26/11 मुंबई हल्ल्यात बचावलेला मोशे खाबाद हाऊसला जाणार

- Author, झुबैर अहमद
- Role, बीबीसी प्रतिनिधी, अफुला (इस्राईल)
मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008ला झालेला जहालवाद्यांचा हल्ला कोण विसरू शकेल? छत्रपती शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज, हॉटेल ट्रायडंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, मेट्रो सिनेमा आदी ठिकाणी जहालवाद्यांनी हल्ला केला होता. याच हल्लेखोरांचं लक्ष ठरलेले एक ठिकाण होतं खाबाद हाऊस.
खाबाद हाऊसवर झालेल्या हल्ल्यात ज्यू पतिपत्नींची हत्या झाली होती. या हल्ल्यातून बचावला होता तो त्यांचा 2 वर्षांचा मुलगा मोशे. आईवडिलांचा मृत्यू डोळ्यांदेखत पाहिलेला हा मोशे होल्ट्ज़बर्ग आता 11 वर्षांचा झाला आहे.
त्या हल्ल्यानंतर तो सध्या इस्राईलच्या अफुला शहरात त्याच्या आजीआजोबांसोबत राहतो. आणि या आठवड्यात मोशे प्रथमच मुंबईतल्या त्याच्या घरी येणार आहे.
इस्राईलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांच्या शिष्टमंडळासह तो भारतात आला आहे. त्याच्या बरोबर त्याची आया सॅंड्रा आणि आजीआजोबाही आहेत.
मुंबईचा मुलगा मोशे
अफुलामध्ये मोशेला भेटायला मी त्याच्या घरी गेलो होतो पण तेव्हा तो शाळेला गेला होता. मोशेचं पालनपोषण त्याच्या आईचे आईवडील करतात. मोशेला आईवडिलांच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरायला काही वर्षं लागली असल्यानं त्याला माध्यमांनी भेटू नये, असं त्याच्या आजीआजोबांना वाटतं.

मोशेचे आईवडील मुंबईच्या ज्यू केंद्र खाबाद हाऊसमध्ये काम करत होते. मोशेचा जन्म मुंबईतलाच असल्याने तो एकप्रकारे मुंबईचाच मुलगा आहे.
मोशेचे कुटुंब धार्मिक आहे. त्याचं पालनपोषण धार्मिक वातावरणात सुरू आहे. त्याचे वडील रबाई म्हणजे धर्मगुरू होते. त्याचे आजोबासुद्धा धर्मगुरू आहेत.
मोशेला त्याच्या आईवडिलांबद्दल हळूहळू सगळं सांगण्यात आलं आहे. आता मोशेला त्याच्या आईवडिलांच्या मृत्यूचा सर्व तपशील माहीत आहे. आणि साहजिकच त्याला आईवडिलांची कमतरता पदोपदी जाणवते.

फोटो स्रोत, Getty Images
सध्या मोशेचं आयुष्य त्याचे आजीआजोबा आणि आया सॅंड्रा यांच्या अवतीभोवती गुंफल गेलं आहे. सॅंड्रा या मूळच्या गोव्याच्या असून सध्या त्या जेरुसलेममध्ये राहतात.
पण मोशे वाचला कसा?
2008 साली झालेल्या हल्ल्यात मोशेचे आईवडील हल्लेखोरांच्या गोळ्यांना बळी पडले होते. 2 वर्षांचा लहानगा मोशे आईवडिलांच्या मृतदेहांनजीक रडत उभा होता.
हल्लेखोर अंधाधुंद गोळीबार करत होते आणि त्यावेळी सॅंड्रा बेसमेंटमध्ये लपून बसल्या होत्या. सॅंड्राला मोशेच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता बेसमेंटमधून वर धाव घेतली, मोशेला तिथून उचलून दुसऱ्या खोलीत नेलं.
आणि आपल्या जीवावर खेळून सॅंड्राने मोशेला वाचवलं.

मोशेचे आजोबा म्हणतात की जर सॅंड्राने धाडस केलं नसतं तर आज त्यांचा नातू जिवंत राहिला नसता. सॅंड्रा आता त्यांच्या कुटुंबाचा भाग बनल्या आहेत.
इस्राईल सरकारने सॅंड्राला तिथं राहण्याची परवानगी दिली आहे. आता सॅंड्रा आणि मोशे नेतन्याहू यांच्यासमवेत या घराला पुन्हा भेट देणार आहेत. नऊ वर्षांपूर्वींच्या वेदनादायी आठवणींना यानिमित्ताने पुन्हा उजाळा मिळणार आहे.
सॅंड्राने आम्हाला सांगितलं की त्यांना माध्यमांशी बोलायला मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे त्या आमच्याशी बोलू शकत नाहीत. पण रोजेंबर्ग यांनी सॅंड्रा आणि मोशेचा हा प्रवास भावनिक असेल, अशी प्रतिक्रिया दिली.

मोशेच्या मुंबई प्रवासाबद्दल ते फार उत्साही आहेत.
'आय लव्ह यू मोदी'
मोशेला भेटण्याचा आम्ही फार प्रयत्न केला. पण मोशेच्या आजीनं आम्ही त्याला न भेटण्याचा सल्ला दिला. पण मोशेच्या आजोबांनी आम्हाला त्याची खोली दाखवण्याची तयारी दर्शवली.
आजोबा रोजेंबर्ग यांनी मला मोशेच्या खोलीत नेलं. खोलीत मोशे दोन वर्षांचा असतानाचे आणि आताचेही फोटो आहेत. मोशेची चेहरेपट्टी त्याच्या वडिलांसारखीच आहे. पण यातील सर्वांत महत्त्वाचा फोटो आहे, तो म्हणजे मोशेच्या आईवडिलांचा.
रोजेंबर्ग म्हणाले, "मोशे दररोज रात्री झोपण्यापूर्वी या फोटाला पाहून गुडनाईट म्हणतो. सकाळी उठल्यानंतर तो या फोटोसमोर नतमस्तक होतो."

फोटो स्रोत, MEAINDIA @TWITTER
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी इस्राईलच्या दौऱ्यात मोशेची भेट घेतली होती. मोशे यांनी त्या वेळी मोदी यांना 'आय लव्ह यू' असं म्हटलं होतं, असं त्याच्या आजोबांनी सांगितलं. त्यावेळी मोदी यांनी सॅंड्रा आणि मोशेला भारतात येण्याचं निमंत्रण दिलं होतं.
त्याच्या आईवडिलांसोबत जे काही घडलं ते कटू क्षण मोशेने आता मागे सारले आहेत. तो आता हासरा आणि आत्मविश्वासाने भरलेला मुलगा आहे.
पण त्याला जेव्हा मुंबईतून इस्राईलला आणण्यात आलं तेव्हा त्याची परिस्थिती बिकट होती. रोजेंबर्ग म्हणाले, "तेव्हा तो दिवसभर रडायचा. 'आई हवी', 'बाबा कुठं आहेत?', 'आई कुठं आहे?', असे प्रश्न तो विचारायचा. तो नेहमीच सॅंड्राला बिलगून असायचा."
हळूहळू तो आजीआजोबांशी बोलू लागला.
रोजेंबर्ग यांच्यासाठी जणू कालचक्र मागं फिरलं आहे. मोशेच्या वडिलांना मोठं करताना ते तरुण होते. मोशेला मोठं करताना मला पुन्हा तरुण व्हावं लागलं, असं ते म्हणाले.

सॅंड्रा आता आठवड्यातून एकदा मोशेला भेटायला येतात आणि पूर्ण दिवस मोशेसोबत घालवतात. त्यांना कधी यायला उशीर झाला तर मोशे उतावळा झालेला असतो. 'तू कुठे आहेस?', 'अजून का आली नाहीस?', 'तुला उशीर का झाला?', 'लवकर का नाही आलीस?', असे प्रश्न विचारून मोशे सॅंड्राला भंडावून सोडतो.
मोशे आपल्या वडिल आणि आजोबांप्रमाणेच धर्मगुरू बनेल का?
त्याचे आजोबा म्हणतात, "मोशे अजून लहान आहे. असंही शक्य आहे की 20-22 वर्षांचा झाल्यानंतर तो वडिलांसारखा धर्मगुरू होऊन मुंबईतल्या खाबाद हाऊसला जाईल आणि लोकांची सेवा करेल."
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








