You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रामावर टीका केली म्हणून चित्रपट समीक्षक आणि हिंदू धर्मगुरू तडीपार
रामावर टिप्पणी केली म्हणून एका सिनेसमीक्षकाला हैद्राबाद शहरातून 6 महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आलं आहे. तेलंगाणा पोलिसांनी ही कारवाई केली असून या समीक्षकाचं नाव कथी महेश असं आहे. या समीक्षाविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा देणारे धर्मगुरू परीपूर्णानंद यांनाही हैद्राबादमधून हद्दपार करण्यात आलं आहे.
महेश यांनी एका टीव्ही कार्यक्रमात ही टीकाटिप्पणी केली होती. त्यावरून सोशल मीडियावर मोठा गदारोळ माजला होता. त्यानंतर हिंदू धर्मगुरू परीपूर्णानंद यांनी महेश यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली होती.
महेश यांच्या वक्तव्यांमुळे बहुसंख्य हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत, अशी तक्रार त्यांनी दिली होती. या तक्रारीवरून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांच्या या कारवाईवर प्रतिक्रिया देताना दलित कार्यकर्ते सुजाता सुरेपल्ली यांनी सरकार दलितांच्या विरोधात असल्याची टीका केली. महेश यांच्यावर कारवाई केल्यानंतर पोलिसांवर मोठी टीका झाली.
पण या सगळ्या प्रकराणाला वेगळं वळण मिळालं आहे. मंगळवारी पोलिसांनी परीपूर्णानंद यांनाही हैद्राबादमधून 6 महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिसांनी परीपूर्णानंद यांना नोटीस बजावली आहे. त्यांनी 2017मध्ये मेडकमध्ये केलेल्या एका भाषणात इतर धर्मीयांच्या भावना दुखावल्या होत्या, असं पोलिसांनी म्हटलं आणि त्यावर खुलासा मागितला.
पण नोटीस देऊन 24 तास उलटले तरी त्यांनी खुलासा केला नसल्यानं त्यांना हद्दपारीची नोटीस बजावली आहे, असं सहायक पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे.
परीपूर्णानंद यांच्या कायदेसल्लागारांनी हद्दपारीच्या आदेशापूर्वी त्यांना कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचं म्हटलं आहे.
परीपूर्णानंद यांनी महेश यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी यडारीपर्यंत मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं.
महेश यांची हद्दपारी का?
तेलंगाणाचे पोलीस महासंचालक महेंद्र रेड्डी म्हणाले, "महेश यांनी हिंदू धर्मातील पौराणिक व्यक्तीरेखेवर टीकाटिप्पणी केल्यानं बहुसंख्याकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य मूलभूत हक्क आहे. पण दुसऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घेतील पाहिजे," असं ते म्हणाले.
Telangana Prevention of Anti-Social and Hazardous Activities Act 1980 या कायद्यातल्या तरतुदींनुसार की कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
पोलिसांनी महेश यांना त्यांचं मूळ गाव असलेल्या चित्तूर (आंध्रप्रदेश) इथं हालवलं आहे. जर त्यांनी हैद्राबादमध्ये परत येण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई होऊ शकते, अशा स्थितीत त्यांना 3 वर्षांचा कारवास होऊ शकतो, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
पोलीस महासंचालक म्हणाले, जर त्यांनी सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांतून लोकांच्या भावना दुखावतील अशी वक्तव्य केली तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
धार्मिक भावना दुखावणे, दोन गटांत संघर्ष निर्माण करणे, हा गंभीर गुन्हा आहे. अशा परिस्थितीमध्ये संबधित माध्यमांवरही गुन्हे दाखल केले जातील असं ते म्हणाले.
महेश यांनी ज्या टीव्ही चॅनलवर हे वक्तव्य केलं, त्या चॅनललासुद्धा कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, असं ते म्हणाले. चॅनल काय खुलासा करतं यावर पुढील कारवाई होईल, असं ते म्हणाले.
'चर्चेत राहण्याची खेळी'
वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या साईपद्मा म्हणाल्या, "सतत बातम्यात आणि चर्चेत राहण्यासाठी महेश असं करत आहेत. फार पूर्वीपासून ते असं करत आहेत."
त्या म्हणाल्या, "जर टीआरपी वाढवण्यासाठी चॅनलं असे कार्यक्रम दाखवत असतील तर समाजात वातावरण बिघडू शकतं. कलम 19 (1A) आणि 19 (2) नुसार जर कायद्याच्या तरतुदींचं उल्लंघन होत असेल तर अशा व्यक्ती आणि संघटनांवर निर्बंध घालता येतात. पण अशा वादांमुळे समाजाचे खरे प्रश्न झाकले जातात, ही खरी समस्या आहे."
आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा उच्च न्यायालयातले वकील वेणुगोपाल रेड्डी म्हणाले, "एखाद्या ठिकाणाहून एखाद्या व्यक्तीला हद्दपार करणं हे व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणारं आहे."
"The Prevention of Anti-Social and Hazardous activities Act 1980 Act या कायद्याची अंमलबजावणी आंध्र प्रदेशाचं विभाजन होण्याच्या आधीपासून सुरू आहे. तेलंगाणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर तेलंगाणा राज्यात या कायद्यात थोडे बदल करून त्याची अंमलबजावणी सुरू आहे, पण या कायद्यातल्या तरतुदींनुसार केस दाखल झालेल्या नाहीत."
ते पुढे म्हणाले, सुप्रीम कोर्ट विरुद्ध महेश कुमार या केसमधील निकालाचे एकतर्फी दाखले देऊन कोणत्याही व्यक्तीला हद्दपार करणं कायदेशीर नाही.
कोणत्याही व्यक्तीला कोठडीत ठेवण्याचा अधिकार पोलिसांना आहे, पण हद्दपार करण्याचा अधिकार पोलिसांना नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
कोण आहेत महेश?
महेश तेलुगू सिनेमांतील समीक्षक आणि अभिनेते आहे. जानेवारी 2018मध्ये अभिनेते पवन कल्याण यांच्यावर त्यांनी टीका केली होती. त्यावर पवन कल्याण यांच्या फॅन्सनी त्यांना ट्रोल केलं होतं.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)