चर्चमध्ये धर्मगुरूंकडून होणारे बाल लैंगिक अत्याचार रोखण्यात अपयश : पोप यांची कबुली

पोप

फोटो स्रोत, Getty Images

चर्चच्या माध्यमातून होणाऱ्या बाल लैंगिक शोषणाच्या घटना आणि त्याचं केलं जाणारं समर्थन याचा पोप फ्रान्सिस यांनी निषेध केला आहे.

जगातल्या 120 कोटी रोमन कॅथलिक नागरिकांना उद्देशून लिहिलेल्या 'द पीपल ऑफ गॉड' या पत्रात पोप यांनी आपली भूमिका मांडली आहे.

धर्मसंस्थेकडून होणारा हा अश्लाघ्य प्रकार लवकरात लवकर थांबावा असं आवाहन पोप यांनी केलं आहे. चर्चमधील ही 'मरणाची संस्कृती' थांबवण्याचे आवाहन करतानच त्यांनी या पत्रात क्षमेची मागणी केली आहे. अशा प्रकारांना समोरे जाताना येत असल्याच्या अपयशांचाही त्यांनी उल्लेख केला आहे.

गेल्या आठवड्यात अमेरिकेतल्या पेनसिल्व्हेनियामध्ये गेली सात दशकं सुरू असलेल्या लैंगिक शोषणासंदर्भात ज्युरींनी सविस्तर अहवाल सादर केला. त्या पार्श्वभूमीवर पोप बोलत होते.

या अहवालात काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. अमेरिकेतल्या या राज्यात हजार अल्पवयीन मुलांवर 300 धर्मगुरूंकडून लैंगिक छळ झाल्याचं उघड झालं आहे.

आणखी हजार लहान मुलांना लैंगिक अत्याचाराला सामोरं जावं लागल्याचं स्पष्ट झालं आहे. चर्चकडून याप्रकरणातील दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला. यापैकी काही खटले खूप जुने असल्याने तक्रारही दाखल करण्यात आलेली नाही.

हा अहवाल जाहीर झाल्यानंतर व्हॅटिकनने पोप हे पीडितांच्या बाजूने आणि या 'भक्षकां'च्या विरोधात असल्याचं म्हटलं होतं.

पोप यांचं काय म्हणणं?

बाल लैंगिक शोषणासंदर्भात जगभरातल्या कॅथलिक नागरिकांना पोप यांनी संबोधित करण्याची ही पहिलीच वेळ आहे, असं व्हॅटिकनने सांगितलं.

2000 शब्दांच्या या पत्रात पोप यांनी अमेरिकेत सुरू असलेल्या धर्मगुरूंकडून होणाऱ्या लैंगिक शोषणासंदर्भात भूमिका घेतली. हा सगळा प्रकार रोखण्यात चर्चला अपयश आलं आहे अशी कबुलीही त्यांनी दिली.

चर्च, पोप, ख्रिश्चन धर्म

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतिकात्मक छायाचित्र

लैंगिक शोषणाला सामोरे गेलेल्या पीडितांचं दु:ख हृदय पिळवटून टाकणारं असल्याचं त्यांनी सांगितलं. वर्षानुवर्षे त्यांच्या दु:खांकडे दुर्लक्ष करण्यात आलं. हे शोषण निमूटपणे सहन करा असं सांगण्यात आलं. या प्रकरणाचं गांभीर्य मोठं आहे. अशा घटना सातत्याने घडत राहणं दुर्देवी आहे. आपण वेळीच दोषींवर कारवाई करायला हवी होती. लहानग्या मुलांवर अत्याचार होत असताना आपण त्यांची काळजी घेतली नाही. एकप्रकारे शोषणा करणाऱ्यांना आपण सहकार्यच केलं अशा शब्दांत पोप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पोप यांनी बायबलमधल्या उताऱ्याचा दाखला दिला. समाजातल्या कोणाचंही शोषण म्हणजे सगळ्यांना त्रास होण्यासारखं आहे. समाजातले असे प्रकार रोखण्यासाठी सर्वसमावेशक उपाययोजना अंमलात आणायला हवी. आपण सगळ्यांनी एकत्र येत चांगल्या भविष्यासाठी काम करायला हवं.

धर्मरक्षणाची जबाबदारी दिलेल्या व्यक्तींकडूनच अशा स्वरूपाच्या नृशंस गोष्टी होत असतील तर ते रोखायला हवं. चिमुरड्यांची काळजी घेणं आपलीच जबाबदारी आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

अशा आहेत नव्या तक्रारी?

पोप आज Church's World Meeting of Familiesमध्ये व्याख्यान देण्यासाठी आयर्लंडला जाणार आहेत. आयर्लंडस रोमन कॅथॉलिक चर्चचे आर्चबिशप इमॉन मार्टिन म्हणाले की पोप फ्रान्सिस डब्लिन इथं त्यांच्या भेटीत धर्मगुरूंच्या शोषणाच्या घटनांतील पीडितांची भेट घेण्याची शक्यता आहे.

बाल लैंगिक अत्याचारांचे स्कँडल जगभरातील विविध चर्चमध्ये घडलेल्या आहेत.

गेल्याच महिन्यात वॉशिंग्टन डीसीचे माजी आर्चबिशप थिओडर मॅककॅरिक यांच्यावर अत्याचारांचे आरोप झाल्यानंतर त्यांना पायउतार व्हावं लागलं होतं.

50 वर्षांपूर्वी एक किशोरवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे विश्वासार्ह आरोप आहेत असं अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. त्यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

मे महिन्यात आर्चबिशप फिलिप विल्सन यांच्यावरही 1970च्या दशकात बाललैंगिक अत्याचार घडवल्याचे गुन्हे नोंद आहेत. अशा प्रकारचे गुन्हे नोंद होणारे ते सर्वांत वयस्कर धर्मगुरू ठरले आहेत.

काय आहेत प्रतिक्रिया?

'Survivors & Victims of Institutional Abuse' या संघटनेच्या मार्गारेट मॅकगकीन म्हणाल्या पोप यांचा हा प्रतिसाद फार उशिरा आला असून तो अपुरा आहे कारण यामुळे काहीच बदलणार नाही. ही संस्था नॉर्दन आयर्लंडमध्ये काम करते.

तर धर्मगुरूंच्या वतीने होणाऱ्या अत्याचांरावर लक्ष ठेवणारी वेबसाईट BishopAccountability.orgचे सहसंचालक अॅनी ब्रेट डोयल म्हणाल्या, आता पोप फ्रान्सिस यांच्याकडून शब्दांपेक्षा कृतीची आवश्यकता आहे.

त्या म्हणाल्या, "ज्यांनी शोषणाला सुरुवात केली अशा बिशप्स आणि इतर धर्मप्रमुखांसाठी अधिक शिस्तीची व्यवस्था असणे आवश्यक आहे."

मॅरी कॉलिन्स या किशोरवयीन असताना धर्मगुरूच्या शोषणाला बळी पडल्या होत्या. त्या आता अशा अत्याचारांविरोधात मोहीम चालवतात. मॅरी यांनी पोप यांनी केलेल्या निषेधाचं स्वागत केलं आहे पण या संदर्भातील जबाबदारीवर अधिक काम करण्याची गरज आहे, असं म्हटलं आहे.

लैंगिक अत्याचार

फोटो स्रोत, ENERGYY/GETTY IMAGES

पोप फ्रान्सिस यांनी स्थापन केलेल्या व्हॅटिकन चाईल्ड प्रोटेक्शन कमिटीतील कॉलिन्स यांनी राजीनामा दिला होता. चर्चचा बदलांना विरोध आहे, म्हणून राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

बोस्टनमध्ये उघडकीस आलेल्या अत्याचारांच्या प्रकारानंतर Voice of the Faithful या गटाची स्थापना करण्यात आली होती. या गटाने पोप यांच्या पत्राचे स्वागत केलं आहे. ज्यांनी या शोषणांवर पडदा टाकला आणि ज्यांनी हे शोषण केलं अशांवर जबाबदारी निश्चित होणं आवश्यक आहे, असं या गटाने म्हटलं आहे.

सर्वसाधारणपणे पोप यांनी व्यक्त केलेला पश्चाताप आणि दुःख यांचं कौतुक होतं. आम्ही आता शब्दांना कार्याची जोड मिळावी, अशी अपेक्षा अस्वस्थपणे करत आहोत, असं या गटाने म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)