पंतप्रधान मोदींनी का ट्वीट केला संभाजी भिडेंसोबतचा फोटो?

    • Author, नीलेश धोत्रे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

शिवजयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक व्हीडिओ ट्वीट करून शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आहे. पण या व्हीडिओच्या शेवटी मोदी संभाजी भिडे यांच्याबरोबर दिसत आहेत.

1 जानेवारी 2018 रोजी पुण्याजवळच्या भीमा कोरेगावमध्ये भडकलेल्या हिंसेमागे संभाजी भिडे यांचा हात असल्याचा आरोप आहे. त्यानंतर पिंपरीमध्ये या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि सार्वजनिक नुकसान, सशस्त्र हल्ला, बेकायदेशीर जमाव या कलमांखाली त्यांच्याविरोधात गुन्हे नोंदवले आहेत.

असं असतानाही थेट पंतप्रधानांनी त्यांच्याबरोबरचा व्हीडिओ शेअर केल्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत आणि यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली जात आहे.

'PMOने स्पष्टीकरण द्यावं!'

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधानांनी हा व्हीडिओ ट्वीट करणं म्हणजे तपास यंत्रणांना प्रभावित करण्याचा प्रकार आहे.

बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी सांगितलं, "भीमा कोरेगाव प्रकरणी संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे. अशात पंतप्रधानांनी असा व्हीडिओ ट्वीट करणं म्हणजे तपास यंत्रणांना प्रभावित करण्याचा प्रकार आहे. पंतप्रधानानी हा व्हीडिओ मागे घ्यावा. तसंच यावर पंतप्रधान कार्यालयानं स्पष्टीकरण द्यावं."

"हा व्हीडिओ तपासावर प्रभाव टाकण्यासाठी ट्वीट केला नाही, असं पत्रक काढून पंतप्रधान कार्यालयानं स्पष्ट करावं, नाही तर तपास यंत्रणा याचा एकच अर्थ काढेल की भिडेंवर कारवाई करू नये," असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधानांचा हा व्हीडिओ दुर्भाग्यपूर्ण असल्याचंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी म्हणाले की, "आम्ही असल्या गोष्टींना काही महत्त्व देत नाही."

तसंच संभाजी भिडेंविषयी बोलताना, "भिडे गुरुजी काही गुन्हेगार नाहीत, तसंच काही लोक या विषयाला धरून जातीय राजकारण करत आहेत", असं त्यांनी म्हटलं आहे.

"शिवजयंतीच्या निमित्तानं असं दुष्ट राजकारण करणं शोभणारं नाही. शिवाजी महाराजांचे सर्व वंशज हे भिडे गुरुजींच्या समर्थनासाठी पुढे आले आहेत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे," अशी प्रतिक्रिया त्यांनी भिडेंवर असलेल्या आरोपांबाबत विचारलेल्या प्रश्नावर दिली आहे.

तसंच पंतप्रधान कार्यालयानं पत्रक काढून खुलासा करण्याची पृथ्वीराज चव्हाण यांची मागणीसुद्धा त्यांनी फेटाळून लावली आहे.

'तो' फोटो कधीचा?

2014च्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रायगडाला भेट दिली होती. 5 जानेवारी 2014 रोजी रायगडावर झालेल्या कार्यक्रमाचे हे फोटो आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वेबसाईटवर देखील त्याची माहिती आहे.

या प्रकरणी संभाजी भिडे यांच्या श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेशी बीबीसीने संपर्क केला. पण त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

मोदींच्या ट्विटरवरून आधीही वाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवर फॉलो करत असलेल्या लोकांमुळे या आधीही वाद झाले आहेत. सोशल मीडियावर द्वेष पसरवणारी भाषा वापरणाऱ्या लोकांना मोदी फॉलो करत असल्याच्या बातम्या याआधीही प्रसिद्ध झाल्या आहेत. 'द वायर'नं त्याबाबत एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी कुणाला फॉलो केल्याने त्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळत नाही, असं भाजपच्या IT सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी त्यावेळी दिली होती. तसंच "मोदींनी एकदा कुणाला एकदा फॉलो केलं की ते अनफॉलो करत नाहीत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर त्यांचा विश्वास आहे," असंही मालवीय यांनी पत्रक प्रसिद्ध करून स्पष्ट केलं होतं.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)