You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आजी आणि नातीच्या त्या मन हेलावून टाकणाऱ्या फोटोमागचं हे आहे वास्तव
- Author, टीम बीबीसी हिंदी
- Role, नवी दिल्ली
एक फोटो हजार शब्दांची कहाणी सांगतो असं म्हणतात. असाच एक फोटो 20-21 ऑगस्ट दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा फोटो शेअर करणाऱ्या लोकांनी त्यासोबत थोडी माहितीही लिहिली आहे. "एका शाळेने त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी वृद्धाश्रमाचा दौरा आयोजित केला होता. तिथे या मुलीने तिच्या आजीला पाहिलं."
त्यात पुढे म्हटलं होतं की, "ही मुलगी आईवडिलांना आजीविषयी विचारायची तेव्हा ते सांगायचे की, आजी नातेवाईकांकडे राहायला गेली आहे. हा कोणत्या प्रकारचा समाज आपण उभा करतोय?"
पाहता पाहता हा फोटो व्हायरल झाला. सर्वसामान्यांबरोबरच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, क्रिकेटपटू हरभजन सिंह यांसारख्या प्रतिष्ठित लोकांनी फेसबुक आणि ट्विटरवर हा फोटो शेअर केला आहे.
परंतु या फोटोखाली लिहिलेल्या माहितीत किती तथ्य आहे? हा फोटो अलीकडचा आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं गुजरातचे ज्येष्ठ छायाचित्रकार कल्पित भचेच यांनी बीबीसीला दिली.
सत्य काय आहे?
खरंतर हा फोटो 11 वर्षांपूर्वी म्हणजेच 2007 मध्ये काढला होता. कल्पित यांनी तो सगळा प्रसंग पुन्हा सांगितला.
पत्रकारितेत अनेक योगायोग होत असतात. ही कहाणी म्हणजे त्याचंच एक उदाहरण आहे.
तो 12 सप्टेंबर 2007चा दिवस होता. माझ्या जन्मदिनाच्या एक दिवस आधीचा तो दिवस होता. मी सकाळी नऊ वाजता घरुन निघत होतो. तेवढ्यात माझ्या मोबाईलवर मणिनगरच्या GNC शाळेतून फोन आला.
शाळेच्या मुख्याध्यापिका रीटा पंड्या फोनवर होत्या. त्या म्हणाल्या की, शाळेच्या विद्यार्थ्यांबरोबर त्या वृद्धाश्रमात जात आहेत. ही भेट कव्हर करण्यासाठी येणार का असं त्यांनी विचारलं.
मी येतो म्हणालो आणि मणिलाल गांधी वृद्धाश्रमात पोहोचलो.
तिथे एका बाजूला मुलं बसली होती आणि दुसऱ्या बाजूला वृद्ध लोक होते. मी आग्रह केला की मुलांना आणि वृद्धांना एकत्र बसवू म्हणजे चांगले फोटो येतील.
ज्या क्षणी ही मुलं उभी राहिली त्यांच्यातली एक मुलगी तिथे उपस्थित एका वृद्ध महिलेला पाहून जोरजोरात रडायला लागली.
आश्चर्य म्हणजे ती वृद्धासुद्धा या मुलीला पाहून रडायला लागली. जेव्हा त्या महिलेला जाऊन विचारलं तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की ती लहान मुलगी त्यांची नात आहे.
मुलीनेसुद्धा रडत सांगितलं की वृद्ध महिला तिची आजी आहे. आजी घरी नसल्यानं तिचं आयुष्य अगदी सुनं झालं आहे, असं ती मुलगी म्हणाली.
मुलीच्या आईवडिलांनी तिला सांगितलं होतं की तिची आजी नातेवाईकांकडे गेली आहे. मात्र जेव्हा ती वृद्धाश्रमात पोहोचली तेव्हा तिला कळलं की आजी नक्की कुठे आहे.
आजी आणि नात यांच्यातला भावनिक क्षण पाहून आजूबाजूचे लोकसुद्धा हेलावले. वातावरण हलकं करण्यासाठी काही मुलांनी तिथे भजन गायला सुरुवात केली.
हा फोटो दुसऱ्या दिवशी दिव्य भास्कर या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर छापून आला आणि संपूर्ण गुजरातमध्ये या विषयावर चर्चा सुरू झाली. हा फोटो पाहून अनेकांना धक्का बसला.
माझ्या तीस वर्षाच्या कारकिर्दीत पहिल्यांदा असं झालं की मी काढलेल्या एखाद्या फोटोची एवढी चर्चा झाली. मला एक हजारपेक्षा अधिक फोन आले. त्यावेळी संपूर्ण राज्यात त्याच फोटोची चर्चा झाली.
मात्र दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी त्या महिलेची मुलाखत घ्यायला गेले, तेव्हा 'मी स्वत:च्या मर्जीने वृद्धाश्रमात आले आहे,' असं त्या म्हणाल्या.
हे आहे त्या मन हेलावून टाकणाऱ्या फोटोमागचं वास्तव!
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)