पाहा व्हीडिओ : सुनील देवधर - ईशान्य भारतात भाजपचा चेहरा ठरलेला मराठी माणूस

    • Author, सलमान रावी
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

सुनील देवधर हा मराठी माणूस ईशान्य भारतातला भाजपचा चेहरा आहे. या व्यक्तीनं कधी निवडणुका लढवल्या नाहीत. प्रसारमाध्यमांमध्येही ते फारसे झळकले नाहीत. पण त्रिपुरामध्ये 25 वर्षांपासून वर्चस्व असलेल्या कम्युनिस्ट पक्षाला आव्हान देण्याचं श्रेय भाजप सुनील देवधरांना देतं.

2013च्या निवडणुकांमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं 49 जागांवर विजय मिळवला होता. कम्युनिस्ट पार्टीला एका जागेवर विजय मिळाला होता. दहा जागांसकट काँग्रेस मुख्य विरोधी पक्षाच्या भूमिकेत होता.

पण यंदा भाजपनं कम्युनिस्ट पक्षांसमोर कठोर आव्हान उभं केलं आहे. त्यात सुनील देवधरांचा मोठा वाटा आहे. त्यांनी अगदी बूथ लेवलपासून पक्षबांधणीचं काम हाती घेतलं आहे.

त्रिपुराच्या आधी मेघालयातसुद्धा देवधरांनी पक्षाचा विस्तार केला.

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून लढले होते. त्यावेळी त्यांच्या निवडणुकीची आणि व्यवस्थापनाची जबाबदारी देवधरांच्या खांद्यांवर होती.

ईशान्य भारतात काम करताना देवधर सुनील देवधर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. तेव्हा त्यांनी स्थानिक भाषा शिकल्या. जेव्हा त्यांनी मेघालयच्या खासी आणि गारो समाजाच्या लोकांशी त्यांच्या भाषेत संवाद साधला तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याच प्रमाणे ते अस्खलित बंगालीत बोलतात.

त्रिपुरामध्ये डावे पक्ष, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसला खिंडार पाडण्याचं कामसुद्धा त्यांनी केल्याचं म्हटलं जातं. नेमकं विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर या पक्षांचे अनेक नेते आणि आमदार भाजपात सामील झाले.

बीबीसीशी बोलताना सुनील देवधर म्हणतात, "इथे काँग्रेसची प्रतिमा तशी नाहीये जशी इतर राज्यांमध्ये आहे. इथे अनेक वर्षांपासून काँग्रेस डाव्या पक्षांसमोर आव्हान उभं करत आहे. इथे काँग्रेसचे चांगले नेते होऊन गेले आहेत."

ईशान्य भारताचा दौरा करताना अनेक चांगल्या काँग्रेस नेत्यांची भेट झाल्याचं ते सांगतात. तेव्हापासूनच त्यांनी अशा नेत्यांना आपल्या पक्षात सामील करून घ्यायला सुरुवात केली. मग त्यांनी मार्क्सवादी पक्षाकडे लक्ष केंद्रित केलं. अशा प्रकारे पक्षाचा विस्तार झाला आणि पक्ष मजबूत होण्यास सुरुवात झाली.

पण केवळ देवधरच नव्हे, गेल्या काही काळात भाजपने ईशान्य भारताचं किचकट राजकारण समजत विविध चेहऱ्यांद्वारे आपली पकड मजबूत केली आहे. त्यापैकी एक महत्त्वाचा चेहरा म्हणजे हेमंत बिस्वा सरमा.

हेमंत बिस्वा सरमा

आसाममधील सगळ्यांत शक्तिशाली काँग्रेस नेते आणि आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे निकटवर्तीय म्हणून हेमंत बिस्वा यांची ओळख होती. गोगोई त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतेही निर्णय नाही घ्यायचे. ते तीनदा काँग्रेसचे आमदार राहिले होते आणि त्यांनी मंत्रीपदसुद्धा भूषविलं होतं.

मग 2015 साली ते भाजपमध्ये आले आणि ईशान्य भारतात त्यांनी पक्षविस्तार करण्यास सुरुवात केली. त्याचं पहिलं पाऊल म्हणजे भाजपने आसाममध्ये मिळवलेलं बहुमत.

आसामच्या जोरहाटमध्ये जन्मलेल्या हेमंत यांना काँग्रेसच्या चांगल्या वाईट गोष्टींची माहिती होती. याचाच फायदा घेत त्यांना पक्षात सामील करत भाजपनं काँग्रेसला खिंडार पाडण्यास सुरुवात केली.

हेमंत काँग्रेसच्या काही नेत्यांवर नाराज होते आणि त्याचा फायदा उचलत भाजपने त्यांना ईशान्य भारतात हुकुमी एक्का बनवण्यास सुरुवात केली.

हेमंत बिस्वा सरमा आसाम सरकारमध्ये अर्थमंत्री आहेत. शिवाय त्यांना पक्षानं 'ईशान्य भारत लोकतांत्रिक आघाडी'चे संयोजकपद दिलं आहे.

संपूर्ण ईशान्य भारतात काँगेसला दुर्बळ करण्याचं श्रेय हेमंत यांना जातं.

याशिवाय, आणखी एक महत्त्वाचा चेहरा म्हणजे भाजपचे महासचिव राम माधव.

राम माधव

सुरुवातीपासूनच राम माधव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. नंतर अनेक वर्षं ते संघाचे प्रवक्ते होते. मग अमित शाह यांच्या टीममध्ये महासचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

त्यांना ईशान्य भारतासकट जम्मू काश्मीरचा प्रभार दिला. भारत-चीन संबंध आणि फुटीरतावादी संघटनांबरोबर तोडगा काढण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर देण्यात आली.

बीबीसीशी बोलताना ते सांगतात की आसाम वगळता ईशान्य भारतात भाजपला कोणत्याच प्रकारचा जनाधार नव्हता. आसामहूनच ईशान्य भारतातील कारभार चालायचा.

राम माधव यांचा जन्म आंध्र प्रदेशमध्ये झाला. त्यांनी अनेक पुस्तकांचं लेखन केलं आहे. तसंच ईशान्य भारतात संघटनात्मक जबाबदारी सांभाळली.

नागा गटांशी तडजोड करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचं सांगितलं जातं.

आपल्या पक्षविस्तारावर चर्चा करताना राम माधव म्हणाले की, "गेल्या पाच वर्षांत भाजपला या भागातले राजकीय डावपेच समजू लागले होते."

काँग्रेसला तोडून, त्यांच्या नेत्यांना आपल्या पक्षात सामील करून ते काँग्रेसमुक्त भारताचं लक्ष्य पूर्ण करू शकतील का? या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, "राजकारणात नवे डावपेच खेळावे लागतात. नवीन नाती जुळतात आणि जुनी तुटूसु्द्धा शकतात."

तुम्ही हे बघीतलं का?

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)