#5मोठ्याबातम्या : भारतात गरिबी घटली पण असमानता वाढली - UNDPचा अहवाल

आजच्या वर्तमानपत्रात आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे-

1. UNDP : भारतात गरिबी टली, पण असमानता वाढली

भारतात लाखो लोक गरिबी रेषेच्या वर आले असले तरी असमानतेचं प्रमाणही वाढलं आहे, असं UNDPच्या एका रिपोर्टमधून पुढे आलं आहे.

ह्युमन डेव्हल्पमेंट इंडेक्स (HDI)मध्ये भारताचं स्थान गेल्या वर्षीच्या तुलनेत एक घर वर सरकलं आहे. आता 189 देशांमध्ये भारताचा क्रमांक 130वा आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, 1990 ते 2017 या काळाचा विचार केला तर भारताचं HDI मूल्य 50 टक्क्यांनी वाढलं आहे. याचाच अर्थ काही लाख लोक हे गरिबी रेषेच्या वर आले आहेत.

पण याच काळात वाढत्या असमानतेचा भारताला फटका बसला आहे. भारताचा Inequality-adjusted HDI (IHDI) म्हणजेच असमानता ध्यानात घेऊन आलेला ह्युमन डेव्हल्पमेंट इंडेक्स 0.468 वर आला आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 26.8 टक्क्यांनी कमी झाला आहे. जागतिक पातळीवर हाच आकडा 20 टक्क्यांनी कमी झाल्याने ही फार काही चांगली कामगिरी नाही, असं या वृत्तात सांगण्यात आलं आहे.

2. डॉल्बी, DJवर बंदी कायम

पाच दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या दिवशी डॉल्बी आणि DJला परवानगी मिळणार नाही.

जुलै 2017मध्ये सरकारने डॉल्बी आणि DJवर बंदी घातली होती. या बंदीविरोधात ऑडिओ आणि लायटनिंग असोसिएशनने याचिका दाखल केली होती. ही याचिका शुक्रवारी उच्च न्यायलयात सुनावणीसाठी आली असताना कोर्टाने तत्काळ बंदी उठवण्यास नकार देत 19 तारखेपर्यंत सरकारला यावर उत्तर देण्यास सांगितलेलं आहे.

झी24तासच्या बातमीत म्हटल्याप्रमाणे, सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांनी डॉल्बी आणि DJवर बंदी का? लाइव्ह कॉन्सर्ट आणि ढोल-ताशांमुळेही आवाज होतो मग आमच्यावरच बंदी का, असे प्रश्न उपस्थित केले.

ही बंदी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे घातलेली असल्याचं सरकारने सांगितलं. पण न्यायालयाचे अशा प्रकारचे कोणतेही निर्देश नसल्याची बाजू याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात मांडली.

3. महागाई रोखण्यासाठी केंद्राचे उपाय

घसरता रुपया सावरण्यासाठी आणि चालू खात्यातली तूट कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं शुक्रवारी नवीन उपाययोजना जाहीर केली. त्यात अनावश्यक आयातीवर चाप, निर्यातीस प्रोत्साहन आणि डॉलरची आवक वाढवण्यासाठी पाच गोष्टी, असे उपाय जाहीर केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल आणि वरिष्ठ अधिकारी यांची दिल्लीत बैठक झाली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत रुपयाची घसरण आणि चालू खात्यातली तूट अशी स्थिती बराच काळ राहण्याची भीती व्यक्त झाल्याचं टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीत म्हटलं आहे.

4. गोव्यात नेतृत्वबदलाची शक्यता?

गेले दोन दिवस कलंगुट येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती ढासळल्यामुळे राज्यात नेतृत्वबदल अपरिहार्य बनला आहे. त्याबाबत आढावा घेण्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींचे निरीक्षक बी. संतोष किंवा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शनिवारी गोव्यात येण्याची शक्यता आहे.

अमेरिकेहून उपचार करून परतल्यानंतर गेले आठ दिवस पर्रीकरांनी मंत्रालयाला भेट दिलेली नाही. बुधवारी पर्रीकर मंत्रालयात हजर होणार होते. त्याच प्रमाणे मंत्रिमंडळातील सदस्य, घटकपक्षाचे नेते किंवा भाजपाच्या कोअर कमिटीलाही भेटण्याचं त्यांनी टाळलं आहे.

मनोहर पर्रीकर यांना गुरुवारी सकाळी कलंगुट येथील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. 'पर्रीकरांनी आम्हाला चर्चा करण्यासाठी गुरुवारी त्यांच्या पणजी येथील निवासस्थानी बोलावलं होतं. परंतु ऐनवेळी त्यांनी सर्व भेटी रद्द केल्या आणि बुधवारपासून ते कुणाशी फोनवरही बोललेले नाहीत," असे मंत्रिमंडळातील एका सदस्याने लोकमतला सांगितले.

5. आता भोपाळमध्येही 'आर्दश सून' अभ्यासक्रम

बनारसच्या IITपाठोपाठ आता भोपाळच्या बरकतुल्ला विद्यापीठानंही तीन महिन्यांचा 'आदर्श सून' अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

द वायरच्या बातमीत म्हटल्याप्रमाणे, कुलगुरू D.C. गुप्ता यांनी सांगितलं की, समाजातील वाईट गोष्टी मोडून काढण्यासाठी, कुटुंब एकत्र राहावीत म्हणून हा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. महिला सक्षमीकरणासाठी हा अभ्यासक्रम केला जात असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)