
या सगळ्या परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की रामदेव बाबा भारतीय राजकारणाची नस आणि नस ओळखून आहेत. भूतकाळात त्यांनी गरज पडेल तशी समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांचीही स्तुती केली आहे.
काय माहीत त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा नवं वळण घेत असतील. रामदेव बाबा भविष्यात भारताचे डोनाल्ड ट्रंप होण्यासाठी प्रयत्न करू शकतील, असा दावा न्यूयॉर्क टाइम्सच्या या वृत्तात करण्यात आला होता. स्वतःला सत्तेच्या शिखरावर पाहाण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा असू शकते. अर्थात त्यांनी स्वतः तसं कधी जाहीर केलेलं नाही.
एनडीटीव्हीच्या कार्यक्रमात ते सांगतात राजकीय पक्ष म्हणजे संपूर्ण देश नाही.
ते सांगतात त्यांना येत्या 50 वर्षांत देशाच्या सामाजिक, राजकीय आणि आध्यत्मिक जीवनात योगदान द्यायचं आहे आणि त्यांचं वय अजून गेलेलं नाही. त्यांच्या या भूमिका कशाप्रकारे पुढं येतील याची उत्तरं येत्या काळाच्या गर्भात लपलेली आहेत. म्हणूनच याचा आताच अंदाज बांधणं बहुतेक योग्य ठरणार नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








