You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भीमा कोरेगाव हिंसाचार : 'संभाजी भिडे - मिलिंद एकबोटे यांच्यावर 15 दिवसांत आरोपपत्र दाखल होणार'
- Author, अभिजीत कांबळे
- Role, बीबीसी मराठी
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी देशभरात डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांना अटक झाल्यानंतर अनेकांनी प्रश्न विचारला - याच प्रकरणी आरोपी असलेल्या संभाजी भिडेंचं पुढे काय झालं?
"शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे आणि समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यावर येत्या 15 ते 20 दिवसांत आरोपपत्र दाखल होणार आहे," असं पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं आहे.
"भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरू आहे. पुढील 15 ते 20 दिवसांत त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले जाईल," असं संदीप पाटील म्हणाले.
1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगावजवळ घडलेल्या हिंसाचारानंतर पिंपरी-चिंचवडच्या काळेवाडी परिसरात राहणाऱ्या अनीता सावळे यांनी 2 जानेवारीला पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
सावळे यांच्या तक्रारीनुसार संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एकबोटेंना अटक, भिडेंना नाही
गुन्हा दाखल झाल्यानंतर साडेतीन महिन्यांनी म्हणजे 14 मार्च रोजी मिलिंद एकबोटेंना अटक झाली. त्यानंतर एप्रिलमध्ये ते जामिनावर सुटले.
संभाजी भिडे यांना या प्रकरणात अटक झालेली नाही. भिडे यांना अजूनपर्यंत अटक का झाली नाही, यावर बोलताना पाटील यांनी सांगितलं की, "मी पुणे ग्रामीणचा पोलीस अधीक्षक म्हणून काही दिवसांपूर्वीच रुजू झालो आहे. कागदपत्रं पाहिल्यानंतरच अटकेबाबत बोलू शकेन."
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भिडेंविरोधात पुरावा नसल्याचं मार्च 2018ला सांगितलं होतं.
त्यांनी विधानसभेत भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी निवेदन करताना सांगितलं होतं की, "या प्रकरणात ज्या महिलेनं तक्रार दिली होती, त्या महिलेनं फिर्याद देताना असं म्हटलं होतं की मी स्वत: भीमा कोरेगावमध्ये संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना त्या ठिकाणी दंगल घडवताना पाहिलं. त्यानुसार आपण तक्रार दाखल करून घेतली.
ज्या महिलेनं फिर्याद दिली त्या महिलेचा जबाब आपण दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवला. त्यामध्ये त्या महिलेनं सांगितलं की मी संभाजी भिडे गुरुजींना ओळखत नाही मी त्यांना पाहिलं नाही. मात्र तिथे चर्चा अशी होती की त्यांनी हे घडवलं आहे. आतापर्यंतच्या तपासात हिंसाचार घडवण्यात भिडे गुरुजींचा सहभाग असल्याचा कोणताही ठोस पुरावा पोलिसांना मिळालेला नाही."
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर बीबीसी मराठीनं तक्रारदार अनीता सावळे यांच्याशी संपर्क साधला.
"मुख्यमंत्र्यांनी FIRमधल्या जबाबाचा चुकीचा अर्थ लावला. मुख्यमंत्र्यांनी कदाचित ती FIR व्यवस्थित वाचलेली नाही. त्यांनी अर्थाचा अनर्थ केला आहे. दुसरी गोष्ट अशी की आत्तापर्यंत संभाजी भिडे यांना अटक व्हायला हवी होती. त्यांच्यावर जर संशयित आरोपी म्हणून गुन्हा दाखल झाला असेल, तर त्यांना अटक करून कोर्टात हजर करायला पाहिजे होतं," असं त्या म्हणाल्या.
भिडेंवर कारवाई व्हावी यासाठी आपण मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केल्याचं अनीता सावळे यांनी सांगितलं. जून महिन्यात ही याचिका दाखल झाली असून त्यावर अजून सुनावणी सुरू झाली नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
'गुरुजींचा सहभाग नाही'
संभाजी भिडेंवरील आरोपाबाबत बोलताना शिवप्रतिष्ठानचे प्रवक्ते नितीन चौगुले म्हणातात की, "आम्ही पहिल्या दिवसापासून हेच सत्य सांगतोय की भिडे गुरुजींचा येथे कुठेही सहभाग नाही. तपास यंत्रणा गेले आठ महिने यावर काम करत आहे. कुठंही भिडे गुरुजींच्या विरोधात कुठलाही पुरावा मिळालेला नाही.
तपास यंत्रणा जर काम करत नसेल तर जे आरोप करत आहेत, त्यांनी तपास यंत्रणांकडे पुरावे द्यावेत, न्यायालायकडे पुरावे द्यावेत. तेही जमत नसेल तर मीडियासमोर पुरावे ठेवून मग भिडे गुरुजींवर आरोप करावेत आणि मग त्यांच्या अटकेची मागणी करावी. जे काही माओवादी यामध्ये सापडत आहेत, त्यांचे कुठे ना कुठे पुरावे तपास यंत्रणांना मिळाल्याशिवाय या कारवाया झालेल्या नाहीयेत."
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी या प्रकरणाविषयी बोलताना म्हटलं की, "अटक करायची की नाही हे पोलिसांवर अवलंबून असतं. त्यांनी इतरांना अटक केली मात्र यांची अटक करायचीच नाही. ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे की हिंदुत्ववाद्यांना कोणत्याही परिस्थितीत पकडायचं नाही.
लोकांचा दबाव आल्यामुळे गुन्हा तर दाखल झाला. पण त्यांच्याविरोधात पुरावा गोळा करायला पाहिजे, सादर करायला पाहिजे यामध्ये पुरेशी ढिलाई ठेवण्यात येईल आणि त्यांना नंतर सोडून देण्यात येईल. हिंदुत्ववाद्यांनी कुठल्याही प्रकारचे गुन्हे केले तरी त्यांना या राजवटीमध्ये शिक्षा होणार नाही, हे त्यांना अभयदान आहे कारण त्यांना सरकारचं संरक्षण आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संभाजी भिडेंशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी रायगड किल्ल्यावरून केलेल्या भाषणात म्हटलं होतं की "मी भिडे गुरुजींना अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांचा साधेपणा, कठोर परिश्रम, ध्येयाप्रती समर्पण आणि जीवनातील अनुशासन सर्वांसाठी आदर्श आहेत. ते महापुरुष आणि तपस्वी आहेत. मी त्यांच्या आदेशाचं पालन करतो. मी त्यांच्याप्रती नतमस्तक होतो."
भीमा कोरेगाव प्रकरण घडल्यानंतर आणि भिडेंविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी फेब्रुवारी 2018मध्ये एक व्हीडिओ ट्वीट केला, ज्यात ते स्वतः आणि भिडे एकाच व्यासपीठावर दिसत आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)