You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एक पिनकोड मैत्रीचा : मुंबईच्या ऋषिकेश आणि लाहोरच्या समिउल्लाची कहाणी
- Author, प्राजक्ता धुळप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
ऋषिकेशकडची ती चार पत्रं त्याच्यासाठी खूप मोठा ऐवज होती. कारण ती समिउल्लाने पाठवली होती.
वर्षभरापूर्वीच त्यांची ओळख झाली होती. ऋषिकेश इकडे मुंबईत अनुयोग विद्यालयात शिकत होता तर समिउल्ला तिकडे लाहोर ग्रामर स्कूलमध्ये.
शाळेत शिकत असताना दोघंही पत्रांच्या माध्यमातून एकमेकांना ओळखू लागले. आणि नववीत शिकणाऱ्या ऋषिकेशला सीमेपलीकडे 'पेन फ्रेंड' मिळाला. त्यांच्या पत्रांमधल्या एक-एक शब्दामधून, त्यातल्या भावनांमधून इकडच्या शाळकरी मुलाच्या मनातला 'पाकिस्तान' आणि सीमेपलीकडच्या मुलाच्या मनातला 'भारत' नव्याने आकार घेत होता.
पाकिस्तानात वडापाव?
पहिलं पत्र ऋषिकेशने लिहिलं. पत्रातून त्याने स्वत:ची ओळख करून दिली. मग समिउल्लाचं उत्तर आलं. त्यानेही स्वत:ची ओळख, घरी कोण कोण असतं, याविषयी लिहिलं. खाणं, सण, खेळ, छंद अशा वेगवेगळ्या विषयांवर लिहीत मैत्रीचा सिलसिला सुरू झाला.
पत्रांतून ऋषिकेश गेटवे ऑफ इंडिया, मंदिर आणि मुंबईबद्दल फोटोसह माहिती शेअर केली जायची. विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत तिकडून पुढचं पत्र यायचं 'डिअर फ्रेंड...'. त्यात लाहोर किल्ला, बादशाही मशिदीबद्दल लिहिलेलं असायचं. फैज अहमद फैजची ओळखही त्याने ऋषिकेशला पत्रातून करून दिली.
'पाकिस्तानात वडापाव मिळतो का?' इथपासून 'तुमचासुद्धा राष्ट्रीय खेळ हॉकीच आहे?' असे प्रश्न पत्रातून विचारले गेले.
2016 साली पत्रांची ही देवाण-घेवाण सुरू झाली आणि 2017 साली ठरलं की ऋषिकेश आपल्या डिअर फ्रेंडला प्रत्यक्षात भेटणार. लाहोरला जायची संधी चालून आली. मित्राला भेटण्याची उत्सुकता तर होतीच पण ऋषिकेशला खुणावत होतं ते त्या पत्रांमधून भेटलेलं लाहोर शहर. तिथली संस्कृती, तिथल्या ऐतिहासिक वास्तू.
चौथ्या पत्रात समिउल्लाने विचारलं की, "तू मला मुंबईहून काय भेट आणशील?"
ऋषिकेशने त्याच्या बाबांना विचारलं की काय नेऊ?. त्यांनी पठाणी सूट भेट देऊ सुचवलं. आणि लागलीच जवळच्या अब्बास टेलरकडून दोन पठाणी सूट शिवून घेण्यात आले. एक समिउल्लासाठी आणि दुसरा ऋषिकेशसाठी.
लाहोरला जायची इच्छा तर होती, त्यासाठी आधी पासपोर्ट आणि मग व्हिसाचे सोपस्कारही पार पाडावे लागणार होते. सगळं सुरळित झालं. तिकिटंही काढली गेली. पण अचानक ठरलेला प्लॅन रद्द करावा लागला.
आपल्या मित्राला भेटण्याचं आणि पत्रातून कळलेला पाकिस्तान बघण्याचं ऋषिकेशचं स्वप्न अर्धवटच राहिलं.
ऋषिकेशसारख्या अनुयोग शाळेतल्या जवळपास 212 मुला-मुलींनी सीमेपलीकडच्या आपल्या 'पेन फ्रेंड्स'ना पत्रं लिहिली. अशी जवळपास वर्षभरात हजारच्या आसपास पत्रांची देवाणघेवाण झाली.
त्यांना पत्रांमधून भेटलेला पाकिस्तान हा फाळणी आणि इतिहासाच्या पुस्तकातून दिसणाऱ्या पाकिस्तानपेक्षा वेगळा देश दिसला. ते शक्य झालं 'Exchange For Change' या उपक्रमामुळे.
या उपक्रमाविषयी अनुयोग शाळेतल्या शिक्षिका मनिषा घेवडे सांगतात- "दोन्ही देशांमध्ये हिंदी चांगली कळत असली तरी पत्र लिहिण्याची भाषा इंग्रजी निवडावी लागली, कारण इकडे देवनागरी आणि तिकडे उर्दू लिपी आहे. पण ही पत्र लिहिणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. आम्ही शिक्षक त्यांना विचार करायला मदत करायचो, पण प्रश्न मुलांचेच असायचे. आणि तेच स्वत: उत्साहात पत्र लिहायचे, पुढच्या पत्राची वाटही पाहायचे."
पत्रातून ओळख झाल्यावर उपक्रमातला पुढचा टप्पा होता प्रत्यक्ष भेटीचा. 'पेन फ्रेंड' झालेल्या काही मुलां-मुलींनी लाहोरला जाण्याची तयारी केली. पण त्यांचे पालक तयार होत नव्हते.
अनुयोग शाळेचे ट्रस्टी सतीश चिंदरकर सांगतात, "आपल्या समाजातली हिंदू-मुस्लीम यांची परस्परांविषयी कटू प्रतिमा बदलायला हवी. लहान मुलांच्या मनात तेढ तयार करणारं बीज रुजण्याआधीच आपण प्रयत्न केले पाहिजेत. आम्ही पालकांना समजावून सांगत होतो. अखेर दोन पालक तयार झाले. त्यांच्यासोबत आम्ही शिक्षकही जाणार असं ठरलं."
"आमच्या हातात तिकिटं होती तेव्हा, भारत-पाक सीमेवर तणाव आहे, असं आम्हाला सांगण्यात आलं आणि पाकिस्तान भेट रद्द करायला सांगण्यात आलं," ते पुढे सांगतात.
चिंदरकर यांना अजूनही आपल्या विद्यार्थ्यांना पाकिस्तानला घेऊन जाता येईल, अशी आशा आहे.
भारत आणि पाकिस्तानमधल्या विद्यार्थ्यांना एकमेकांच्या संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून हा उपक्रम दिल्लीच्या Routes2Roots संस्थेने 2010 साली सुरू केला. सात वर्षांमध्ये मुंबई, दिल्ली, डेहराडून, लाहोर, कराची आणि इस्लामाबाद शहरातील पन्नास हजार मुलं पेनफ्रेंड झाली, असं या संस्थेचे संस्थापक राकेश गुप्ता सांगतात.
"परस्परांच्या संस्कृतीविषयी सहिष्णुता वाढवली तरच शांतता नांदू शकते," राकेश गुप्ता या विचारावर अधिक भर देतात. "भारत-पाक मैत्रीसाठी प्रतिकात्मक उपक्रम राबवण्याऐवजी शाळकरी मुलांच्या मनात दुसऱ्या देशाविषयी द्वेष आणि शत्रुत्वाची भावना काढून आदर तयार करणं आवश्यक आहे."
पण 'Exchange For Change' हा उपक्रम आता बंद करावा लागल्याची खंत राकेश गुप्ता व्यक्त करतात.
गेल्या वर्षी मे महिन्यात याच उपक्रमाचा भाग म्हणून लाहोरच्या शाळेचे 60 विद्यार्थी भारतात आले होते. दिल्लीतल्या दोन दिवसांच्या भेटीनंतर ही मुलं आपल्या शिक्षकांसह ताजमहाल पाहायला जाणार होती.
"सात वर्षं आम्ही भारतातून पाकिस्तानात मुलांना घेऊन गेलो आणि पाकिस्तानातून मुलांना इथे आणलं. नेहमीच दोन्हीकडच्या सरकारची आणि सरकारी यंत्रणांची मदत झाली. गेल्या वर्षी लाहोरच्या मुलांना त्वरीत मायदेशी पाठवण्याच्या सूचना गृहखात्याने दिल्याने पाकिस्तानच्या मुलांची भारत भेट पूर्ण होऊ शकली नाही," त्यांनी अधिक माहिती दिली.
त्यामुळे लाहोरच्या मुलांना भारतातल्या आपल्या पेन फ्रेंड्सना भेटता आलं नाही.
"मोठ्या प्रयासाने आम्ही भारत आणि पाकिस्तानात मैत्रीची एक साखळी तयार केली होती, आता पुन्हा सुरू करणं तितकं सोपं नाही," असं राकेश गुप्ता यांना वाटतं.
आज ऋषिकेश दहावीत आहे. त्याच्या मनातला पाकिस्तान तो आपल्या अनेक मित्रांबरोबर शेअर करतो. समिउल्लाच्या मनातला भारत कसा असेल, हे त्याला जाणून घ्यायचंय.
ऋषिकेशला अजूनही आशा आहे की तो कधी ना कधी पाकिस्तानला भेट देईल. "समिउल्ला मला ओळखेल की नाही, माहीत नाही. कारण आता आम्ही संपर्कात नाही. पण तरीही मला जायला आवडेल. मी त्याला मित्र मानलंय."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)