ग्राउंड रिपोर्ट : बिहारमध्ये महिलेला मारहाण करून विवस्त्र धिंड काढण्यामागचं सत्य

    • Author, नीरज प्रियदर्शी
    • Role, भोजपूरच्या बिहिया बाजारहून

बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातल्या बिहिया शहरात एका महिलेला मारहाण करून तिची विवस्त्र धिंड काढण्यात आली होती. त्यानंतर त्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर पसरवण्यात आले. 19 वर्षांच्या एका तरुणाची हत्या केल्याचा आरोप या महिलेवर करण्यात आला आहे.

सोमवारी बिहारच्या भोजपूरमधील बिहिया बाजारात जमावानं एका महिलेला विवस्त्र करून तिची धिंड काढली होती. मंगळवारी या भागातील लोक कॅमेऱ्यासमोर येऊन बोलण्यास टाळाटाळ करत होते.

"पोलीस ज्या दिशेनं जात आहेत, त्याच दिशेनं तुम्हीही चालत जा," एवढंच काय स्थानिक लोक म्हणत होते.

या आठवड्याचा सोमवार श्रावणातला शेवटचा सोमवार होता. यामुळे बिहिया बाजारातल्या पंचमुखी शिव मंदिरात हरिकीर्तन आणि भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

बांबू वापरून रस्त्याच्या कडेला जागा तयार करण्यात आली होती आणि मधोमध लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

शिव मंदिराशेजारील गल्लीतून मी पीडित महिलेच्या घरी पोहोचलो. गल्लीतून एकदम समोर चालत गेल्यास बिहिया रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म आणि रेल्वेचा मार्ग दिसून येतो.

या मार्गावरच सोमवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. यानंतर लोकांमध्ये निर्माण झालेल्या रागानं 'चांद महल'ला आग लावण्यात आली.

चांद महलच्या इमारतीवर एक फाटक्या अवस्थेत असलेलं एक पोस्टर दिसत होतं, त्यावर लिहिलं होतं, "हलचल थिएटर ग्रूप, लग्नसमारंभांसाठी उपलब्ध."

जमावानं घर जाळलं

मुख्य दाराच्या बाहेर उभ्या असलेल्या महिला भोजपुरीमध्ये सांगत होत्या, "तिचा चांद महल दररोज आनंदात असायचा. आता मात्र तो जळून इतका काळवंडलाय की ओळखायलाही येत नाही."

'चांद महल' त्याच महिलेचं घर आहे जिला विवस्त्र करून बाजारात फिरवण्यात आलं.

संपूर्ण घर आगीत भस्मसात झालं होतं. जमावानं घरात घुसून तोडफोड केली होती.

स्वयंपाकघरात एका बाजूला गॅस सिलेंडर ठेवलेलं होतं ज्याची आग अद्यापही धगधगत होती. तिथलं सर्व सामान राख झालं होतं. पण चुलीजवळ ठेवलेल्या कढईतला भात तसाच होता. कदाचित त्याला झाकून ठेवण्यात आलं असावं.

खिडक्यांच्या काचा तुटल्या होत्या. घरातील बहुतेक सामान बाहेर रस्त्यावर फेकलेलं होतं. लोक खिडकी आणि तुटलेल्या दारातून आत डोकावून पाहात होते.

सोमवारी ही घटना घडली असली तरी आगीचा धूर अद्यापही इमारतीच्या भागांत दिसून येत होता. भिंती गरम होत्या. भिंतीवर हात ठेवला तेव्हा असं वाटलं की काही क्षणांपूर्वीच आग विझवण्यात आली असावी.

दुपारचे दीड वाजले होते. भोजपूरचे पोलीस अधीक्षक अवकाश कुमार आणि जिल्हाधिकारी संजीव कुमार आपापल्या ताफ्यांसह घटनेची चौकशी करायला आले होते.

पोलिसांनी दारावरील गर्दी हटवत पीडितेचा मुलगा रोहित कुमारसह घरात प्रवेश केला.

त्यांनी संपूर्ण घराची तपासणी केली. बाहेर पोहोचले तेव्हा शेजारील घराच्या दरवाजावर थाप दिली. पण तो दरवाजा उघडला नाही. पोलिसांनी विचारल्यावर रोहितनं सांगितलं की, "सर्व जण भीतीमुळे घर सोडून गेले आहेत."

काही वेळानंतर महिलेची ज्या ठिकाणी धिंड काढण्यात आली होती त्या जागी पोलीस पोहोचले.

मृत व्यक्ती शेजारच्या शहापूरमधील

पोलीस गेल्यानंर लोक पुन्हा 'चांद महल'च्या जवळ आले आणि एकमेकांमध्ये चर्चा करायला लागले.

"आम्ही रेल्वे मार्गाच्या त्या बाजूला होतो. मालगाडी जात होती तेवढ्यात एका वृद्ध व्यक्तीनं जमावाला तिथं मृतदेह ठेवताना पाहिलं. मालगाडी निघून गेल्यानंतर ते लोक मृतदेहाला फेकून पळून गेले," या लोकांमधील एकानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं.

"ते लोक याच घरात आले होते, असं मी ऐकलं होतं. सुरुवातीला काही लोकांनी विचारणा केली होती. ती एकदा बाहेर निघाली होती आणि लोकांसोबत तिची चर्चाही झाली होती."

मृत व्यक्तीचं नाव विमलेश कुमार शाह असून ते बिहियापासून 8 किमी अंतरावर असलेल्या शाहपूर इथला रहिवासी आहेत, असं त्यांच्या खिशात मिळालेल्या ओळखपत्रावरून समोर आलं आहे.

"काही वेळासाठी सर्वंकाही शांत होतं. पोलीसही आले होते. पण अर्ध्या तासानंतर अचानकच 300 ते 400 लोकांचा जमाव आला. त्यांनी घराची तोडफोड केली. तिची साडी ओढली, पेटीकोट ओढला आणि तिला बाहेर काढलं. हे चुकीचं होतं पण जमाव कुठे कुणाच्या नियंत्रणात असतो?" ती व्यक्ती पुढे सांगत होती.

महिलेला लक्ष्य करण्यात आलं

"स्थानिक लोकांमध्ये या महिलेविषयी पूर्वीपासूनच राग होता. हलचल थिएटर आणि ऑर्केस्ट्रा ग्रूपच्या आड ही महिला देहव्यापार करत आहे, असा लोकांचा आरोप आहे," असं स्थानिक पत्रकार मुकेश कुमार सांगतात.

"महिलेच्या घरासमोर मृतदेह सापडला आणि या आगीत तेल ओतलं गेलं. ती लोकांच्या रागाची शिकार झाली. पोलिसांनीही निष्काळजीपणा केला. पोलिसांनी तत्परता दाखवली असती तर महिला वाचली असती. स्थानिक पोलीस स्टेशनपासून फक्त 300 मीटर अंतरावर ही घटना घडली," कुमार पुढे सांगतात.

या प्रकरणात सोमवारचा दिवस आणि त्यासंबंधीच्या घटना महत्त्वपूर्ण ठरतात.

"श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी मी ब्रह्मपूरला पाणी अर्पण करायला गेलो होतो. काल सकाळीच परतलो होतो आणि थकल्यामुळे झोपलो होतो. अचानक काही लोकांच्या जमावानं घराबाहेर गोंधळ घालायला सुरुवात केली तेव्हा कळालं की तिथं मृतहेद सापडला आहे. माझी आई तिची बाजू मांडत राहिली, पण कुणीही तिचं ऐकलं नाही. तिला घराबाहेर काढून सर्वंजण तिच्यावर तुटून पडले," रोहित सांगतात.

"सर्वांदेखत माझ्या आईला बेअब्रू करण्यात आलं. तिनं कुणाचं काय बिघडवलं होतं? सर्वांसोबत तिचं चांगलं नातं होतं. पोलीस आणि दुकानदारांसोबत ती मिळून मिसळून राहत होती. मंदिरातही जात होती. सोमवारीही मंदिरात गेली होती. तिथून परत आल्यानंतर हे सर्व घडलं."

"हत्येच्या आरोपाची कठोर चौकशी करा. हवं तर सीबायलाही बोलवा. माझी आई दोषी असेल तर तिला फासावर लटकवा. पण काहीही चौकशी न करता फक्त संशयाच्या आधारे लोकांनी माझ्या आईवर अत्याचार केले," रोहित पुढे सांगतात.

महिलेला उपचाराची गरज

पीडित महिलेला पोलिसांनी दिवसभर स्टेशनमध्येच ठेवलं होतं. तिथं डॉक्टर, नर्स आणि समुपदेशकांनी मिळून महिलेची तपासणी केली.

"त्यांची तब्येत आता ठीक आहे. त्या पूर्वीसारख्या वारंवार बेशुद्ध होत नाहीत. त्यांच्या पाठीवर गंभीर इजा झाली आहे. त्यांची काळजी घ्यायला डॉक्टरांची टीम इथं आहे. आमचे समुपदेशक त्यांना या घटनेच्या मानसिक परिणामातून बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. सध्या त्यांना उपचाराची गरज आहे," आरा सदर हॉस्पिटलचे प्रभारी सतीश कुमार सांगत होते.

रेल्वे मार्गाजवळ तरुणाचा जो मृतहेद मिळाला होता, त्याची हत्या झाल्याचं पोलिस चौकशीत स्पष्ट झालं आहे.

पोस्टमॉर्टम रिपोर्टचा उल्लेख करत पोलीस अधीक्षक अवकाश कुमार यांनी सांगितलं, "मृत व्यक्तीच्या गळ्यावर जखमेची खूण मिळाली आहे, असं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आलं आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी ही घटना हत्या आहे, असंच वाटतं."

गळा दाबून तरुणाची हत्या करण्यात आली असावी, असा अंदाज आहे. पोलीस सर्व स्तरावर प्रकरणाची चौकशी करत आहेत.

"निष्काळजीपणा केल्याच्या आरोपाखाली पोलीस अधिकारी कुंवर गुप्ता यांच्यासहित 6 जणांना निलंबित करण्यात आलं आहे. पीडित महिलेला पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. व्हीडिओ फुटेजच्या आधारे, महिलेला विवस्त्र करण्याच्या आरोपाखाली 15 लोकांना अटक करण्यात आली आहे. पोलीस त्यांची चौकशी करत आहे. बाकीच्यांना पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत," भोजपूरचे जिल्हाधिकारी संजीव कुमार सांगतात.

या घटनेत एससीएसटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

या घटनेत अटक करण्यात आलेल्या लोकांचा कुठल्या राजकीय पक्षाशी संबंध आहे का, हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. पण अजून तसं काही समोर आलं नाही, असं जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितलं.

शाहपूरहून आला जमाव

या सर्वांत मला चकित करणारी बाब बिहिया पोलीस स्थानकात कैद असलेल्या सत्यनारायण प्रसाद उर्फ रौशन राज यांनी सांगितली. प्रसाद यांना सब्जी टोला इथल्या त्यांच्या राहत्या घरातून बुधवारी सकाळी पोलिसांनी पकडलं होतं.

"पोलिसांनी मला चुकीच्या पद्धतीनं अटक केली आहे, कारण गोंधळ घालणारी माणसं बिहिया बाजारची नव्हती तर शाहपूरची होती," असं प्रसाद यांचं म्हणणं होतं.

"बिहियाच्या लोकांचा या घटनेत काहीही सहभाग नाही. असं असतानाही पोलीस आमच्या लोकांना अटक करत आहे. गोंधळ घालणारा जमाव बाहेरून आला होता, या गोष्टीचा आमच्याकडे पुरावा आहे. त्या पुराव्यांआधारे पोलीस ही गोष्ट सिद्ध करू शकत नाही का? व्हीडियोत फक्त बिहियाचेच लोक दिसत नाहीत ना?" प्रसाद पुढे सांगतात.

मृतकाच्या बहिणीचा धक्क्यानं मृत्यू

शाहपूरच्या दामोदरनगर इथल्या विमलेश यांच्या कुटुंबीयांची प्रकृती बिघडली आहे. आपल्या भावाच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर त्यांच्या बहिणाला हृदयविकाराचा झटका आला आणि मंगळवारी सकाळी त्यांचं निधन झालं.

हत्येबाबतची एफआयर विमलेश यांच्या काकांनी दाखल केली आहे, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

कौशल्य विकास केंद्राशी संबंधित कामानिमित्त विमलेश रविवारी घरातून निघाला होता. पुढच्या दिवशी त्यांचा मृतदेह बिहियातल्या चांद महलजवळील रेल्वे मार्गाजवळ आढळून आला.

या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत 3 वेगवेगळ्या एफआयर दाखल झाल्या आहेत. विमलेश यांच्या काकांच्या म्हणण्यानुसार अज्ञात लोकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे, असं पोलीस अधीक्षक अवकाश कुमार सांगतात.

महिलेला विवस्त्र करून तिची धिंड काढण्याच्या आरोपाखाली 15 जण आणि इतर 7 अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

याशिवाय जाळपोळ आणि तोडफोडीप्रकरणी 7 जण आणि इतर 300 अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)