सीरियात क्लोरिन वायूचा हल्ला झाल्याची शक्यता

फोटो स्रोत, Getty Images
सीरियाची राजधानी असलेल्या दमास्कसच्या बाहेरील भागात क्लोरिन वायूचा हल्ला झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बीबीसीला मिळालेल्या महितीनुसार, संघर्षग्रस्त पूर्व गुटा भागातील लोकांना विषारी वायूचा गंध जाणवला. "सहा रुग्णांना श्वसनाचा त्रास झाला. त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत," असं डॉक्टरांनी म्हटलं.
2013 पासून रशियाचा पाठिंबा असलेल्या सरकारी सैन्यानं या परिसराची नाकाबंदी केलेली आहे. या परिसरात चार लाख लोक राहतात.
सीरियात जेव्हापासून गृहयुद्धाला सुरुवात झाली तेव्हापासून अनेक वेळा क्लोरिन वायूचा हल्ला झाला आहे, अशी भीती नेहमी व्यक्त केली जाते. पण युद्धादरम्यान रसायनांचा कधीच वापर केला गेला नाही असं सरकारच म्हणणं आहे.
10 जानेवारीला संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार उच्चायुक्त जैद राद अल हुसैन यांनी म्हटलं, "31 डिसेंबर नंतर गुटाच्या पूर्वेकडील क्षेत्रात होणाऱ्या हल्ल्यांत वाढ झालेली आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 85 जण मारले गेले आहेत."
जनतेने घेतला तळघरात आसरा
जैद राद अल हुसैन यांनी म्हटलं, "पूर्व गुटातली नाकाबंदी मानवी विध्वंसाचं कारण बनली आहे. नागरी भागांत दिवस-रात्र जमिनीवरून तसंच हवेतून हल्ले होत आहेत, ज्यामुळे नागरिकांना तळघरात रहावं लागत आहे."

फोटो स्रोत, Getty Images
पूर्व गुटा क्षेत्र रणनीतीच्या दृष्टीनं खूपच महत्त्वपूर्ण आहे. बंडखोर इथून दमास्कसच्या रहिवाशी भागांवर रॉकेट हल्ले करतात. या हल्ल्यातही लोक मारले गेले असल्याचं सरकारी माध्यमांचं म्हणणं आहे.
पूर्व गुटाच्या बाहेर बंडखोरांच्या ताब्यातल्या हारस्ता शहरातील भूमिगत असणारे शिक्षक युसूफ इब्राहिम स्थितीचं वर्णन करताना सांगतात, "आजचा दिवस कालच्या मानानं बराच चांगला आहे. कारण अजून कोणत्याही प्रकारचा हवाई हल्ला झालेला नाही. फक्त जमिनीवरून जमिनीवर हल्ले करण्यात आले, ज्यात इमारती आणि हारास्काच्या जनतेला लक्ष्य केलं गेलं."
ते पुढे सांगतात, "शहरातील रहिवासी भूमिगत असून बॉम्बगोळ्यांच्या वर्षावामुळे तळघरात राहत आहेत. या ठिकाणी कोणत्याचं सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. बाजार, रुग्णालयाची सुविधा देखील आम्हाला उपलब्ध नाही."
"10 दिवसांत हवेतून तसंच जमिनीवरील हल्ल्यांमुळे सीरियातल्या बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या भागातील 10 दवाखान्यांचं नुकसान झालं आहे," असं या भागात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
भूकबळीची समस्या
अन्नधान्याच्या कमतरतेमुळे या भागात कुपोषणाचे प्रकरणं समोर आली आहेत. नोव्हेंबर 2017मध्ये आलेल्या संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालात सांगण्यात आलं होतं की, "पूर्व गुटातील काही नागरिकांना जनावरांचा चारा आणि कचरा खाण्याची वेळ आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
काही लोकांचे भूकेनं प्राणही गेले अशा बातम्या होत्या. पूर्वी गुटा अशा भागांपैकी आहे की ज्या ठिकाणी युद्धाचं प्रमाण कमी करण्यात आलं आहे. अशी घोषणा सीरिया, रशिया, इराण आणि तुर्की या देशांनी 2017मध्ये एकत्रितरित्या केली होती.
पण ही घोषणा नावापुरतीच राहिली. या भागात अजूनही बॉम्बवर्षाव सुरूच आहे. या भागातील लोकांना ज्या मार्गानं मदत आणि साधनसामुग्री येत होती, ते मार्ग सैनिकांनी बंद केले आहे. त्यामुळे या भागातील लोकांना अनियमित मदतीवर अवलंबून राहावं लागत आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








