बाल लैंगिक शोषण : 'बौद्ध भिख्खू लहान मुलांना नग्न करून मारत होते'

बौद्ध

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र
    • Author, सीटू तिवारी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी, बोधगया

बिहारमधील गया जिल्ह्यातील ध्यान केंद्रात शांतता आहे. या भवनामध्ये आत गेल्यावर इथे 15 लहान मुलं राहात असतील असं वाटत नाही.

एका खोलीत जमिनीवर एका ओळीत शून्य नजरेने पाहात असलेली ही मुलं. कोणता खेळ नाही, कोणाशी बोलणं नाही, कोणाताही दंगा नाही. या सर्वांमध्ये एक अनामिक शांतता आणि भविष्याबद्दलची अनिश्चितता दिसत होती.

हीच परिस्थिती या मुलांच्या आईवडिलांची आहे. हे आईवडील चार दिवसांपूर्वी इथं आसामवरून आले आहेत. ही मुलं बोधगयातील एका ध्यान केंद्रात शिकत होती.

29 ऑगस्टला या ध्यान केंद्रात शिकणाऱ्या मुलांचं कथितरीत्या लैंगिक शोषण झाल्याचं समोर आलं होतं.

51 वर्षांच्या वरुण (बदलेले नाव) यांची 2 मुलं इथं शिकत होती. त्यांनी बीबीसीला सांगितलं, "बौद्ध भिख्खू मुलांना खोलीत बोलवून त्यांच्याकडून हस्तमैथून करवून घेत होते. एका मुलाला कोलकत्यात नेऊन त्याचं लैंगिक शोषण करण्यात आलं होतं."

"आम्ही शेती करतो. मुलांच्या शिक्षणावर खर्च करता येईल, इतका पैसा आमच्याकडे नाही. इथं मोफत शिकवलं जातं म्हणून दीड वर्षांपूर्वी मुलांना शिक्षणासाठी इथं पाठवलं होतं," ते सांगतात.

सुप्रिया (बदलेलं नाव) यांचा 9 वर्षांचा मुलगा आणि 11 वर्षांचा भाऊही या ध्यान केंद्रात राहून शिक्षण घेत होते. त्यांच्या मुलाच्या सर्वांगावर मारहाणीचे व्रण आहेत आणि कपाळावरही जखमेचा व्रण स्पष्ट दिसतो.

बौद्धगया बौद्ध धर्मियांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे.

फोटो स्रोत, SEETU TEWARI/BBC

फोटो कॅप्शन, बौद्धगया बौद्ध धर्मियांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे.

त्या सांगतात, "29 तारखेला जेव्हा आम्ही इथं आलो तेव्हा सगळी मुलं रडू लागली. माझ्या मुलाने सांगितले बौद्ध भिख्खू त्याला नग्न करून मारत होते. त्याचे गुप्तांग खेचत होते. कधी बौद्ध भिख्खू स्वतः तर कधी मोठ्या मुलांकडून हे अत्याचार करवून घेत असत."

प्रकार कसा उघडकीला आला?

आसामचे असलेले वरुण यांची साधनानंद नावाच्या एका बौद्ध भिख्खूची आधीपासून ओळख होती. साधाननंद यांच्या सांगण्यावरून वरुण यांनी बऱ्याच मुलांना इथं धार्मिक शिक्षणासाठी पाठवलं होतं.

पण 24 ऑगस्टच्या सायंकाळी साधनानंद यांनी स्वतःच वरुण यांना फोनकरून मुलांबद्दल जे घडत आहे त्याची माहिती दिली. त्यानंतर वरुण आणि इतर मुलांचे पालक 29 ऑगस्टला बोधगयाला आले.

साधनानंद मुंबईत राहतात. बीबीसीशी फोनवर बोलताना ते म्हणाले, "मी 22 ऑगस्टला ध्यान केंद्रात गेलो होतो. मला मुलांच्या शरीरावर व्रण दिसले. याबद्दल मी मुलांच्या पालकांना माहिती दिली. ध्यान केंद्र चालवणाऱ्या ट्रस्टशी माझा कोणाताही संबंध नाही. माझी आणि त्यांची ओळख बौद्धगया इथं झाली होती."

हे ध्यान केंद्र शहराच्या मुख्य भागापासून दूर आहे. इथे पोहोचण्यासाठी पक्क रस्ताही नाही. दोन वर्षांपासून हे केंद्र सुरू असून इथं 32 मुलं होती. सध्या इथं 17 मुलं असून त्यातील 14 मुलं त्रिपुरातील, 2 अरुणाचल प्रदेशातील आणि एक मुलगा आसामचा आहे.

बाल लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात आलेले बौद्ध भिक्कू

फोटो स्रोत, SEETU TEWARI/BBC

फोटो कॅप्शन, बाल लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात आलेले बौद्ध भिक्कू

त्रिपुरातील उबा चिनो सध्या या सेंटरचं काम सांभाळतात. ते म्हणतात, "पोलिसांनी माझ्याकडे लैंगिक शोषणाबद्दल चौकशी केली आहे. पण मी इथं दीड महिन्यांपूर्वी आलो आहे. मला यातील काहीच माहिती नाही. हा प्रकरण उलगडलं की मुलांना घेऊन त्रिपुराला जाईन."

मुलांना बाहेर काढलं

मुलांवरील लैंगिक अत्याचारांची माहिती मिळूनही आईवडील शांत राहिले. त्यांनी बौद्ध भिख्खू आणि शोषणच्या प्रकरणातील प्रमुख संशयित ध्यान शाळेचे प्रमुख सुजय चौधरी यांनी शाळा सोडून जावं अशी मागणी केली. त्यानंतर ध्यान शाळेच्या प्रमुखांनी मुलांना नग्न अवस्थेत ध्यान केंद्रातून बाहेर काढलं.

ध्यान केंद्राच्या जवळ राहणाऱ्या नर्मदा देवी आणि अमित कुमार म्हणाले, "सकाळी 8च्या वेळी सर्व मुलांना बाहेर काढण्यात आलं. पण बौद्ध भिख्खू मुलांना कुणाशी बोलू देत नव्हते. म्हणून आम्ही या मुलांकडे चौकशी केली नाही."

पण जेव्हा केंद्रातून काढण्यात आलेली मुलं आणि त्यांचे आईवडील मुख्य मंदिरात पोहोचले तेव्हा स्थानिक लोकांनी याबद्दल विचारणा केली. त्यातून स्थानिक माध्यमांना या प्रकाराची माहिती कळाली.

हताश झालेले वरुण म्हणाले, "आम्ही पाटणातील राजेंद्रनगरवरून गाडी पकडून आसामला जाणार होतो. इथं आम्ही तक्रार कशी करणार? इथं आम्ही कुणालाच ओळखत नाही, पण परत चाललो होतो. आता जेव्हा पोलीस सांगतील तेव्हाच परत जाऊ."

बाल अधिकार संरक्षण समितीचं दुर्लक्ष

या प्रकरणात IPC कलम 377, 341, 323, 504, 506 आणि पॉक्सो कायद्यातील विविध कलमांनुसार संशयित सुजय उर्फ संघप्रिय यांना अटक झाली आहे.

जिल्हाधिकारी अभिषेक सिंह

फोटो स्रोत, SEETU TEWARI/BBC

फोटो कॅप्शन, जिल्हाधिकारी अभिषेक सिंह यांनी इथल्या शाळांची तपासणी करण्यासाठी समितीची स्थापना केली आहे.

सहायक पोलीस आयुक्त कुमार चौधरी म्हणाले, "सर्व मुलांची वैद्यकीय चाचणी झाली आहे. या प्रकणात 164 जणांची साक्ष घेतली जाणार आहे. संशयिताला 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. पाटणा इथली फॉरेन्सिक टीम तपास करत असून बौद्ध भिक्कूंच्या खोलीतून बेडशीट, मफलर आणि पट्टा जप्त करण्यात आला आहे. त्यांच्या मोबाईलमधून कोणताही अक्षेपार्ह फोटो किंवा व्हीडिओ मिळालेला नाही."

जिल्हाधिकारी अभिषेक सिंह सांगतात, "तपास लवकरात लवकर पूर्ण करून आरोपपत्र दाखल केलं जाईल. या मुलांना बाल अधिकार संरक्षण समितीकडे सोपवलं जाईल."

तर बाल अधिकार संरक्षण समितीच्या अध्यक्ष गीता मंडल यांना याविषयी विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी "मी इथं नवीन आहे, मला यातील काहीही माहीत नाही," असं उडवाउडवीचं उत्तर दिलं.

भिक्कू संघावर प्रश्न

या प्रकरणात आंतरराष्ट्रीय बौद्ध भिख्खू संघही संशयाच्या भोवऱ्यात आहे. 2015मध्ये थायलंड इथल्या एका बौद्ध भिख्खूने मुलांचं लैंगिक शोषण केल्याचा प्रकार पुढं आला होता.

बोधगयामध्ये 160 मठ आहेत. यातील फक्त 70 मठ संघाशी संलग्न आहे. गेली 20 वर्ष सुरू असलेल्या संघांची नोंदणी फक्त 3 महिन्यांपूर्वी झाली आहे.

संघाचे सचिव प्रज्ञादीप सांगतात बोधगयामध्ये किमान 400 मुलं धार्मिक शिक्षण घेतात. पण या आकड्यांवर विश्वास ठेवणं कठीण आहे.

आंतरराष्ट्रीय बौद्ध भिख्खू संघाचे सचिव प्रज्ञादीप

फोटो स्रोत, SEETU TEWARI/BBC

फोटो कॅप्शन, आंतरराष्ट्रीय बौद्ध भिख्खू संघाचे सचिव प्रज्ञादीप यांच्या मते बोधगयात 400 मुलं शिक्षण घेतात.

प्रज्ञादीप यांच्या मते या ध्यान केंद्रात चकमा समाजातील मुलं शिक्षण घेत होती. हा समाज आर्थिकदृष्ट्या मागास आहे. दोन वर्षांपासून हे केंद्र एका भाड्याच्या इमारतीमध्ये सुरू होतं. याचे प्रमुख बांगलादेशातून पळून आले आहेत. प्रज्ञादीप म्हणाले, "ध्यान केंद्र संघाशी संलग्न नाही. त्यांनी स्वतंत्र ट्रस्ट स्थापून त्यांचं काम सुरू केलं होतं. त्यांची जबाबदारी सरकारवर आहे."

तर जिल्हाधिकारी अभिषेक सिंह सांगतात, "प्रशासनाच्या वतीने एक समितीची स्थापन करण्यात आली आहे. ही समिती अशा ट्रस्टच्या कामांची चौकशी करणार आहे."

बोधगयातील मठ आणि स्थानिक नागरिक यांच्यात वाद नवीन नाही. बोधगया हॉटेल असोसिएशनने बौद्ध मंदिर धर्माच्या नावावर व्यवसाय करतात, अशी तक्रार वारंवार केली आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार रवी यांनी जुलै 2016ला दिलेल्या अहवालात या तक्रारीत तथ्य असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)