You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोशल : 'पुरुषांनी स्त्रियांची पात्रं साकारावी पण उगाच अश्लीलता नको'
लोकांना हसवण्याच्या नावाखाली हल्ली पुरुषांना साडी नेसवण्याचा अतिरेक होतो आहे का, असा प्रश्न आज आम्ही होऊ द्या चर्चामध्ये वाचकांना विचारला होता.
अनेकांनी पुरुष कलाकारांनी महिलांचा वेष धारण करून भूमिका साकारण्यावर प्रश्न उपस्थित केले, तर एका मर्यादेपर्यंत हे ठीक असल्याचं काही वाचक म्हणतात.
पाहूया वाचकांनी व्यक्त केलेली काही निवडक आणि संपादित मतं -
मानसी लोणकर म्हणतात, "विनोदाचा अतिरेक जरा जास्तच दिसून येतो. पुरुषांना स्त्रिया बनवून विनोद करणं चुकीचं आहे. याचा अर्थ स्त्रिया या विनोदाचा भाग म्हणून आहेत का? या शिवाय त्यात अश्लीलता ही कुटून कुटून अधिक प्रमाणात दाखवली जाते."
"पूर्वीच्या काळी स्त्रियांना सिनेमा, मंच या ठिकाणी काम करण्यास परवानगी नसल्याने पुरुष हे स्त्रीप्रधान भूमिका पार पाडायचे आणि त्याही अत्यंत चोखपणे, त्याला गालबोट ही लागू न देता. परंतु आता सगळे वेगळेच दिसते. स्त्रियांचं विनोदीकरण आणि अश्लीलता फक्त दिसून येते," असं त्या पुढे लिहितात.
"जोपर्यंत निखळ मनोरंजन होत आहे, कुठेही अश्लीलता किंवा पांचटपणा नसतो तोपर्यंत काही हरकत नाही," असं सचिन चव्हाण म्हणतात.
"एका मर्यादेपर्यंत जर हे होत असेल तर ते सहन करण्यासारखं आहे. पण अलीकडच्या काळात हास्य निर्माण होण्याऐवजी राग येतो," असं मीनाक्षी साबळे यांनी म्हटलं आहे.
कौस्तुभ जंगम म्हणतात, "101% खरं आहे. आता हे सारं अत्यंत अभिरुचिहीन पातळीवर आलेलं आहे. आणि या सगळ्याचा आता उबगच नाही तर घृणा येऊ लागली आहे. खरं तर मराठीत अत्यंत दर्जेदार विनोद निर्मिती होत आलेली आहे. आणि चांगल्या विनोद निर्मिती साठी पुरुषाने स्त्रीवेश धारण करण्याची अजिबात गरज नाही."
संजय दळवी यांच्यामते, "कथानकाची गरज म्हणून पुरुषांनी स्त्रीपात्र करणं वेगळं आणि ओढून-ताणून पुरुषांनी साड्या नेसून स्त्रीपात्र करणे वेगळं. ते किळसवाणं वाटतं...!!!"
स्वाती भंगाळे यांच्यामते "पारंपरिक नऊवारीची चेष्टा केली जात असल्यासारखं वाटतं. इतके भयानक दिसतात बघवत नाही. पण याला विजय चव्हाण हे अपवाद होते."
अपराजिता शुक्ला यांच्यामते हा अतिरेक नाही. "ते लोक आपली कला दाखवतात आणि साडी घातल्यानं त्यांचा पुरुषपणा कमी होत नाही किंवा बाईपणा कमी होत नाही. मी सॅल्यूट करते अशा पुरुषांना जे साडी घालून फक्त दुसऱ्यांना हसवण्याचा विचार करतात. भाऊ कदम, सागर करांडे आणि कुशल बद्रिके यांचा अभिमान वाटतो."
रश्मी जोशी म्हणतात, "हो, खूपच अतिरेक होतो. इतकं घाणेरडं वाटतं. खरंतर त्यामुळेच 'मी चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम पाहाणंच सोडून दिलं. किळस येते. एखाद्या वेळेस ठीक आहे पण प्रत्येकवेळेस तेच ते तेच ते नको वाटते."
अमेय बेडदारे म्हणतात, "बिभत्स विनोद जास्त प्रमाणात वाढलाय. निर्भेळ असा विनोद राहिलाच नाही. दर्जाहीन लेखणी प्रेक्षकांना हसवू शकत नाही, मग कमरेखालच्या विनोदाचा आश्रय घेतला जातो."
धनंजय खाडे यांच्यामते "मागणी आसलेल्या गोष्टी बाजारात येतात. प्रेक्षकांना आवडतात. शेवटी TRP हे सत्य आहे."
किशोर पवार म्हणतात, "विनोदाची पातळी खालावली असून पुरुष पात्रांकडून अतिशय बिभत्स विनोद केले जातात. विनोदाच्या नावावर आंबटशौकीन लोकांची मेजवानी केली जाते."
गणेश डांगे सांगतात, "कलावंताची कला बघितली जावी. साडी नाही. कलावंत ती कला किती प्राण ओतून करतोय हे बघितलं जावं. कुणाला हसवणं हे पुण्यकर्म आहे. फालतूपणा नाही."
शेखर कावे यांच्यानुसार "हल्ली लोक यालाच मनोरंजन समजू लागलेत. साडीमध्ये बाई जितकी सुंदर दिसते, तितके सुंदर कोणीच नाही दिसणार."
राहुल नवळे यांनी हा अतिरेकपणा नसल्याचं सांगत हा मनोरंजनाचाच एक भाग असल्याचं म्हटलं.
प्रविणा लोणारे यांनी हा अतिरेक नसल्याचं म्हटलं असून "अशी पात्र पाहायला खूप छान वाटतात," असं म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)