'जेव्हा वाजपेयी यांच्या धोतराला अमेरिकन महिला म्हणाली व्हेरी सेक्सी ट्राउझर'

फोटो स्रोत, Getty Images/BBC
- Author, सिद्धनाथ गानू
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"ते मला एकदा म्हणाले होते की मी कधीच इंदिरा गांधींना दुर्गा म्हटलं नाही. मी देवी म्हटलं असेल, पण दुर्गा कधीच म्हटलं नव्हतं," जवळपास 60 वर्षं भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे मित्र असलेले डॉ. एन. एम. घटाटे सांगत होते.
घटाटे सांगतात, "मी एकदा वाजपेयींना विचारलं होतं की पंडित नेहरुंनी तुमची 'हे एक दिवस देशाचे पंतप्रधान होतील' अशी ओळख करून दिली होती का? त्यावरही ते नाही म्हणाले होते."
मनमोहन सिंग यांच्याबरोबरची मैत्री
1991 हे वर्षं भारतासाठी महत्त्वाचं होतं. भारतीय अर्थव्यवस्थेची दिशा या वर्षी बदलली होती. पी. व्ही. नरसिंह राव सरकारमधील तेव्हाचे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी सादर केलेल्या त्या बजेटवर वाजपेयींनी भरपूर टीका केली होती. त्याबद्दलची एक आठवण घटाटे सांगतात.
"अटलजी म्हणाले की, मनमोहन सिंग यांना झटका मटण आवडतं. पण अर्थव्यवस्थेला असे झटके देणं चांगलं नाही. त्यात बदल करताना संतुलन राखलं पाहिजे. ते आणखी बरंच काही बोलले."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
"मनमोहन सिंग नोकरशहा होते. त्यामुळे त्यांना या गोष्टीचं फार वाईट वाटलं. त्यांना तर राजीनामा द्यायचा होता! हे ऐकून तेव्हाचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी अटलजींना फोन केला आणि काय घडलं ते सांगितलं.

फोटो स्रोत, PIB
अटलजींना ते कळताच लागलीच त्यांनी मनमोहन सिंगांना फोन केला आणि ते म्हणाले, 'यह तो पॉलिटिक्स है, यह तो चलता ही है' मनमोहन सिंग आणि अटलजींची ही मैत्री आयुष्यभर टिकली." हा किस्सा वीर संघवी यांनी सर्वप्रथम लिहिला होता असंही घटाटे नमूद करतात.
सत्तापालट आणि राजकारणातून निवृत्ती
2004 साली एनडीएचं सरकार पडलं. वाजपेयी लोकसभेत निवडून आले होते पण इथून पुढे त्यांचा सार्वजनिक जीवनातला वावर कमी होऊ लागला होता. त्यांची प्रकृतीही आता खालावू लागली होती. नंतरच्या काळात मनमोहन सिंग आणि वाजपेयींची एक खास भेट झाली होती, त्याची आठवण अॅडव्होकेट घटाटेंनी सांगितली.

फोटो स्रोत, Getty Images
"2008 साली जेव्हा भारत-अमेरिका अणू करार झाला त्यानंतर मनमोहन सिंग अटलजींना भेटायला त्यांच्या घरी आले होते. ते म्हणाले, 'तुम्ही जे सुरू केलं होतं ते मी पूर्ण केलं.' पण अटलजी त्यावर काही बोलले नाहीत. मनमोहन सिंग त्यांना म्हणाले सुद्धा, 'अहो भीष्माचार्य काहीतरी बोला!' पण अटलजी काहीच बोलले नाहीत."
"वाजपेयी मला एकदा म्हणाले होते. 'अप्पा, मी 50 वर्षं राजकारणात काम केलं. आता पुरे, आता मी झोपतो. I want to fade away from politics' हे त्यांचे शब्द आजही माझ्या लक्षात आहेत," घटाटे सांगतात.
संसदेबद्दल निष्ठा...
वाजपेयी जवळपास पन्नास वर्षं संसदेत होते. त्यांनी तिथे विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. संसदेबद्दल आणि तिथल्या कामकाजाबद्दल त्यांना किती आस्था होती याचं वर्णन करताना घटाटे म्हणतात, "अटलजींनी मला सांगितलं होतं, की ते कधीच संसदेच्या वेलमध्ये उतरले नाहीत. त्यांचा आग्रह असायचा की संसद चाललीच पाहिजे. ते विनोदाने म्हणत, संसद चालली नाही की सगळ्यात खूष असतात मंत्री, कारण प्रश्नोत्तराचा तास बुडतो."

फोटो स्रोत, Getty Images
एक मुत्सद्दी राजकारणी अशी वाजपेयींची प्रतिमा होती. त्याबद्दल बोलताना घटाटे सांगतात, "अटलजींबद्दल सगळ्यांनाच आदर होता. ते जेव्हा पाकिस्तानमध्ये गेले होते तेव्हा तिथल्या भाषणात ते म्हणाले होते, इथून पुढे भारत पाकिस्तानला फक्त हॉकी फिल्डवर हरवेल. त्यांचं हेच वैशिष्ट्य होतं, की ते कधीही कमरेखाली घाव करत नसत."
वक्तृत्वाची पॉकेट एडिशन
"राजकीय जीवनात अटलजी एक प्रभावी वक्ता होतेच, पण खासगी आयुष्यात ते अत्यंत अबोल आणि अंतर्मुख होते. आम्ही तासन् तास मोटारीने एकत्र प्रवास केला आहे पण कधीकधी दोघंही एकमेकांशी एक अक्षरही बोलत नसू. आम्ही वाचत बसायचो."

फोटो स्रोत, Getty Images
वाजपेयींची राजकारणापलीकडची ओळख त्यांच्या कविता आणि वक्तृत्वाबद्दल होती. पण या आपल्या गुणांबाबतही ते किती विनम्र होते हे दाखवणारी एक आठवण घटाटेंनी सांगितली.
"अटलजींनी त्यांच्या वडिलांच्या नावाने एक ट्रस्ट केला होता. त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते म्हणाले होती, की वक्तृत्व आणि काव्याच्या बाबतीत मी माझ्या वडिलांची पॉकेट एडिशन आहे. माझे वडील उत्तम कवी, लेखक आणि वक्ते होते. पण त्यांना माझ्यासारखी संधी मिळाली नाही."
विनोदबुद्धीची देणगी
"एकदा मी आणि अटलजी रेल्वेने प्रवास करत होतो. फिरोझपूरला चाललो होतो. रात्रीची वेळ होती. त्यांनी एका कागदावर कविता लिहिली आणि मला वाचायला दिली. ती फार सुंदर कविता होती."
"मी ती कविता वाचली, त्यांनी त्यावर माझी प्रतिक्रिया विचारली. मी म्हटलं की फार चांगली आहे ही कविता. मी आपलं काहीतरी म्हटलं. त्यावर ते लागलीच म्हणाले, 'तू कधी कविता करू नकोस!'"

फोटो स्रोत, N.M.GHATATE/MERI SANSADIYA YATRA
1960च्या दशकातला असाच एक गमतीशीर प्रसंग डॉ. घटाटेंना आठवतो. ते अमेरिकेत शिकत असताना अटलजी तिथे आले होते. दोघे एका शॉपिंग मॉलमध्ये फेरफटका मारत होते, तेव्हा हा प्रसंग घडला.
"जॉन एफ. केनेडी तेव्हा निवडणुकीला उभे होते. आम्हा दोघांकडेही पैसे कमीच, त्यामुळे आम्ही विंडो शॉपिंग करत होतो. अटलजींनी धोतर नेसलं होतं. आम्ही चालत असताना एक बाई आली आणि वाजपेयींच्या धोतराकडे पाहून मला म्हणाली की, 'That's a very sexy Trouser!' अटलजींनीही ते ऐकलं. त्यावर ते जोरात हसले."
डॉ. घटाटेंनी वाजपेयींच्या सर्व संसदीय भाषणांचं संकलन केलं आहे. 1957 ते 1959 या काळात तर त्यांनी त्यांची सगळी भाषणं ऐकली.

फोटो स्रोत, Getty Images
अनेक भाषा अवगत असणाऱ्या आणि विविध भाषांमधल्या साहित्याची कदर करणाऱ्या अटल बिहारी वाजपेयींच्या या मराठी मित्राने एक फार हळवी गोष्ट बीबीसी मराठीकडे बोलून दाखवली.
'तुम्ही इतकी वर्षं दररोज वाजपेयींना भेटायला जात आहात?' हे विचारल्यानंतर ते म्हणाले, "भेटायला म्हणजे बोलायला नाही. दर्शन घ्यायला, त्यांच्याप्रती असलेला आदर व्यक्त करायला. आमच्या बोलण्याच्या गोष्टी कधीच संपल्या आहेत."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








