You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फ्लोरेन्स चक्रीवादळ धडकलं : अमेरिकेत ५ ठार, तुफान पावसामुळे आता पुराचा धोका
अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर धडकलेल्या फ्लोरेन्स चक्रीवादळाच्या तडाख्यात पाच नागरिकांनी जीव गमावला आहे.
सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस घेऊन आलेल्या या वादळामुळे आता प्रलयकारी पूर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
राईटस्व्हिले शहराच्या किनाऱ्यावर या वादळाचं केंद्र सध्या स्थिरावलं आहे. नॉर्थ कॅरोलिनामध्ये हे शहर आहे. सध्या या भागात ताशी 110 किलोमीटरच्या वेगानं वारं वाहत आहेत.
न्यू बर्न शहरात काही लोक अडकले आहेत, जे सध्या मदतीची वाट पाहत आहेत. वादळामुळे अनेक ठिकाणी धुवांधार पाऊस पडत आहे.
या भागात सुमारे सहा लाख घरांतून वीज गायब आहे. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी काही दिवस किंवा आठवडा लागू शकतो असं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं.
नॉर्थ कॅरोलिनातील विल्मिंग्टनमध्ये झाड डोक्यावर पडल्यामुळे आई आणि मुलीचा मृत्यू झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोसळणाऱ्या हॉटेलमधून अनेकांची सुटका करण्यात आली.
लेनॉइर काउंटीमध्ये जनरेटर लावत असताना एकाचा मृत्यू झाला.
उत्तर कॅरोलिना प्रांतातील पेंडर काऊंटीमध्ये महिलेने सुटकेसाठी आपत्कालीन यंत्रणेला दूरध्वनी केला मात्र त्यांच्या घराकडे जाणाऱ्या मार्गावर घरं पडल्याने यंत्रणा पोहोचू शकली नाही. या महिलेला मदत मिळून त्यांची सुटका झाली का याबाबत आपत्कालीन यंत्रणांकडून माहिती मिळू शकलेली नाही.
फ्लोरेन्स वादळामुळे अमेरिकेत 18 ट्रिलिअन गॅलन एवढा प्रचंड पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर कॅरोलिना भागाला या पावसाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.
'फेमा'चे अधिकारी ब्रुक लाँग यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हर्जिनिया आणि कॅरोलिना या राज्यांत काही फूट पाणी साठण्याची शक्यता आहे.
फ्लोरेन्स चक्रीवादळ धडकण्यापूर्वीची बीबीसीच्या प्रतिनिधींनी वर्णन केलेली परिस्थिती पाहा -
गेल्या तीन दशकांतील सगळ्यांत शक्तिशाली असं हे वादळ असेल असं अंदाजकर्त्यांचं म्हणणं आहे.
17 लाख लोकांना हलवलं
वादळ येण्यापूर्वीच परिसर सोडण्यासाठी लोकांची मोठी घाई झाली होती. म्हणून या संकटाच्या तावडीत सापडण्यापूर्वी जवळपास 17 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं. मात्र हॉटेल तसंच अन्य इमारती धसल्याने अनेक लोक अडकले आहेत.
फ्लाइट अवेअर डॉट कॉमच्या मते, 1400पेक्षा जास्त विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. तर किनारपट्टीवरील विमानतळ बंद ठेवण्यात आले आहेत.
व्हर्जिनिया, मेरिलँड, वॉशिंग्टन, उत्तर आणि दक्षिण कॅरोलिना या राज्यांनी बुधवारी आणीबाणीची घोषणा केली आहे. त्यात आता जॉर्जियाची सुद्धा भर पडली आहे.
"असं राक्षसी वादळ आम्ही आधी कधी पाहिलं नाही," असं उत्तर कॅरोलिनाचे गव्हर्नर रॉय कूपर यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं.
किती हानी होऊ शकते?
NWSच्या मते वादळाची उंची 13 फूट असू शकते. किनारपट्टीला या वादळाचा धोका सगळ्यांत जास्त आहे.
या वादळामुळे काही भागात 64 सेमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. भूभागावर पोहोचल्यावरही वादळ कायम राहिलं तर या धोक्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
ट्रंप काय म्हणाले?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी उत्तर आणि दक्षिण कॅरोलिनात आणीबाणी लागू करण्याच्या आदेशावर सही केली आहे. वादळाला तोंड देण्यासाठी आणि मूलभूत सुविधा देण्यासाठी निधी मंजूर केला आहे.
या परिस्थितीत लढा देण्यासाठी निधी देण्यात कोणतीही कसूर केली जाणार नाही, असं ट्रंप यांनी आपल्या कार्यालयात बोलताना सांगितलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)