'हवामान खात्याचा अंदाज म्हणजे, छापा असेल तर सरासरीपेक्षा जास्त आणि काटा आला तर सरासरीपेक्षा कमी!'

हवामान खात्याच्या फसलेल्या अंदाजावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी टीका केली. त्यावर बीबीसी मराठीच्या वाचकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया.

यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असं हवामान विभागानं सांगितलं होतं. पण प्रत्यक्षात मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची स्थिती आहे. कुठे आहे मग सरासरीपेक्षा जास्त पाऊस?, असा सवाल राजू शेट्टी यांनी विचारला आहे.

हवामान खात्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी नियोजन केलं तर त्याच्या नेमकं उलटं होतं. हवामान खात्यानं चुकीचा अंदाज दिल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असल्याचंही शेट्टी म्हणतात.

याच पार्श्वभूमीवर आम्ही बीबीसीच्या वाचकांना हवामानाच्या खात्याच्या अंदाजांविषयी काय वाटतं असं विचारलं. त्यावर अनेकांनी आपली मतं नोंदवली आहेत. त्यापैकी ही निवडक आणि संपादित मतं.

काही जणांनी हवामान खात्यावर टीकास्त्र सोडले, तर काहींनी राजू शेट्टी यातसुद्धा राजकारण शोधत असावेत, असा आरोपही केला.

सौरभ सुरेश म्हाळस म्हणतात, हवामान खातेवाले काही देव नाहीत भविष्यवाणी करायला. ती सुद्धा माणसंच आहेत, त्यांचेही अंदाज असतात... एवढा त्यांचा त्रास होत असेल तर शेट्टींनी स्वतः अंदाज वर्तवावेत. कशाला खात्यावर विश्वास ठेवता साहेब?

तर हवामान खातं हे बियाणं, औषधं तसंच खत कंपनी यांची दलाली करणारं खातं असल्याचं आरोप विकास शिंदे यांनी केला आहे.

तसंच, पावसाची खोटी आशा दाखवून शेतकऱ्याला आणि देशाला फसवले आहे. यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

हवामान खात्यानं तंत्रज्ञान अधिक प्रगत करायला पाहिजे, असा सल्लाह राजेंद्र नऱ्हाली यांनी दिला आहे.

कैलास मोहोरे म्हणतात, "छापा आला की सरासरीपेक्षा जास्त आणि काटा आला की सरासरीपेक्षा कमी, असं आहे आपलं हवामान खातं!"

हवामान खातं चांगलं काम करत आहे. राजू शेट्टी यांना यातही राजकारण दिसत असावं, असं मत पंढरीनाथ प्रभू राजीवाडेकर यांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)