You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'...म्हणून तब्बल 66 वर्षं मी हाताची नखं वाढवली'
श्रीधर चिल्लाल यांनी आपली नखं 66 वर्षांनी कापली आणि या नखांना थेट न्यूयॉर्क शहरातल्या एका प्रदर्शनात स्थान मिळालं.
पुण्यातल्या श्रीधर चिल्लाल यांनी 1952 पासून आतापर्यंत आपली नखं वाढवली. 17 नोव्हेंबर 2014 ला सगळ्यांत लांब नखांसाठी गिनीज बूकमध्ये सुद्धा त्यांच्या नावाची नोंद झाली.
त्याच दरम्यान त्यांनी रोजच्या कामात अडचणी येऊ नये म्हणून आपल्या उजव्या हाताची नखं कापली.
गिनीज बूकच्या मते शेवटच्या वेळी जेव्हा त्यांच्या नखाचं माप घेतलं तेव्हा त्याची लांबी 909.6 सेमी होती.
नखांनी हाताचं नुकसान
श्रीधर यांनी आता आपल्या डाव्या हाताची नखंही कापली आहे. त्यांच्या नखांना अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमधल्या रिप्लीज बिलिव्ह इट ऑर नॉट म्युझियम मध्ये ठेवलं आहे.
दीर्घकाळ नखं न कापल्यानं आणि नखांच्या वजनानं श्रीधर यांच्या डाव्या हाताला मोठ्या अडचणी आल्या आहेत.
पुण्यात राहणाऱ्या श्रीधर यांना आता आपली बोटं चालवता येत नाही आणि हातही उघडता येत नाही.
66 वर्षांत या नखांचा आकार प्रचंड प्रमाणात वाढला. त्यांची नखं कापण्यासाठी लोखंड कापण्याच्या एका मशीनचा वापर करण्यात आला.
2015 मध्ये गिनीज बुकच्या एका टीमनं श्रीधर यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी ते म्हणाले होते, "माझी नखं खूपच नाजूक आहेत. त्यांची फार काळजी घ्यावी लागते. विशेषत: झोपताना."
नखं का वाढवली?
अमेरिकेत ठेवलेल्या या नखांची श्रीधर खूप स्तुती करतात.
पण प्रश्न असा आहे की त्यांनी नखं का वाढवली आणि कापली का नाही?
त्याचं उत्तर देताना श्रीधर म्हणतात, "ही एक जुनी गोष्ट आहे. त्यावेळी मी 14 वर्षांचा होतो. मी आणि माझा एक मित्र शाळेत खेळत होतो. आमचे एक शिक्षक होतो. काही सांस्कृतिक कारणांमुळे त्यांनी छोट्या बोटाचं नख वाढवलं होतं. मी खेळताना त्यांना जाऊन धडकलो आणि त्यांचं ते नख तुटलं. त्यावर ते खूप नाराज झाले. पण मनातल्या मनात मी ठरवलं की मला त्यांच्यापेक्षा मोठी नखं वाढवून दाखवायची."
नखं कापून कसं वाटलं?
इतका काळ सोबत असलेली नखं कापून त्यांना कसं वाटलं? त्यावर ते सांगतात, "मी माझ्या नखांची विशेष काळजी घेतली. नखं खूप नाजूक असतात. मी त्यांच्याबरोबर 66 वर्षं घालवली. जेव्हा मी ती कापण्याचा विचार केला तेव्हा तो माझ्यासाठी एक कठीण निर्णय होता."
श्रीधर चिल्लाल सांगतात की न्यूयॉर्क मधल्या रिप्लीज बिलिव्ह इट ऑर नॉट म्युझियममनं त्यांना त्यांच्या नखांचा सांभाळ करण्याचं आश्वासन दिलं आहे.
श्रीधर सांगतात, "मला विश्वास आहे की नखं कापण्याचा निर्णय योग्य होता. लोक तिथं जाऊन बघू शकतील."
हेही वाचलंत का?
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)