उमर खालिद : 'ठेचून मारणाऱ्यांना अभय देणारे खरे आरोपी आहेत'

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (JNU) विद्यार्थी नेता उमर खालिद यांच्यावर सोमवारी संध्याकाळी राजधानी दिल्लीतल्या कॉन्स्टिट्युशन क्लब इथे गोळीबार झाला. त्यातून ते थोडक्यात बचावला, पण या गोळीबारानंतर त्यांनी सोशल मीडियावर स्वतःच्या भावना व्यक्त केल्या.

एका ट्वीटद्वारे त्यांनी लिहिलं, "पंतप्रधान मोदींनी त्यांच्या 15 ऑगस्टच्या भाषणासाठी काही विषय सुचवण्यासाठी सांगितले होते. मला काही सुचवायचं आहे - तुम्ही एका गोष्टीची शाश्वती देऊ शकता का की तुमच्या सरकारवर टीका करणाऱ्यांवर यापुढे हल्ले होणार नाहीत?"

त्यानंतर उमर खालिद यांनी फेसबुकवर पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या पत्रातील महत्त्वाचा भाग :

गेल्या काही दिवसांत मला जिवे मारण्याच्या अनेक धमक्या आल्या आहेत. तसंच गेल्या काही वर्षांत सामाजिक कार्यकर्त्यांच्या हत्याही झाल्या आहेत. त्यामुळे, मला कुठे तरी एक गोष्ट जाणवली होती की, माझ्यावरही एक दिवस बंदूक ताणली जाईल. दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश अशी हत्या झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांची यादी वाढतच चालली आहे.

पण मी या सगळ्यासाठी तयार होतो असं म्हणू शकतो का? अशा प्रसंगासाठी आम्ही तयार आहोत, असं कुणीही म्हणू शकतं का? नक्कीच याचं उत्तर नाही असंच असेल.

15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्यदिनाच्या दोन दिवस आगोदरच असा प्रकार घडल्याने 'स्वातंत्र्य' म्हणजे काय, हाच प्रश्न मला पडतो. कारण एखाद्या नागरिकाला केवळ अन्यायाविरुद्ध वाचा फोडल्याच्या 'गुन्ह्या'बद्दल मरणाला का सामोरं जावं लागलं?

या सगळ्यातला एक विरोधाभास असा की, माझ्यावर हल्ला झाला तेव्हा मी 'Freedom from Fear' (दहशतीपासून स्वातंत्र्य) नावाच्या एका कार्यक्रमासाठी दिल्लीतल्या कॉन्स्टिट्युशन क्लबला गेलो होतो.

स्वातंत्र्यदिनाच्या दोन दिवस आगोदर देशाच्या राजधानीतील सर्वांत सुरक्षित अशा भागात एक सशस्त्र माणूस माझ्यावर दिवसाढवळ्या हल्ला करतो. हे नक्कीच दाखवतं कसं विद्यमान सरकारच्या काळात काही जण कशाचीही तमा न बाळगता निर्भिडपणे अशी कृत्यं करण्यात धन्यता मानतात.

तो हल्लेखोर कोण होता किंवा यामागे नेमक्या कोणत्या गटांचा हात होता, हे मला माहीत नाही. याचा तपास आता पोलिसांना करायचा आहे.

पण या सगळ्या प्रकारावरून मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, जर काल माझ्या बाबतीत काही बरं-वाईट घडलं असतं किंवा उद्या असं काही घडेल तर यासाठी केवळ एका 'अनोळखी बंदूकधाऱ्याला' जबाबदार धरू नका. आरोपी म्हणून त्यांनाही जबाबदार धरा ज्यांनी सत्तेचा वापर करत आजवर द्वेष पसरवत, रक्ताची होळी खेळण्याचा प्रयत्न केला आहे.

'खरे आरोपी वेगळेच'

आता हत्येच्या आरोपींना आणि सामूहिकरीत्या लोकांना ठेचून मारणाऱ्यांना एक वेगळं अभय देण्याचं वातावरण निर्माण करणारेच खरे आरोपी आहेत. सत्ताधारी पक्षांचे प्रवक्ते, प्राईम टाईम टीव्ही शोचे अँकर आणि ते टीव्ही चॅनल्स ज्यांनी सातत्यानं माझ्यावर देशद्रोही असल्याचा ठपका ठेवला आहे, वारंवार माझ्याबद्दल आभासी वातावरण निर्माण करून एकप्रकारे माझं 'मॉब लिंचिंग' कसं होईल, असं वातावरण ज्यांनी निर्माण केलं, हे सगळे आरोपी आहेत. या सगळ्यांमुळेच माझ्या आयुष्याला धोका निर्माण झाला आहे.

मी कुणावरही थेट आरोप केलेला नसताना हे लोक मूळ घडलेली घटनाच का बदलू पाहत आहेत? या सगळ्या घाईने काय समजायचं? हे सगळं सांगण्यासाठी ते पुढे का येत आहेत? त्यांचा उद्देश नेमका काय?

गेल्या दोन वर्षांपासून माझ्याविरोधात द्वेषाचं वातावरण निर्माण केलं जातंय. पण माझ्याविरोधात कुणीही पुरावे दिलेले नाहीत, फक्त खोटं बोललं जातंय. माझ्या विरोधात कोणतंही आरोपपत्र दाखल झालेलं नाही, केवळ 'मीडिया ट्रायल' सुरू आहे. कोणतेही वादविवाद सुरू नाहीत तर फक्त जिवे मारण्याच्या धमक्या मला येत आहेत आणि आज हे सगळं एका बंदुकीपर्यंत येऊन थांबलं आहे.

एखादा चित्रपट प्रदर्शित झाला तर 'देशाचे तुकडे करू', असं म्हणणाऱ्या लोकांना भाजपचे नेते पाठिंबा देतात. अशावेळी माझ्या नावाच्या मागे 'टुकडे टुकडे' हा हॅशटॅग का लावला जातो? आणि मलाच का वारंवार देषद्रोही ठरवलं जातं आणि कधीही न संपणाऱ्या 'मीडिया ट्रायल'चा भाग बनवलं जातं?

ज्यांनी देशाच्या याच राजधानीत परवा दिल्ली पोलिसांसमोर संविधानाची प्रत जाळली त्यांच्याविरोधात कोणताच उद्रेक का होत नाही? अल्पसंख्याकांविरोधात भीतीचं वातावरण निर्माण करणारे, देशात ध्रुवीकरणाचा प्रयत्न करणारे आणि 'मॉब लिंचिंग'च्या आरोपींचं त्यांच्या घरी जाऊन सत्कार करणारे का एवढे मानले जातात? आणि आम्ही जे या द्वेषाविरुद्ध आवाज उठवतो त्यांना मात्र व्हिलन ठरवलं जातं.

'हे हल्ले मला शांत करणार नाहीत'

असे हल्ले करून आम्हाला शांत करण्याचा कोणाचा इरादा असेल, तर ते खूप मोठी चूक करत आहेत. गौरी लंकेश यांचे विचार, रोहित वेमुलाचे विचार आजही जिवंत आहेत. ते आम्हाला शांत करू शकत नाही, ना त्यांची जेल आणि ना त्यांच्या गोळ्या. आम्ही हे कालंच सिद्ध केलं आहे.

माझ्यावर हल्ला होऊनही कालचा 'खौफ से आझादी' (दहशतीपासून स्वातंत्र्य) हा कार्यक्रम यशस्वीरीत्या कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये सुरळीत पार पडला.

या कार्यक्रमात नजीबची आई फातिमा नफीस, अलिमउद्दीनची बायको मरियम (ज्याच्या मारेकऱ्यांचा केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी गौरव केला), जुनैदची आई फातिमा (या १६ वर्षीय मुलाची गेल्या वर्षी दिल्लीजवळे एका ट्रेनमध्ये हत्या करण्यात आली), रकबर खानचा भाऊ अकबर, (गोरखपूर हॉस्पिटल प्रकरणात अडकलेले) डॉ. कफिल खान, प्रशांत भूषण, प्रा. अपूर्वानंद, S. R. दारापुरी, मनोज झा आणि इतर अनेक जण यावेळी उपस्थित होते.

या सगळ्यांनीच समूहाने केलेल्या हत्या आणि भगव्या कट्टरतावादाकडून पसरवलेली दहशत, द्वेष याविरोधात त्यांचा आवाज बुलंद केला. हीच आमच्या विरोधाची स्फूर्ती आहे.

माझ्या आयुष्याला धोका असल्यामुळे दिल्ली पोलिसांनी मला संरक्षण द्यावं, ही माझी मागणी आहे. गेल्या दोन वर्षांत मी दिल्ली पोलिसांकडे दोनदा पोलीस संरक्षण मागितलं आहे. मला यापूर्वीही अशा जिवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. नेहमी सोशल मीडियावरून तर अशा धमक्यांचे असंख्य मेसेज मला येतच असतात. कालच्या या घटनेनंतर दिल्ली पोलीस कशाची वाट पाहत आहेत? मी सर्व लोकशाहीवादी गटांना विनंती करतो की, मला सुरक्षा मिळावी यासाठी सगळ्यांनीच दिल्ली पोलिसांवर दबाव टाकावा. कारण इथून पुढे सुरक्षेविना कुठेही जाणं मला शक्य होणार नाही.

या हल्ल्याविरोधात जे-जे माझ्या पाठीशी उभे राहिले आणि ज्यांनी-ज्यांनी याविरुद्ध आवाज उठवला त्यांचे मी आभार मानतो. लोकशाहीमधला हा संघटित लढा असून तो आपण एकत्र लढत आहोत. याच सहाय्याने आपण सावरकर आणि गोडसेंच्या पाठीराख्यांवर मात करू शकू.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)