प्रेस रिव्ह्यू : 'UNमधल्या मतांतराने भारत-इस्राईल संबंध खराब होणार नाहीत'

फोटो स्रोत, Getty Images
"भारतानं आमच्या विरोधात दिलेल्या एका मतामुळे भारत-इस्राईल संबंधांमध्ये काही फरक पडणार नाही," असं इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू रविवारी दिल्लीत आगमनानंतर म्हणाले.
"भारत आणि इस्राईल यांचे संबंध जणू स्वर्गात जमलेलं लग्न, असे आहेत. त्यामुळे यात कधी बाधा येणार नाही," असं नेतान्याहू 'इंडिया टुडे'शी बोलताना म्हणाले.
गेल्या महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी जेरुसलेमला इस्राईलची राजधानी घोषित केलं होतं. भारतानं ट्रंप आणि एकंदरच इस्राईलच्या विरोधात UN मध्ये मत दिलं होतं. त्यानं इस्राईल काहीसा नाराज असला तरी या विरोधी मतामुळे आमच्या संबंधांवर कोणताही फरक पडणार नाही असंही नेतान्याहू यांनी स्पष्ट केलं.
'परिस्थिती लवकरच सामान्य होईल'
"सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींचे माझ्याशी असलेले मतभेद लवकरच सनदशीर मार्गानं आणि सकारात्मकरीत्या निवळतील," असं आश्वासन सरन्यायाधीशांनी बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यानं दिलं.

फोटो स्रोत, NALSA.GOV.IN
द हिंदू मधील वृत्तानुसार, सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायमूर्तींनी आपले सरन्यायाधीशांशी असलेले मतभेद माध्यमांसमोर जाहीर केल्यानंतर बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या सात सदस्यांनी सरन्यायाधीशांची भेट घेतली होती. तेव्हा सरन्यायाधीशांनी असं बोलल्याचं बार काऊन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी सांगितलं.
या भेटीआधी मिश्रा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आजी-माजी न्यायाधीशांची तसंच अन्य न्यायालयांच्या न्यायाधीशांशी भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी सरन्यायाधीशांकडे आपली चिंता व्यक्त केली.
कबरीवर कबर
दिल्लीतल्या बाटला हाऊस कब्रस्तानात नव्या कबरींसाठी जागाच शिल्लक न राहिल्यानं इथे आता एका कबरीवरच दुसरी कबर खणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे एकदा वापरलेली जागा पाच वर्षांनी पुन्हा वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीत जागा अपुरी पडू लागल्यानं या कब्रस्तानाला असा निर्णय घ्यावा लागला आहे. जुन्या कबरीवर आता नवी कबर खणावी लागत आहे, कारण नवी जागा कब्रस्तानात शिल्लकच नाही, असं बाटला हाऊस कब्रस्तानातले मोहम्मद रशीद यांनी सांगितलं.
एबीवीपी विरोधात कॅथलिक शाळांची हाय कोर्टात धाव
मध्य प्रदेशातल्या विदिशामध्ये सेंट मेरी पिजी कॉलेजनं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे (ABVP) विरोधात हाय कोर्टात धाव घेतली आहे.
ABVPच्या काही कार्यकर्त्यांनी या कॉलेजमध्ये भारत माताची आरती करण्यासाठी जबरदस्ती प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला होता, असं इंडियन एक्सप्रेसने एका वृत्तात सांगितलं आहे.
अखेर मध्यप्रदेशातल्या कॅथलिक शाळांच्या संस्थेनं ABVPच्या कार्यकर्त्यांकडून शाळेला संरक्षण मिळावं तसंच धार्मिक एकात्मता टिकून राहावी यासाठी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे, अशी माहिती कॅथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियाचे सेक्रेटरी-जनरल थिओडोर मॅस्करहेन्स यांनी दिली.
ट्रॅक्टर आणि टँकरच्या अपघातात 5 जण ठार
पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात पिंपरे गावाजवळ रविवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
'सामना'मधल्या वृत्तानुसार, रात्री साडे आठच्या सुमारास एका ट्रॅक्टर आणि टँकरमध्ये ही धडक झाली. अनेक जण जखमी झाले आहेत.
जखमींमधील काही जणांचा प्रकृती चिंताजनक असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सर्व जखमींना जेजुरीमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








