शांतता कोर्ट चालू आहे: या 5 कारणांमुळे विजय तेंडुलकरांचा प्रभाव आजही कायम

    • Author, प्राजक्ता धुळप आणि तुषार कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"60-70च्या काळाची पार्श्वभूमी नसती तर तेंडुलकर नावाची दंतकथा जन्मालाच नसती आली," असं ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर म्हणतात.

19 मे 2008 रोजी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला होता. तेंडुलकर हे लेखक, पत्रकार, पटकथा लेखक होते.

कन्यादान, घाशीराम कोतवाल, गिधाडे, शांतता कोर्ट चालू आहे, बेबी, माणूस नावाचे बेट ही त्यांची नाटके विशेष गाजली. त्यांनी लहान मुलांसाठी देखील नाटकं लिहिली. तसेच ते एक उत्तम पटकथाकार देखील होते. त्यांना मंथन या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

लेखनातील कारकिर्दीबरोबरच ते त्यांनी घेतलेल्या भूमिकांमुळे देखील चर्चेत राहिले. जितके पुरस्कार आणि मानसन्मान त्यांना मिळाले आहेत तितकीच त्यांच्यावर टीकादेखील झाली.

विरंगुळा म्हणून नाटक पाहायला जाणाऱ्या वर्गाला त्यांनी नाटकं केवळ मनोरंजनासाठीच नसतात हे दाखवून दिलं. सामान्य प्रेक्षकांच्या समजुतीला त्यांनी एक प्रकारे धक्का दिला. तेंडुलकरांचं हे 'धक्कातंत्र' नेमकं काय आहे?

1. तत्कालीन परिस्थितीवर थेट भाष्य

तेंडुलकरांचा लेखन क्षेत्रातला उदय हा साठ-सत्तरच्या दशकातला आहे. त्या काळात असंतोषाचं वातावरण होतं. याच वातावरणाची निरीक्षणं त्यांनी आपल्या लिखाणातून मांडली.

"60-70च्या काळाची पार्श्वभूमी नसती तर कदाचित तेंडुलकर नावाची दंतकथा जन्मालाच नसती आली. ते दशक होतं अनादराचं आणि प्रस्थापितांविरोधात बंड पुकारण्याचं. त्या काळातली पत्रकारिता आणि लिखाण हे दोन्ही बदलू लागलं होतं. हाच बदल तेंडुलकरांच्या लिखाणातून जाणवतो," असं कुमार केतकर सांगतात.

तेंडुलकर हे पत्रकार आणि लेखक दोन्ही होते. "त्यांच्यासाठी पत्रकारिता आणि लिखाण हे व्यवसाय नव्हते, तर या दोन्ही गोष्टी त्यांच्या जीवनाचं ध्येय होत्या," असंही केतकर नोंदवतात.

"त्यांची नाटकं त्या काळातील परिस्थितीवर भाष्य करणारी आहेत. शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक 60च्या मध्यात येणं आणि गिधाडे, घाशीराम कोतवाल आणि सखाराम बाइंडर हे 70च्या दशकात येणं हा काही योगायोग नाही. या सर्व नाटकांमधून नात्यांचा आणि व्यवस्थेचा ऱ्हास कसा होत आहे हे आपल्याला पाहायला मिळतं," असं केतकर सांगतात.

2. विषयांची निवड

"तेंडुलकरांआधी मराठी रंगभूमीवर येणारी नाटकं ही वेगळ्या स्वरूपाची असायची. नाटक या माध्यमातून काही संस्कार घडावेत असा बऱ्याच नाटककारांचा आग्रह असायचा. पण तेंडुलकरांनी या गोष्टीला एक धक्का दिला. समाजातल्या कुरूप गोष्टी देखील त्यांनी दाखवण्यास सुरुवात केली," असं ज्येष्ठ पत्रकार आणि नाटककार जयंत पवार सांगतात.

"स्वातंत्र्योत्तर काळातली पिढी आशावादी, स्वप्नाळू आणि नीतीमूल्यांची चाड बाळगणारी आहे अशी समजूत होती. पण तेंडुलकरांनी त्यांचा हा चेहरा खरवडून काढला," असं निरीक्षण पवार यांनी मांडलं.

त्यांनी निवडलेल्या वेगळ्या विषयांमुळे आणि मांडणीमुळे त्यांच्यावर अनेक आरोप झाले. तेंडुलकर हे नेहमी वादग्रस्त विषयाला हात घालत असा आरोप त्यांच्यावर केला जात असे. त्याबद्दल जयंत पवार सांगतात, "त्यांनी वादग्रस्त विषय मुद्दामहून हाताळले नाहीत. त्यांना जे लिहायचं आहे ते वादग्रस्त म्हणून देखील त्यांनी टाळलं नाही. त्यांची जीवनाबद्दलची दृष्टी व्यापक होती. ज्यांची जीवनाची दृष्टी त्यांच्याइतकी व्यापक नाही त्यांना ते वादग्रस्त वाटू शकतात."

तेंडुलकरांच्या नाटकातील पात्रं खूप गडद आहेत असा एक आरोप त्यांचे टीकाकार त्यांच्यावर करतात. पण या मताशी नाट्यसृष्टीतील अनेक जण सहमत नाहीत.

"तेंडुलकर यांनी गडद पात्रं उभी केली नाहीत, तर गडद विषयांची निवड केली," असं नाट्यदिग्दर्शक संदेश कुलकर्णी सांगतात.

कुलकर्णी यांनी तेंडुलकरांच्या काही नाटकांचं दिग्दर्शन केलं आहे. "संघर्षाशिवाय नाट्य निर्माण होत नसतं. तेंडुलकर नेहमी मोठा संघर्षबिंदू पकडायचे आणि त्यावर नाटक लिहायचे. ते प्रेक्षकांना धक्का द्यावा किंवा त्यांना चांगलं वाटावं असा विचार करून नाटक लिहित नव्हते, तर जीवनातलं वास्तव दाखवण्यासाठी नाटक लिहित असत," असं संदेश कुलकर्णी म्हणतात.

3. वास्तववादी पात्रं

"आपल्या नाटकातून त्यांनी जगण्याचे पेच काय आहेत याचं दर्शन घडवलं, पात्रांच्या आयुष्यात असलेलं नैतिक अनैतिकतेचा संघर्ष त्यांनी दाखवून दिला," असं जयंत पवार सांगतात.

"खऱ्या आयुष्यात एखादी व्यक्ती एखाद्या परिस्थितीमध्ये कशी वागू शकते याचा विचार करूनच त्यांनी आपली पात्रं रंगवली. त्या पात्रांच्या मूळ प्रेरणा या रोजच्या जगण्यातील असत," असं पवार म्हणाले.

4. पल्लेदार नाही तर थेट मनाला भिडणारे संवाद

"त्यांची पात्रं सहज होती. त्यांची भाषा कृत्रिम नव्हती. नाटकातले संवाद पल्लेदार नसत. त्यामुळे ती पात्रं आणि भाषा प्रेक्षकांना जवळची वाटत असे, असं असलं तरी पात्रांच्या भाषेत वजन असायचं," असं जयंत पवार सांगतात.

"तेंडुलकरांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं. त्यामुळं त्यांची जडणघडण एका विशिष्ट साच्यातून झाली नव्हती. त्यांनी सगळे साचे नाकारले होते. त्यांचा दृष्टिकोन खुला होता. त्यातूनच त्यांची समज आणि भाषा विकसित झाली होती," असं विश्लेषण पवार यांनी केलं आहे.

"जसं भाषेचं व्याकरण असतं तसंच नाटकाचं देखील व्याकरण असतं, नाटकाची देखील भाषा असते. तेंडुलकरांची त्यावर हुकूमत होती. हे माध्यम दृश्य आणि श्राव्य आहे त्याचा विचार करून ते लिहीत असत. नाटकांच्या निमित्ताने त्यांचा सहवास मला मिळाला, त्यावेळी हे बारकावे लक्षात आले," असं संदेश कुलकर्णी सांगतात.

5. आधी परिणामाचा विचार मग मांडणी

"तेंडुलकरांशी बोलल्यानंतर आणि पुन्हा नव्याने त्यांच्या नाटकांकडे पाहिल्यावर लक्षात येतं की ते परिणाम काय साधायचा हे आधी ठरवत आणि मग मांडणी करत," असं लेखिका मनस्विनी लता रवींद्र यांचं मत आहे.

"तेंडुलकरांच्या नाटकामुळे हिंसा पहिल्यांदा प्रेक्षकांच्या समोर आली. मराठी प्रेक्षकांसाठी नाटक ही महत्त्वाची गोष्ट होती. कथा, कादंबरी आणि पुस्तक हा वैयक्तिक अनुभव असतो. पण नाटक हा सामाजिक सोहळा असतो. मध्यमवर्गीय कुटुंबातील माणसं नटून-सजून हा सोहळा अनुभवण्यासाठी जात. या परंपरेला तेंडुलकरांनी शह दिला. जेव्हा प्रेक्षक नाटकाला येत तेव्हा तेंडुलकर त्यांना आरसा दाखवत असत,"असं मनस्विनी म्हणतात.

"असं काही आमच्यात घडत नाही किंवा आमचं आलबेल आहे असं असं मानणाऱ्या दुटप्पी, दांभिक वर्गासमोर तेंडुलकर आरसा आणून ठेवतात. त्यांच्यातलीच हिंसा दाखवून प्रेक्षकाला उघडानागडा करतात. याचा परिणाम म्हणून प्रेक्षक चिडतो," असं मनस्विनी सांगतात.

विजय तेंडुलकर नावाच्या प्रतिभेनं मराठी समाजमनावर राज्य केलं. एखाद्या गोष्टीबद्दल तेंडुलकर काय म्हणतात, तेंडुलकर त्याच्याकडे कसं पाहतात हे जाणून घेण्याची इच्छा त्या काळात होती. म्हणूनच त्यांचा प्रभाव जाणून घेण्याचा हा प्रयत्न!

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)