You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोशल: 'कॉन्व्हेंटमध्ये येशूची प्रार्थना चालते, मग सत्यनारायण पूजेला विरोध का?'
शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालयांमध्ये सत्यनारायणाची पूजा करणं योग्य आहे का? असा प्रश्न बीबीसी मराठीनं होऊ द्या चर्चामध्ये वाचकांना विचारला होता.
कुणाला अपाय होत नसेल तर पूजा होण्यात काय हरकत असावी असा प्रश्न काही जणांनी उपस्थित केला आहे. तर सार्वजनिक ठिकाणं ही धार्मिक कार्यक्रमापासून दूर असावीत, असं मत काही वाचकांनी व्यक्त केलं आहे.
पाहूया वाचकांनी व्यक्त केलेली काही निवडक आणि संपादित मतं-
फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी चैतन्य देशपांडे म्हणतात, "धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्म सोडून चालणे नव्हे. धर्म निरपेक्षता असणे म्हणजे सर्व धर्मांचा आदर. कोणतीही पूजा अथवा कोणत्याही धर्मातील धार्मिक तत्त्वाचा आदर करणे म्हणजे धर्मनिरपेक्षता. ही पूजा धर्मनिरपेक्ष आहे. जर महाविद्यालय प्रशासनाने फक्त हिंदूंनाच पूजेत सहभागी होण्यास परवानगी दिली असती तर तो धर्मनिरपेक्षतेवर कलंक होता. महाविद्यालय कोणत्याही धर्माच्या-जातीच्या मुलाला तीर्थप्रसादापासून रोखत नाही. ही धर्मनिरपेक्षताच आहे!"
"राहिला प्रश्न शासकीय कार्यालयात धर्म आणावा का नाही....शासन गुढीपाडव्याला, पारशी नववर्षाला, ईदला सुट्टी का देतं? शासनाच्या उर्दू पाठ्यक्रमात "अल्ला" ,"परवरदिगार" इ. शब्द असलेल्या शेर शायरी का आहेत? संस्कृत पाठ्यपुस्तकात भगवद्गीतेतले श्लोक का? कारण प्रत्येक धर्माच्या परंपरांचे पालन झाले तरच भारतीय संस्कृती टिकेल. हीच योग्य धर्मनिरपेक्षता आहे," देशपांडे सांगतात.
"जर कोणाला अपाय होणार नसेल किंवा कोणाची बदनामी अथवा निंदानालस्ती केली जात नसेल तर अशा कार्यक्रमावर का हरकत असावी," असं सत्या गांवकर यांनी म्हटलं आहे. आजही आपण सरकारी बिल्डिंग बांधताना भूमीपूजन करतोच ना याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं आहे.
बाबू डिसूजा यांना वाटतं बॅंकामध्ये होणाऱ्या पूजा या खातेदार आणि बॅंक कर्मचारी यांना एकत्र आणतात. ते म्हणतात, "बॅंकामध्ये सत्यनारायण पूजेचं आयोजन कर्मचारी आपल्या वर्गणीतून करतात. खातेदारांना आमंत्रित केले जाते. कर्मचारी वर्ग खातेदारांविषयी आत्मीयता दाखवतो म्हणून बॅंक व्यवस्थापनाकडून त्यांना परवानगी मिळते."
भारतीय राज्यघटनेनं नागरिकांना उपासनेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे तेव्हा पूजा ही वैयक्तिक बाब असावी, असं मत सत्यजित बच्छाव यांनी मांडलं आहे.
"संविधानाने प्रत्येक नागरिकाला उपासनेचं स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे. मात्र या धर्म आणि उपासनेचे स्वातंत्र्य हे प्रत्येकाने व्यक्तिगतरित्या आणि आपापल्या मित्र, नातलग, समाज यांच्याबरोबर साजरे केले पाहिजे. शिक्षणक्षेत्रात किंवा नोकरीच्या क्षेत्रात धार्मिक व उपासना करणे टाळले पाहिजे."
शाळा अथवा काँलेजमध्ये चर्च असणे योग्य आहे का? कॉन्व्हेंट शाळेत राष्ट्रगीत न म्हणता येशूंची प्रार्थना म्हणणे योग्य आहे का?, असा प्रश्न प्रसाद पाटणकर यांनी विचारला आहे.
कॉन्व्हेंटमध्ये येशू ख्रिस्तांची प्रार्थना केली जाते ते सर्वांना चालतं मग कॉलेजमध्ये पूजा केल्यावरच सेक्युलॅरिझम का आडवा येतो असा प्रश्न अजिंक्य पल्लेवार यांनी केला आहे.
भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे म्हणून शाळा कॉलेजात धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात येऊ नयेत असं अमोल सपकाळे म्हणतात.
"भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, शाळा कॉलेजामध्ये सरकारी कार्यालयामध्ये सत्यनारायण करू नये तसेच इतर कोणतेही धार्मिक कार्यक्रम साजरे करू नये. भारतीय संविधानानं प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याचा धर्म पाळण्याची मुभा दिली आहे तेव्हा सर्वांनी आपल्या धर्माचं पालन आपल्या घरी करावं," असं सपकाळे म्हणतात.
शिक्षण संस्थांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्यात यावा, अशी आशा सम्राट अशोक बहुद्देशीय संस्थेनं बाळगली आहे.
एकीकडे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि दुसरीकडे धार्मिक परंपरा अशा कात्रीत समाज अडकल्यामुळं द्विधा अवस्था झाली आहे. त्यावर अंकुश झावरे म्हणतात, "अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करणं हे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून चूक वाटतं पण रीती-रिवाज, परंपरेनुसार योग्य वाटतं. कोणतीही गोष्ट एकदम बदलू शकत नाही. त्यासाठी वेळ जातोच तेव्हा आपण सबुरीनं घ्यायला हवं."
हा मुद्दा खूप संवेदनशील आहे. परंपरा सहजासहजी नाहीशा होत नाहीत, असं मत विजया पाटील यांनी व्यक्त केली आहे. त्या म्हणतात, "खरं तर धर्मनिरपेक्ष देशात कोणत्याही धर्माची प्रार्थना पूजा सरकारी कार्यालयात होऊ नये. पण मुद्दा फारच संवेदनशील आहे. परंपरा सहजासहजी नाहीशा करता येत नाहीत."
बीबीसी मराठीनं विचारलेल्या प्रश्नावर वाचकांनी या विषयाचे वेगवेगळे पैलू मांडत मत प्रदर्शन केलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)