IITमध्ये मुलींची संख्या कमी असण्याची ही आहेत कारणं

फोटो स्रोत, Getty Images
देशाच्या लोकसंख्येत महिलांचं प्रमाण 48.5 टक्के आहे.
बारावी पास होणाऱ्या मुलींचं प्रमाण 45 टक्क्यांच्या आसपास असतं.
देशाच्या विविध भागात इंजिनिअरिंग करणाऱ्या मुलींचं प्रमाण 28 टक्के आहे.
परंतू IITमधून बी.टेक करणाऱ्या मुलींचं प्रमाण फक्त 8 ते 10 टक्के एवढंच आहे.
जुलैमध्ये IIT खरगपूरमध्ये एका समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद सहभागी झाले होते. ते म्हणाले, "एक गोष्ट माझ्यासाठी अजूनही कोडं आहे. बारावीत मुलींची प्रगती मुलांपेक्षा चांगली असते. परंतू IITमध्ये त्यांचं प्रमाण चिंताजनक आहे. त्याबाबतीत आपण काहीतरी करायला पाहिजे."
म्हणजे हे जे आकडे आहेत ते राष्ट्रपती कोविंद यांच्या मनातल्या प्रश्नांचाच वेध घेतात.
तो प्रश्न म्हणजे IIT मध्ये मुली इतक्या कमी का आहेत?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
आकडे काय सांगतात?
सरकारी आकड्यांनुसार 2017मध्ये देशातल्या 23 IITमध्ये 10,878 विद्यार्थांनी प्रवेश घेतला. त्यात केवळ 995 मुली आहेत.
या मुलींपैकी एक आहे IIT मद्रासमध्ये शिकणारी नित्या सेतुगणपती. तिनं केमिकल इंजिनिअरिंग ही शाखा निवडली आहे.
नित्या बीबीसीशी बोलताना म्हणाली, "तसं तर माझ्या घरी मला इंजिनिअर करण्याबाबत कोणाचंच दुमत नव्हतं. सगळ्यांनी माझ्या निर्णयाचं समर्थन केलं. परंतू मी जेव्हा कौन्सिलिंग नंतर जेव्हा ही शाखा निवडली तेव्हा माझ्या आईनं त्यावर आक्षेप घेतला होता."
नित्या सांगते, "माझ्या आईच्या मते ही शाखा मुलींसाठी नाही. मला IT किंवा कॉम्प्युटर ही शाखा निवडायला हवी होती असं तिचं मत होतं."
नित्याने मग तिच्या आईचं शिक्षकांशी आणि सिनिअर विद्यार्थ्यांशी बोलणं करवून दिलं. त्यानंतर त्यांनी नित्याची विषयाची निवड मान्य केली. हे सगळ्यांत महत्त्वाचं आहे.
IITमध्ये मुली का कमी आहेत?
या समस्येमुळे केंद्र सरकारही चिंतेत आहे. या प्रश्नाचा वेध घेण्यासाठी सरकारने IIT मंडीचे संचालक प्रा. तिमोथी गोन्साल्विस यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली. या समितीने त्यांचा अहवाल मनुष्यबळ मंत्रालयाला सोपवला आहे.
अहवालाविषयी बीबीसीशी बोलताना गोन्साल्विस म्हणाले, "IITमध्ये मुली कमी असण्याची दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे समाजात असलेले पूर्वग्रह आणि दुसरं म्हणजे रोल मॉडेल्सचा अभाव."
श्रेया यांनी IITगांधीनगरहून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांच्या वर्गात असलेल्या 170 विद्यार्थ्यांपैकी फक्त 15 मुली होत्या. जेव्हा त्यांना या बाबतीत विचारलं तेव्हा त्यांचेही विचार काहीसे असेच होते.

फोटो स्रोत, BBC/Nitya
श्रेया यांनी कोटामधून IITच्या प्रवेश परिक्षेचा अभ्यास केला. तिथेही त्यांच्याबरोबर शिकणाऱ्या मुलींची संख्या कमी होती. त्या सांगतात की त्यांच्या अनेक मैत्रिणींना या क्षेत्रात रस होता, तरीही त्यांना घराबाहेर पाठवण्यात आलं नाही.
हीच बाब प्रा. गोन्साल्विस यांनी त्यांच्या अहवालात नमूद केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आधी मुलींना क्लासला जाण्याची परवानगी मिळत नाही. ती मिळाली तर काउंसिलिंगमध्ये समस्या येतात. घराच्या जवळ असणाऱ्या IITमध्ये प्रवेश मिळावा अशी त्यांची इच्छा असते. पण प्रत्येकवेळी तसं होत नाही.
IITमध्ये मुलींच्या कमी प्रमाणाबाबत राज्यसभेतही चर्चा झाली आहे. त्या प्रश्नाच्या उत्तरात मनुष्यबळ विकास मंत्रालयानं सांगितलं की, 2015मध्ये 26.73 टक्के मुली JEE Mainची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. 17 टक्के मुली JEE Advanced उत्तीर्ण झाल्या. मात्र शेवटी प्रवेश घेणाऱ्या मुलींचं प्रमाण 8.8 टक्के होतं.
यावरून असं लक्षात येतं की IITमध्ये प्रवेशासाठी मुली फॉर्म भरतात, अनेकदा त्यांची निवडही होते. पण मनासारखी शाखा न मिळाल्यामुळे मुली प्रवेश घेत नाहीत.
यावर उपाय काय?
IITच्या अहवालात या समस्येवर उपाययोजना सुद्धा सांगितली आहे. अहवालात तोडगा म्हणून मुलींसाठी जागा वाढवण्याचा उल्लेख केला आहे, जेणेकरून 2020पर्यंत मुलींचा आकडा 20 टक्क्यांच्या वर जाईल. यासाठी देशात असलेल्या एकूण 23 IITमध्ये 800 जागा वाढवल्या आहेत.
याचा उद्देश असा आहे की, मुलांची संख्या कमी न होता मुलींची संख्या वाढवणं आहे.

IIT परिषदेनं हा निर्णय 2018-19 या सत्रासाठी घेतला आहे. त्याचा परिणाम असा झाला की IITमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींची संख्या 15 टक्क्यांच्या आसपास पोहोचली. गेल्या पाच वर्षांत ती सगळ्यात जास्त आहे.
या समस्येवरचा दुसरा तोडगा म्हणजे, IITनं रोल मॉडेल तयार करायला हवा. विद्यार्थिनींसाठी एखादी नवीन योजना सुरू करावी जेणेकरून त्यांना प्रोत्साहन मिळेल. शिष्यवृत्ती, ट्युशन फीमध्ये सवलत अशा अनेक गोष्टींचा उल्लेख आहे.
IIT मंडीनं यावर काम सुरू केलं असून त्याचे सकारात्मक परिणाम समोर येत आहे.
अहवालात भविष्यात अशा योजनांवर कारवाई करण्यास सांगितलं आहे. आठव्या इयत्तेपासूनच IITच्या परीक्षांची तयारी करायला हवी असाही त्यात उल्लेख आहे.
विदेशातले आकडे काय सांगतात?
भारतात इंजिनिअरिंग करणाऱ्या मुलींच्या संख्या कमी आहे, अशातला भाग नाही. 2016 मध्ये 3 लाख मुलींनी बी.टेकला प्रवेश घेतला. पण IITमध्ये मात्र मुलींचा आकडा कमी होत जातो.
म्हणून मुलीचं डोकं इंजिनिअरिंगमध्ये कमी चालतं हा समज चुकीचा आहे.

फोटो स्रोत, Twitter/ rashtrapatibhawan
अमेरिकेच्या MITचे 2016चे आकडे सांगतात की, तिथे पदवीपूर्व अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्यांमध्ये 50 टक्के मुली होत्या.
IITमध्ये सरकारनं मिशन बेटी पढाओ अभियान सुरू केलं आहे, त्यामुळेही अपेक्षा वाढल्या आहेत. 2020पर्यंत IITमध्ये 20 टक्के मुलींच्या प्रवेशाचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








