Republic Day: मुंबई आगीतून अनेकांना वाचवणाऱ्या झेन सदावर्तेला यंदाचा शौर्य पुरस्कार

फोटो स्रोत, BBC/Prashant Nanaware
- Author, जान्हवी मुळे आणि प्रशांत ननावरे
- Role, बीबीसी मराठी
साधारण दीड वर्षांपूर्वी मुंबईच्या एका आगीतून 17 जणांचे प्राण वाचवणारी 12 वर्षीय झेन सदावर्ते, तसंच गावच्या नदीत बुडणाऱ्या मायलेकींचे प्राण वाचवणाऱ्या औरंगाबादच्या आकाश खिल्लारे (वय 15) या दोघांना महाराष्ट्रातून यंदाचा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
22 ऑगस्ट 2018च्या सकाळी मुंबईच्या हिंदमाता परिसरातल्या क्रिस्टल टॉवर इमारतीला आग लागली होती. त्यात चार जणांचा मृत्यू झाला तर अठरा जण जखमी झाले होते. पण 16व्या मजल्यावर राहणाऱ्या जयश्री पाटील यांचं कुटुंब अगदी थोडक्यात बचावलं.
"इतका धूर मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होते. आता आपण मरणार हा एकच विचार डोक्यात येत होता. पण माझ्या दहा वर्षांच्या मुलीनं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आम्ही जिवंत आहोत," अॅड. जयश्री पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिलेली ही पहिली प्रतिक्रिया.
सुट्टी असल्यामुळे जयश्री यांच्या घरातले सर्वजण उशिरापर्यंत झोपले होते. सकाळी आठ-साडेआठच्या सुमारास त्या वॉशरूममध्ये गेल्या, तेव्हा त्यांना खिडकीतून काळा धूर येताना दिसला. त्यांनी त्यांचे पती अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना आवाज दिला.
"मी म्हटलं, अहो बघा कुठे आग वगैरे किंवा काही शार्ट सर्किट झालंय का? त्यांनी बेडरूमची मोठी खिडकी उघडली तर बाहेरून सर्व काळा धूर मोठ्या दाबानं घरात शिरला. धुराचं प्रमाण इतकं जास्त होतं की आम्ही एकमेकांना दिसेनासे झालो."

फोटो स्रोत, BBC/Prashant Nanaware
शेजारीच बेडवर झोपलेली त्यांची दहा वर्षांची मुलगी झेनही त्यांना दिसत नव्हती. तिला जागं केल्यावर ओरडत, धडपडत तिघांनी मग किचनच्या दिशेने धाव घेतली.
ओल्या कपड्याची क्लुप्ती
"घरातील वीजेचा मुख्य स्वीच आधी बंद केला. हवा यावी, म्हणून मी किचनची खिडकी उघडली तर तिथून धुरासोबतच गरम वाफ आत आली आणि माझ्या चेहऱ्याला त्याची झळ बसली. त्यानंतर आम्ही सर्वांनीच प्रचंड आरडाओरड करायला सुरूवात केली."
एव्हाना समोरच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडला. त्या बाजूला धूर नसल्यानं पाटील कुटुंबियांनी तिकडे धाव घेतली. पण तोपपर्यंत शेजारच्या घरातही धूर भरायला सुरूवात झाली होती.
"आम्हाला कुणालाच श्वास घ्यायला जमत नव्हतं. तेव्हा माझ्या मुलीनं आम्हाला सांगितलं की, 'मी शाळेत पाहिलेलं आहे कपडा ओला करून आपल्या तोंडावर धरायचा.' मग आम्ही सर्वांनी पाण्यानं चादरी ओल्या केल्या आणि त्या तोंडावर धरल्या. तसं केल्यावर आम्हाला बरं वाटलं आणि आम्हाला श्वास घेता येऊ लागला."

फोटो स्रोत, Mumbai Fire Brigade
एव्हाना अग्निशमन दलाचे जवान तिथवर पोहोचले होते. त्यांनी शिडीच्या ट्रॉलीत बसवून सर्वांची सुटका केली.
"आम्हाला खाली आणतानाच बाराव्या मजल्यावर खूप मोठी आग भडकत होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी आम्ही सोबत असतानाच त्या आगीवर पाण्याचा सहाय्यानं नियंत्रण मिळवलं."
मुंबईचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 8 वाजून 32 मिनिटांनी आग लागल्याचं समजल्यावर अग्निशमन दलाचे 12 बंब घटनास्थळी दाखल झाले.
"इमारतीच्या 12व्या मजल्यावरील इलेक्ट्रिक वायरिंग duct आणि 16व्या मजल्यावरील लिफ्ट लॉबीदरम्यान आग पसरली होती. विजेचा पुरवठा खंडित करून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले. 12व्या मजल्यावरील सर्व फ्लॅट्सना आगीनं वेढलं होते," असं रहांगदाळे यांनी सांगितलं.
चारही मृतदेह बाराव्या मजल्यावर लिफ्ट आणि लॉबीमध्ये सापडले असल्याची माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली.
प्रचंड उष्णता, आग आणि धुरामुळे वरच्या मजल्यांवरचे लोक वरच अडकले होते. त्यापैकी तीसएक जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आलं.
जखमींपैकी चौघांचा हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचं केईएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितलं. या आगीत अग्निशमन दलाच्या दोन जवानांसह अठरा जणांना दुखापत झाली असून, सर्वांची स्थिती आता स्थिर आहे.
कारणांचा तपास सुरू
आगीचं नेमकं कारण काय होतं, याचा तपास सुरू आहे. प्राथमिक पाहणीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, तसंच इमारतीच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

फोटो स्रोत, BBC/Prashant Nanaware
प्रभात रहांगदाळे यांनी याबाबत सांगितलं,"आगीच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे. इमारतीची अग्निशमन व्यवस्था काम करत नव्हती. विद्युतपुरवठा करणाऱ्या केबल्स जिथून जातात तो भाग (electric duct) व्यवस्थित बंद केला नव्हता.
वरच्या मजल्यांवरही दाट धूर पसरत गेला. तिथं अडकलेल्यांना वाचवणं हे सर्वांत मोठं आव्हान होतं. इमारतीचा वीज आणि पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून ही इमारत आता राहण्यासाठी धोकादायक जाहीर करण्यात आली आहे. या प्रकरणी दुर्लक्ष करणाऱ्यांविरोधात पोलिसांना तक्रार दाखल करण्यास सांगण्यात आलं आहे."
मुंबईत उंच इमारतीत आग लागण्याची गेल्या अडीच महिन्यांतली ही दुसरी घटना आहे. याआधी 14 जून रोजी प्रभादेवीच्या 34 मजली ब्योमाँद टॉवरच्या पेंटहाऊसमध्ये आग लागली होती. पण सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
(ही बातमी प्रथम 22 ऑगस्ट 2018 रोजी, म्हणजे ज्या दिवशी ही आगीची घटना घडली, त्या दिवशी प्रकाशित करण्यात आली होती.)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









