You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कुलदीप नय्यर : मोदी सरकारबद्दल त्यांचं काय होतं मत?
वरिष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचं बुधवारी रात्री दिल्लीत निधन झालं. ते 95व्या वर्षांचे होते.
आता पाकिस्तानमध्ये असलेल्या सियालकोटमध्ये 1923ला त्यांचा जन्म झाला होता. आणीबाणीदरम्यान अटक झालेले कुलदीप पहिले पत्रकार होते.
नय्यर यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. "कुलदीप नय्यर यांचं आणीबाणीदरम्यानचं काम आणि उज्ज्वल भारतासाठी त्यांची असलेली बांधिलकी नेहमीच लक्षात ठेवली जाईल," असं मोदी यांनी ट्वीट केलं आहे.
केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि इतर अनेक नेत्यांनी नय्यर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
कुलदीप नय्यर गेल्या काही दिवसांपासून आजारी होते आणि दिल्लीत त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी रात्री साडे बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
गुरुवारी दुपारी लोधी रोडवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
नय्यर यांनी उर्दू प्रेस रिपोर्टर म्हणून पत्रकारितेतल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. पुढे ते 'द स्टेट्समन' या वर्तमानपत्राचे संपादकही झाले.
1990मध्ये त्यांना ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त या पदावर नेमण्यात आलं होतं. तर, 1997मध्ये त्यांची नेमणूक राज्यसभेवर करण्यात आली.
कुलदीप नय्यर यांनी अनेक पुस्तकं लिहिली. यामध्ये 'बिटवीन द लाइन्स', 'इंडिया आफ्टर नेहरू', 'इंडिया-पाकिस्तान रिलेशनशिप' ही पुस्तकं गाजली.
पुरस्कार वापसी
गेल्या वर्षी अकाल तख्तच्या 440व्या वर्षपूर्तीनिमित्त त्यांना एका पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
कुलदीप नय्यर यांनी जनरल सिंह भिंद्रनवाले यांची तुलना गुरमीत राम रहीम यांच्याशी केली होती. यावर दमदमी टकसाळकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
त्यानंतर शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीनं त्यांना दिलेला पुरस्कार परत घेण्याचा निर्णय घेतला होता.
आणीबाणीतले कुलदीप
आणीबाणीदरम्यान कुलदीप इंडियन एक्सप्रेसमध्ये काम करत होते. 24 जून 1975ला ज्या दिवशी आणीबाणी लागू करण्यात आली त्यादिवशी ते कार्यालयात होते.
"सगळीकडे भीतीचं वातावरण होतं. कोणीच काही बोलायला तयार होत नव्हतं. कारण तसं केल्यास अटक होईल, असं प्रत्येकाला वाटत होतं," असं एकदा बीबीसीशी बोलताना नय्यर यांनी सांगितलं होतं.
"उद्योजक आणि व्यावसायिकांच्या कार्यालयांवर छापे टाकून त्यांना अटक केली जात होती. मीडिया गप्प होता. इतकंच काय तर प्रेस कौन्सिलही काही बोलत नव्हतं. पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचं रक्षण करणारी ही सर्वोच्च संस्था होती."
मोदी सरकार...
कुलदीप नय्यर एक निडर पत्रकार होते. सरकारवर टीका करताना ते कुणाला भीत नसत. "भाजपच्या सरकारमध्ये कोणत्याही कॅबिनेट मंत्र्याला काही महत्त्व उरलेलं नाही," असं मत त्यांनी बीबीसीसाठी लिहिलेल्या एका लेखात मांडलं होतं.
"काही दशकांपूर्वी इंदिरा गांधी यांचं देशावर एकहाती राज्य होतं तर आज नरेंद्र मोदींचं आहे," असं त्यांनी माध्यमांच्या स्वातंत्र्याबद्दल म्हटलं होतं.
"बहुतेक वर्तमानपत्रं आणि टीव्ही चॅनेल्सनी नरेंद्र मोदींच्या कारभाराशी जुळवून घेतलं आहे, जसं इंदिरा गांधीच्या कार्यकाळात झालं होतं. असं असलं तरी नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात त्यांच्या कॅबिनेटमधील कोणत्याही मंत्र्याचं काही महत्त्व उरलेलं नाही. कॅबिनेटची सहमती फक्त कागदावर उरलेली आहे."
"सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत आणीबाणीसारख्या परिस्थितीला विरोध करायला हवा, जसा यापूर्वी त्यांनी केला आहे," अशी अपेक्षाही नय्यर यांनी त्या लेखात व्यक्त केली होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)