You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी मनोहर पर्रिकरच ; अमित शाह म्हणतात वेळ आल्यावर निर्णय घेऊ
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती आणखी खालावल्याने त्यांना विशेष विमानाने शनिवारी दिल्लीला हलवण्यात आलं. स्वादुपिंडाच्या आजारानं त्रस्त असलेल्या पर्रिकर यांच्यावर राजधानीतल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये (AIIMS) उपचार सुरू आहेत.
पण एकीकडे दिल्लीत पर्रिकरांच्या तब्येतीची काळजी घेतली जात असताना गोव्यात भाजप आणि मित्रपक्षांना दुसरीच काळजी लागून आहे - मुख्यमंत्रिपदाचं काय करायचं?
गोव्याची पुढील राजकीय वाटचाल कशी असेल, याबद्दल चर्चा करण्यासाठी रविवारी भाजपचे तीन निरीक्षक गोव्यात दाखल होणार आहेत. ते सोमवारी पक्षश्रेष्ठींना अहवाल देणार आहेत, असं भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य दत्तप्रसाद खोलकर यांनी सांगितलं.
गोव्याची धुरा कोणाकडे?
भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी हैदराबादमध्ये शनिवारी सांगितलं की, "पक्षाने पर्रिकरांच्या जागी दुसऱ्याची नेमणूक करण्याबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही. योग्य वेळी पक्ष त्याबद्दलचा निर्णय घेईल. सध्या सगळं लक्ष पर्रिकरांच्या तब्येतीकडे लागलेलं आहे."
पण पर्रिकरांच्या जागी कुणाला गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी बसवायचं, हा मोठा प्रश्न आज नाही तर उद्या भाजपसमोर उभा असणारच आहे. केंद्रात मंत्री असलेले श्रीपाद नाईक, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदिन ढवळीकर आदींच्या नावाची चर्चा आजही राज्यात सुरू आहे. मात्र तूर्तास याबद्दल स्पष्टता नाही.
गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांनी शनिवारी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं की, "आमचा पाठिंबा हा पर्रिकरांना आहे. दुसऱ्या कोणाच्या पाठिंब्याचा सध्यातरी विचार नाही."
दरम्यान, गोव्यातले लोकमतचे निवासी संपादक राजू नायक यांनी सांगितलं की, "शुक्रवारपर्यंत सुरू असलेल्या चर्चेनुसार, सुदिन ढवळीकर यांच्याकडे तात्पुरता मुख्यमंत्रिपदाची सूत्रं द्यावीत, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष भाजपमध्ये विलीन करावा, असे पर्याय होते."
मात्र, भाजपला हे पचनी पडेल का आणि मगोपमधल्या सर्व गटांना हे मान्य होईल का, याविषयी शंका असल्याचे मत नायक यांनी व्यक्त केलं.
उपचार अमेरिका ते दिल्ली व्हाया मुंबई
या वर्षाच्या सुरुवातीस तीन महिने पर्रिकर अमेरिकेतील मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरमध्ये उपचारासाठी गेले होते. त्यापूर्वी आणि नंतर ते मुंबईतही रुग्णालयात दाखल होते. सप्टेंबर महिन्यात पुन्हा अमेरिकेत उपचार घेऊन ते परतले होते.
या उपचारादरम्यान त्यांनी एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करत "माझ्यावर सुरू असलेले उपचार यशस्वी होत असून, मी काही आठवड्यांत तुमच्यासोबत असेन," असं ते म्हणाले होते.
बुधवारी गोव्याच्या कलंगुट येथील एका खासगी रुग्णालयात पर्रिकर यांना दाखल करण्यात आलं होतं. शुक्रवारी त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देण्याची इच्छा भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे व्यक्त केली होती, असं वृत्त लोकमतने दिलं आहे.
शुक्रवारी त्यांनी पर्रा-म्हापसा येथील घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. काही मिनिटांतच ते रुग्णालयात परतले, असं बीबीसीच्या वार्ताहर मनस्विनी प्रभुणे-नायक यांनी सांगितलं.
शुक्रवारी रुग्णालयात भाजपचे संजीव देसाई, दत्ता खोलकर यांनी पर्रिकर यांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय घडोमोडींना वेग आल्याची माहितीही मनस्विनी यांनी दिली.
रविवारी दुपारी ज्येष्ठ भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी AIIMSला भेट देऊन पर्रिकर यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)