नरेंद्र मोदी ज्यांच्या दरबारात गेले ते मुस्लीम कोण आहेत?

फोटो स्रोत, Twitter@narendramodi
- Author, अनिल जैन
- Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी, इंदूरहून
हिंदुत्ववादी विचारसरणीचे पालन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी इंदूर शहरात दाऊदी बोहरा मुस्लीम समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. कोण आहेत हे दाऊदी बोहरा मुस्लीम?
दाऊदी बोहरा समाजाचे सर्वोच्च धर्मगुरू सैय्यदना मुफद्दल सैफुद्दीन सध्या मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. ते 6 सप्टेंबर रोजी इंदुरात पोहोचले आणि 25 सप्टेंबरपर्यंत त्यांचा मुक्काम तिथेच आहे.
मोहरमच्या कार्यक्रमात त्यांचं प्रवचनही ठेवण्यात आलं आहे. मध्य प्रदेश सरकारने सैय्यदना यांना राजकीय अतिथीचा दर्जा दिला आहे. अर्थातच स्थानिक प्रशासन आणि भाजपच्या ताब्यातली नगरपालिकासुद्धा सैय्यदना यांच्या पाहुणचारात व्यग्र आहेत.
दोन महिन्यांनंतर मध्य प्रदेशात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा सैयदना यांची भेट घेण्यासाठी शुक्रवारी इंदुरात दाखल झाले. राहुल गांधी यांच्या दौऱ्यासाठीसुद्धा प्रदेश काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत.
मतांच्या गणिताचा विचार केला तर मध्य प्रदेशात बोहरा मुस्लीम समाज इंदूर, बऱ्हाणपूर आणि उज्जैन या तीन शहरातच आहे. मात्र भाजप आणि काँग्रेस यांना बोहरा मुस्लिमांचं महत्त्व फक्त मतांपुरतंच नाही तर सैयदना यांच्याकडून निवडणूक देणगीच्या रूपाने मिळणाऱ्या पैशांचंही आहे.

फोटो स्रोत, Twitter@narendramodi
असं म्हणतात, सैय्यदना त्यांच्या अनुयायांकडून वेगवेगळ्या पद्धतीने मिळवलेल्या निधीतील मोठी रक्कम या दोन्ही पक्षांना निवडणूक देणगी म्हणून देतात. म्हणूनच दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाने सैय्यदना यांच्या दरबारात हजेरी लावणं, यात काहीही आश्चर्य नाही. अर्थात सैय्यदनांकडून पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांचा व्यवहार गुप्त असतो.
यावेळचं वेगळेपण हेच की पहिल्यांदाच एक पंतप्रधान बोहरा धर्मगुरूंना भेटण्यासाठी गेले. यापूर्वी भारताच्या कोणत्याही पंतप्रधानांनी सैय्यदना यांची अशी भेट घेतलेली नाही. मात्र 1960च्या दशकात तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू गुजरातच्या सूरतमध्ये बोहरा समाजाच्या एका शिक्षण संस्थेच्या उद्घाटनाला गेले होते. तिथे त्यांची त्यावेळचे 51वे सैय्यदना ताहीर सैफुद्दीन यांची भेट झाली होती. या भेटीचं छायाचित्र सैय्यदना आणि त्यांचे निकटवर्तीय अजूनही दाखवतात.
मध्ययुगीन राजसारखा कारभार
इतर धर्मगुरूंच्या तुलनेत सैय्यदना यांचा या समाजात वेगळा प्रभाव आहे. एक प्रकारे ते त्यांच्या समाजाचे शासक आहेत. ते स्वतः मुंबईत त्यांच्या आलिशान आणि भव्य अशा सैफी महलमध्ये संपूर्ण गोतावळ्यासह आधुनिक सुखसुविधांचा उपभोग घेतात. मात्र अनुयायांवर नियंत्रण ठेवण्याची त्यांची पद्धत पूर्णपणे मध्ययुगीन राजा-महाराजांसारखीच आहे.

फोटो स्रोत, Akanksha Megha
त्यांची नियुक्तीसुद्धा लोकशाही पद्धतीने नव्हे तर वारसाहक्काने होते. अशी नियुक्ती प्रत्यक्ष इस्लामविरोधी आहे.
सुधारणावादी बोहरा आंदोलनाचे नेते इरफान इंजिनीअर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून विनंती केली होती की, एका धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी 'वादग्रस्त' धर्मगुरूंच्या कार्यक्रमात हजेरी लावणे योग्य नाही. पण मोदी यांनी ही विनंती मान्य केली नाही.
असा आहे बोहरा समाजाचा इतिहास
दाऊदी बोहरा समाजाचा वारसा फातिमा इमामांशी जोडलेला आहे. त्यांना पैंगबर हजरत मोहम्मद (570-632) यांचे वंशज मानलं जातं. या समाजाची प्रामुख्याने इमामांवर श्रद्धा असते. दाऊदी बोहरा यांचे शेवटचे आणि 21वे इमाम तैयब अबुल कासीम हे होते. त्यांच्यानंतर 1132पासून आध्यात्मिक गुरूंची परंपरा सुरू झाली. त्यांना दाई-अल-मुतलक सैय्यदना म्हणतात.
दाई-अल-मुतलकचा अर्थ होतो सर्वोच्च सत्ता. अशी सर्वोच्च सत्ता ज्यांच्या कामकाजात कुठलीच आतली किंवा बाहेरची शक्ती दखल देऊ शकत नाही. त्यांच्या आदेशाला कोणीच आव्हान देऊ शकत नाही. सरकार किंवा न्यायालयातही नाही.

फोटो स्रोत, Aakansha Megha
दाऊदी बोहरा समाज सर्वसामान्यपणे शिक्षित, मेहनती, व्यापारी आणि समृद्ध असण्याबरोबरच आधुनिक जीवनशैली जगणारा आहे. मात्र सोबतच त्यांना धार्मिक समजलं जातं.
यामुळेच ते आपल्या धर्मगुरूशी पूर्णपणे समर्पित असतात. त्यांच्या प्रत्येक आदेशाचं ते निष्ठेने पालन करतात.
सैय्यदना यांच्या वैधतेचा वाद कोर्टात
सध्याच्या सैय्यदना यांच्या कुटुंबातीलच काहींनी त्यांच्या सैय्यदना बनण्याच्या प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. सध्याचे सैय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांचे वडील डॉ. मोहम्मद बुरहानुद्दीन 52वे सैय्यदना होते. परंपरेनुसार त्यांनाच त्यांचा वारस निवडायचा होता. मात्र 2012मध्ये अचानक गंभीर आजारने ते कोमात गेले. त्यामुळे ते आपला वारसदार निवडू शकले नाही. मात्र त्यांनी त्यांचा धाकटा भाऊ खुजेमा कुतुबुद्दीन यांना आपला माजूम म्हणेज मेजर नियुक्त केलं होतं. असं सांगतात की प्रथेप्रमाणे वारसदाराची औपचारिक घोषणा न करताच सैय्यदना यांचा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत त्यांच्या माजूमलाच पुढचा सैय्यदना मानलं जातं. मात्र फेब्रुवारी 2014मध्ये 52व्या सैय्यदना डॉ. बुरहानुद्दीन यांच्या मृत्यूनंतर असं झालं नाही. त्यांचे पुत्र मुफद्दल सैफुद्दीन यांनी आपल्या काकांच्या दाव्याकडे दुर्लक्ष करत स्वतःला 53वे सैय्यदना घोषित केलं.
दुसरीकडे खुजेमा कुतुबुद्दीन यांनीदेखील 52वे सैय्यदना यांचे माजूम म्हणून स्वतःला स्वाभाविक वारसदार म्हणत 53वे सैय्यदना घोषित केलं आणि आपल्या पुतण्याच्या दाव्याला जूनमध्ये कोर्टात आव्हान दिलं.

फोटो स्रोत, Akansha Megha
कोर्टाने वारंवार नोटीस बजावूनदेखील मुफद्दल सैफुद्दीन कोर्टात हजर झाले नाहीत. हा खटला सुरू असतानाच 30 मार्च 2016ला खुजेमा कुतुबुद्दीन यांचा मृत्यू झाला. त्यांनी मृत्यूपूर्वी त्यांचा मुलगा ताहीर फखरुद्दीन याला उत्तराधिकारी घोषित केलं होतं. त्यामुळे ताहीर फखरुद्दीन यांनी पदभार सांभाळला आणि स्वतःला 54वे सैय्यदना घोषित केलं.
काकांच्या निधनानंतर लगेच मुफद्दल सैफुद्दीन यांनी आपल्या वकिलामार्फत कोर्टाला विनंती केली की खुजेमा कुतुबुद्दीन यांचं निधन झाल्याने हा खटला रद्दबातल करावा.
यावर ताहीर फखरुद्दीन यांनी आक्षेप घेतला. हा आक्षेप स्वीकार करत कोर्टाने मुफद्दल सैफुद्दीन यांची विनंती फेटाळली आणि खटला सुरू राहील, असा निर्वाळा दिला.
देशी-परदेशी अनुयायी
ताहीर यांना देशातील अनुयायांचं फारसं समर्थन नसलं तरी अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, सौदी अरेबियासारख्या देशातील बोहरा समाजातील मोठा गट त्यांनाच आपला 54वा सैय्यदना मानतात.
अब्दुल अली यांना विश्वास वाटतो की भारतातील दाऊदी बोहरांचं बहुमत सध्या मुफद्दल सैफुद्दीन यांना आपला सैय्यदना मानत असला तरी न्यायालय त्यांचे भाऊ ताहीर फखरुद्दीन यांचा दावा मान्य करेल. कारण आमचा पक्ष मजबूत आणि न्यायसंगत आहे, असं ते सांगतात.
लहान मुलींची खतना
52वे सैय्यदना यांच्या वारसदाराच्या खटल्याव्यतिरिक्त मुफद्दल सैफुद्दीन यांना सुप्रीम कोर्टात एका गंभीर खटल्याचा सामना करावा लागतोय. हा खटला आहे बोहरा मुस्लीम समुदायातील लहान मुलींच्या खतन्यासंबंधी. खतना म्हणजे लैंगिक भावनाच तयार होऊ नये, यासाठी मुलींच्या जननेंद्रियातला एक भाग कापणे.
दाऊदी बोहरा समाजात परंपरेच्या नावाखाली अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रथेला अमानवीय म्हणत न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, Akansha Megha
दाऊदी बोहरा समाजाच्या धर्मगुरूंच्या आदेशावरूनच सुरू असलेल्या या परंपरेवर याच समाजातील सुधारणावादी गटातील पुण्याच्या मासुमा रानलवी म्हणतात की कुराण किंवा हादीसमध्ये अशाप्रकारच्या परंपरेचा उल्लेख नाही.
मासुमा सांगतात, "ही खूप अमानवीय प्रथा आहे. अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियामध्ये खतना करणं हा गुन्हा असल्याचं घोषित करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियात तर याबाबत बळजबरी करणाऱ्याच्या आरोपाखाली तेथील सैय्यदनाच्या प्रतिनिधीला तुरुंगातही पाठवण्यात आलं आहे. अमेरिकेतही एका मुलीची खतना करणाऱ्या डॉक्टरला तुरुंगात जावं लागलं आहे."
केंद्र सरकार खतनाच्या विरोधात
सुप्रीम कोर्टाने यासंबंधी दाखल जनहित याचिकेवर सैय्यदनासोबतच केंद्र सरकारलाही नोटीस बजावत त्यांचं मत विचारलं आहे. केंद्राने उत्तरात कोर्टाला सांगितलं आहे की, सरकार अशाप्रकारच्या परंपरेच्या बाजूने नाही. बोहरा समाजाच्या धर्मगुरू वर्गाला मात्र अजूनही विश्वास आहे की केंद्र सरकारच्या भूमिकेत बदल होईल.

फोटो स्रोत, Getty Images
स्वतःला 54वे सैय्यदना म्हणवणारे ताहीर फखरुद्दीन यांचे धाकटे बंधू अब्दुल अली याबाबत सांगतात, "मुलींची खतना ही धार्मिक परंपरा नाही. आम्हाला वाटतं 18वर्षांपर्यंतच्या मुलींची खतना तर व्हायलाच नको आणि 18 वर्षांनंतर हा निर्णय तिच्यावर सोपवावा."
सैय्यदना यांचं सामाजिक-धार्मिक तंत्र
देश-परदेशात जिथे-जिथे बोहरा समाजाची माणसं आहेत तिथे सैय्यदनांनी आपले प्रतिनिधी नियुक्त केले आहेत. त्यांना आमिल म्हणतात. हे आमिलच सैय्यदनांचे आदेश आपल्या लोकांपर्यंत पोहोचवतात आणि त्याची अंमलबजावणी करून घेतात.
स्थानिक पातळ्यांवर सामाजिक आणि धार्मिक कार्यांवरही या आमिलांचंच नियंत्रण असतं. निश्चित कालावधीनंतर त्यांच्या बदल्याही होतात.
बोहरा धर्मगुरू सैय्यदना यांनी तयार केलेल्या व्यवस्थेनुसारच या समाजातील सर्व सामाजिक, धार्मिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक कार्यांसाठी सैय्यदनांची परवानगी बंधनकारक असते आणि ही परवानगी मिळविण्यासाठी ठराविक शुल्क भरावं लागतं.

फोटो स्रोत, Akansha Megha
लग्न, बारसं, परदेश यात्रा, हज, नव्या व्यवसायाची सुरुवात, अंत्यविधी सर्व सैय्यदना यांच्या परवानगीनंतर आणि त्यासाठी शुल्क भरल्यानंतरच होऊ शकतं.
एवढंच नाही सैय्यदना यांना बघण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्यांच्या हाताचं चुंबन घेणासाठी (याला बोसा घेणं म्हणतात) मोठी रक्कम द्यावी लागते. याशिवाय समाजातील प्रत्येकाला आपल्या वार्षिक उत्पन्नातील एक भाग दान म्हणून द्यावा लागतो.
आमिलांच्या माध्यमातून जमविलेला हा सर्व पैसा सैय्यदना यांच्या खात्यात जमा होतो.
अमाप संपत्तीचे मालक आहेत सैय्यदना
दाई-अल-मुतलक म्हणजेच सैय्यदना दाऊदी बोहरा समाजाचे सर्वोच्च धर्मगुरूच नाही तर समाजाच्या सर्व सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक ट्रस्टचे प्रमुखही असतात. याच ट्रस्टच्या माध्यमातून सर्व मशिदी, धर्मशाळा, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल्स, दर्गे आणि कब्रस्तानांचं व्यवस्थापन होतं.
या सर्व ट्रस्टची एकूण संपत्ती पन्नास हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातं. बोहरा समाजातील सुधारणावादी आंदोलनाशी जोडलेल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की या ट्रस्टचं उत्पन्न-खर्च आणि समाजातील लोकांकडून वेगवेगळ्या पद्धतीने जमवलेल्या पैशाचा हिशेब लोकशाही पद्धतीने कधीच अनुयायांसमोर ठेवण्यात आलेला नाही.
मात्र सैय्यदनांच्या समर्थकांचं म्हणणं आहे की हा पैसा शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल्स आणि इतर अध्यात्मिक कार्यांवर खर्च केला जातो.

फोटो स्रोत, Akansha Megha
सैय्यदनांनी स्थापन केलेल्या या व्यवस्थेचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर किंवा त्या कुटुंबावर सामाजिक बहिष्काराचं फर्मान सैय्यदना बजावतात. सैय्यदनांच्या हुकूमानुसार बहिष्कृत व्यक्ती किंवा त्या कुटुंबाशी समाजातील कोणतीच व्यक्ती कुठल्याच प्रकारचा संबंध ठेवू शकत नाही.
बहिष्कृत व्यक्ती आपल्या कुटुंबातील लग्नकार्यात सहभागी होऊ शकत नाही आणि अंत्ययात्रेतही जाऊ शकत नाही. बहिष्कृत कुटुंबातील कोणाचा मृत्यू झाला तर बोहरा समुदायातील कब्रस्तानात दफनसुद्धा करू दिलं जात नाही.
आयटीएस कार्ड म्हणजे समांतर आधार कार्ड
गेल्या काही वर्षांपासून सैय्यदनांच्या आदेशावरून समाजातील प्रत्येक व्यक्तीचं (नवजात बालकापासून वयोवृद्धांपर्यंत) ओळखपत्र तयार करण्यात येत आहे. आधार कार्डप्रमाणेच कॉम्प्युटरद्वारे हे कार्ड बनवलं जातं. त्याला इदारतुल तारीफ अल शख्सी म्हणजेच आईटीएस कार्ड म्हणतात. या कार्डाच्या आधारेच प्रत्येकाला समाजाच्या मशिदी, धर्मशाळा, कब्रस्तान सारख्या ठिकाणी प्रवेश मिळतो.

फोटो स्रोत, Akansha Megha
या कार्डाच्या आधारे समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या सामाजिक व्यवहारांवर एक प्रकारे देखरेख ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या कोणा व्यक्तीचा व्यवहार धर्मगुरुंच्या मतानुसार संशयास्पद आढळतो, तिचं कार्ड ब्लॉक करण्यात येतं. कार्ड ब्लॉक झाल्यावर त्या व्यक्तीला समाजाच्या मशिदी, धर्मशाळा, कब्रिस्तान सारख्या ठिकाणी प्रवेश बंद होतो.
सामाजिक बहिष्काराची ही आधुनिक पद्धतच सैय्यदनांनी शोधून काढली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. उदयपूर, मुंबई, पुणे, सूरत, गोध्रासारख्या शहरांमध्ये शेकडो बोहरा कुटुंब सामाजिक बहिष्काराचे बळी ठरले आहेत.
सुधारणावादी बोहरा आंदोलनाचा इतिहास आणि वर्तमान
दाऊदी बोहरा समाजातील सुधारणावादी आंदोलनाची सुरुवात 1960च्या दशकात नौमान अली कॉन्ट्रॅक्टर यांनी केली. त्यांच्या काळात या आंदोलनाला फारशी गती मिळाली नाही. मात्र त्यांच्या निधनानंतर 1980मध्ये डॉ असगर अली इंजीनिअर यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. तेव्हा चळवळीचा विस्तार झाला.
इंजिनीअर यांनी दाऊदी बोहरांचं वास्तव्य असलेल्या सर्व देशांचा दौरा केला. इतकेच नाही तर त्यांनी भारतातील विख्यात विचारवंत, मानवाधिकार कार्यकर्ते, माजी न्यायमूर्ती, लेखक आणि कलाकारांना या चळवळीशी जोडलं. मात्र त्यांच्या निधनानंतर चळवळ थंडावली.
दाऊदी बोहरांबद्दल हेसुद्धा जाणून घ्या
बोहरा हा गुजराती शब्द 'वहौराऊ' म्हणजेच व्यापार याचा अपभ्रंश आहे. ही मंडळी अकराव्या शतकात उत्तर इजिप्तमधून धर्मप्रचारकांच्या माध्यमातून भारतात आले.
सैय्यदानांच्या मृत्यूनंतर त्यांचे वंशज दाऊद बिन कुतुब शाह आणि सुलेमान शाह यांच्यात सैय्यदानांची पदवी आणि तख्त यावरून वाद झाला. ज्यावरून दोन मतं कायम झाली आणि दोन्हींच्या अनुयायांमध्ये विभाजन झालं. दाउद बिन कुतुब शाहंना मानणारा दाउदी बोहरा तर सुलेमान यांना मानणाऱ्यांना सुलेमानी बोहरा म्हटलं गेलं. सुलेमानी बोहरा दाऊदी बोहरांच्या तुलनेत संख्येने खूपच कमी होते. काही काळानंतर त्यांच्या प्रमुखांनी आपलं मुख्यालय येमेनमध्ये उभारलं आणि दाऊदी बोहरांच्या धर्मगुरूंचं मुख्यालय मुंबईत कायम झालं.

फोटो स्रोत, Akansha Megha
दाउदी बोहरांच्या 46व्या धर्मगुरूंच्या काळात या समाजातही विभाजन झालं आणि दोन उपशाखा तयार झाल्याचं सांगतात. यावेळी भारतात बोहरा मुस्लिमांची संख्या 20 लाख आहे. ज्यातले 12 लाख दाउदी बोहरा आहेत आणि उर्वरित इतर आहेत.
दोन मतप्रवाहांमध्ये विभाजन झाल्यावरही दाऊदी आणि सुलेमानी बोहरा समाजाच्या धार्मिक सिद्धांतांमध्ये फार मूलभूत फरक नाही. दोन्ही समाज सुफी आणि मजारींवर खास श्रद्धा ठेवतात.
सुलेमानी ज्यांना सुन्नी बोहरासुद्धा म्हटलं जातं, हनफी इस्लामी कायदे पाळतात. तर दाऊदी बोहरा समाज इस्माइली शिया समाजाचा उप-समाज आहे आणि दाईम-उल-इस्लामचे कायदे पाळतात.
हा समाज आपल्या पुरातन परंपरांशी जोडलेला समाज आहे. ज्यात केवळ आपल्या समाजातच लग्न करणंसुद्धा अंतर्भूत आहे. अनेक हिंदू प्रथाही या समाजात दिसतात.
भारतात दाऊदी बोहरा प्रामुख्याने गुजरातमध्ये सूरत, अहमदाबाद, वडोदरा, जामनगर, राजकोट, नवसारी, दाहोद, गोध्रा, महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, राजस्थानात उदयपूर, भिलवाडा, मध्य प्रदेशात इंदूर, बऱ्हाणपूर, उजैन, शाजापूर व्यतिरिक्त कोलकाता, चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबादमध्ये वसले आहेत.
पाकिस्तानातील सिंध प्रांतांशिवाय इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई, इजिप्त, इराक, येमेन आणि सौदी अरेबियातही दाउदी बोहरा समाज मोठ्या संख्येने आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








