रेशन आणि आधार कार्ड नसल्यानं मुलीचा मृत्यू

फोटो स्रोत, DHEERAJ
- Author, रवि प्रकाश
- Role, सिमडेगा (झारखंड) बीबीसी हिंदी डॉटकॉमसाठी
रेशन कार्ड आधारशी संलग्न नसल्यानं जीव गमावण्याची वेळ झारखंडमधील एका मुलीवर ओढवली.
संतोषीने चार दिवसांपासून काही खाल्लं नव्हतं. तिच्या घरी मातीची चूल होती. जंगलातून आणलेलं सारणही होतं. मात्र चुलीवर शिजवण्यासाठी शिधा नव्हता.
शिधा असता तर संतोषी आज या जगात असती. मात्र अनेक दिवस खायला न मिळाल्यानं रिकाम्यापोटीच तिनं या जगाचा निरोप घेतला. ती फक्त दहा वर्षांची होती.
संतोषी आणि तिच्या घरचे कारीमाटी गावात राहतात. झारखंड राज्यातल्या सिमडेगा जिल्ह्यातल्या जलगेडा परिसरातलं पतिअंबा पंचक्रोशीतलं संतोषीचं गाव.
या गावाची वस्ती जेमतेम शंभर. गावात विविध जातीधर्माची माणसं राहतात. संतोषी एका उपेक्षित समाजाची प्रतिनिधी आहे.
रेशन कार्ड आधारशी जोडलेलं नसल्यानं त्यांना शिधा मिळणं बंद झालं. गेले आठ महिने संतोषीचा परिवार शिधाविना आहे.
आईवडिलांवर जबाबदारी
संतोषीचे बाबा आजारी असतात. त्यामुळे घर चालवण्याची जबाबदारी तिची आई कोयली देवी यांच्यावर आहे. सोबतीला संतोषीची मोठी बहीण आहे.
घरासाठी त्या वेगवेगळी कामं करतात. मात्र दुर्लक्षित समाजातून असल्यानं त्यांना काम मिळण्यातही अडचणी येतात.

फोटो स्रोत, DHEERAJ
अशा परिस्थितीत संतोषीच्या कुटुंबाने अनेक दिवस अन्नाशिवाय काढले
त्या दुर्देवी प्रसंगाबद्दल कोयली देवी यांनी सांगितलं. 28 सप्टेंबरला संतोषीने पोट दुखत असल्याचं सांगितलं. गावातल्या वैद्याकडे आम्ही तिला घेऊन गेलो. संतोषीला भूक लागली आहे असं वैद्यानं सांगितलं.
तिला खायला द्या, बरं वाटेल असं ते म्हणाले. आमच्या घरी अन्नधान्याचा कणही नव्हता. संतोषी धाय मोकलून रडत होती.
तिचे हातपाय आखडायला सुरुवात झाली. संध्याकाळी चहा बनवला. तिला चहा पाजण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला प्रचंड भूक लागली होती. बघता बघता तिने जीव सोडला. त्यावेळी रात्रीचे दहा वाजले होते.
सरकारचा इन्कार
सिमडेगाचे उपायुक्त मंजुनाथ भजंत्री यांनी संतोषीचा मृत्यू भुकेनं झालं असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. संतोषीचा मृत्यू मलेरियानं झालं असल्याचं त्यांनी सांगितलं.
"संतोषीच्या जाण्याचा आणि भूकेचा संबंध नाही. संतोषीचे कुटुंबीय गरीब आहेत म्हणूनच त्यांना अंत्य़ोदय कार्ड देण्यात आलं आहे. जेणेकरून त्यांची आबाळ होऊ नये."

फोटो स्रोत, DHEERAJ
संतोषीचा मृत्यू 28 सप्टेंबरला झाला. मात्र यासंबंधातली बातमी 6 ऑक्टोबरला छापून आली. दुर्गा पुजेच्या कारणास्तव शाळेला सुटटी असल्याने संतोषीला माध्यान्ह भोजन मिळत नव्हतं असं प्रसारमाध्यमांनी छापलं. मात्र प्रत्यक्षात 3 मार्चनंतर संतोषी शाळेत गेलीच नव्हती.
संतोषीच्या मृत्यूचं कारण शोधण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. संतोषीच्या मृत्यूचं कारण मलेरिया असल्याचं या समितीने स्पष्ट केलं. संतोषीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतरच हा निष्कर्ष काढला आहे.
रेशन कार्ड मिळावं यासाठी पाठपुरावा
सरकारनं तथ्यं लपवल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तारामणी साहू यांनी केला. एनएम माला देवी यांनी 27 सप्टेंबरला संतोषीला तपासलं. त्यावेळी मलेरिया नव्हता. मग अचानक मलेरिया कुठून आला? असा सवाल साहू यांनी केला.

फोटो स्रोत, DHEERAJ
कोयल देवी यांचं रेशन कार्ड रद्द झाल्यानंतर उपायुक्तांच्या जनता दरबारात याची तक्रार केली होती. 25 सप्टेंबरला जनता दरबारात पुन्हा हा मुद्दा मांडला. त्यावेळी संतोषी होती. त्यांच्या घराची स्थिती दयनीय होती.
मात्र माझ्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आणि यानंतर अवघ्या महिन्याभरात संतोषीने जग सोडले असे साहू यांनी सांगितलं.
'राइट टू फूड कॅम्पेन'तर्फे चौकशी
या घटनेनंतर राइट टू फूड कॅम्पेनच्या पाच सदस्यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यांच्याबरोबर राज्य खाद्य आयोगाचे सदस्यही होते.

फोटो स्रोत, DHEERAJ
संतोषीच्या मृत्यूचं कारण केवळ भूकच असल्याचं तिच्या आईने या पथकाला सांगितलं.
"एखाद्या व्यक्तीला दररोज खायला प्यायला मिळत नसेल आणि त्यामुळे त्याचा जीव गेला तर यावर काय बोलणार?"
"सरकारनं जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येला प्रमाण मानावं किंवा भूकबळी सिद्ध करावं. भूकेमुळे होणारा मृत्यू त्यांना टाळता येणार नाही. सरकारने जबाबदारी स्वीकारावी," असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बलराम यांनी सांगितलं.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








